चिमणी

405

>> मंगल गोगटे

दिसण्यात एवढा साधा पक्षी आहे चिमणी की मोर, सारस, हरणं, फुलपाखरं यांच्या अस्तित्वाची जशी त्यांच्या रंगरूपामुळे जाणीव होते, तसं चिमणीच्या बाबतीत कधी घडलेलंच नाही. चिमणीने कधी तक्रार केली नाही, पण माणसाच्या असण्याला त्या कधी घाबरल्याही नाहीत. सुपातून धान्य पाखडताना ना उन्हाळय़ात वाळवणं करताना माणसाने अप्रत्यक्षपणे खायला घातलं चिमणीला. सुपातले दाणे पडणं जितकं नैसर्गिक, तितकंच त्यांचं तिथे आजूबाजूला असणंही आणि ते दाणे हक्काने खाणंही.

अन्नासाठी कुठेही दरोडा घालणाऱया चिमण्या (वाण्याकडे, घरातल्या जेवणाच्या टेबलावर, धान्याच्या गोदामांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये) आता दिसेनाशा झाल्या. फक्त हिंदुस्थानातच नाही तर एकूण जगातच त्यांचा आकडा अगदीच कमी झाला. मग जगाला जाग आली! घोळक्याने चिवचिव करणाऱया, आकाशात उडणाऱया झाडांवर घरटी बांधणाऱया, आपल्या अंगणात वा बाल्कनीत येऊन बसणाऱया चिमण्या एकदमच दिसेनाशा झाल्या. मात्र गायब होता होता त्यांनी एक गोष्ट शिकवली. पर्यावरणदृष्टय़ा एवढा यशस्वी ठरलेला लहान पक्षी, कसा अचानकपणे नाहीसा होऊ शकतो हे दाखवलं. त्यामुळे इतरही अनेक लहान नगण्य पक्ष्यांचं काय, हा प्रश्न मानवी मनाला पडला. आपल्या घराजवळ दिसणाऱया चिमण्या वर्षातून अनेकदा पिल्लं देतात, इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त वेळा. मात्र तिच्या स्वत:च्या आकाराच्या मानाने ती घर मोठं बनवते. तेही मिळेल त्या वस्तूंनी. चिमणी आणि चिमणा यांना वेगवेगळं ओळखणं अंमळ कठीणच. दिसण्यात पटकन् पाहिलं तर दोघे सारखेच. फक्त चिमणीचा रंग थोडा उजळ. एवढाच काय तो फरक. दोघं काम काय करतात त्यावरूनही ठरवणं कठीण कारण त्यांच्याकडे ती अगदी समानता आहे.

पूर्वीच्या घरांमध्येही चिमण्या घरं बांधत. घराच्या वास्तुकामातच त्यांना कुठेतरी फटी सापडत. आता नवीन प्रकारच्या घरांमध्ये तशा जागा सापडत नाहीत. त्यांना पाहिजेत त्या प्रकारची झाडं घरं बांधायला सापडत नाहीत. कारण आता मुंबईतील 50 टक्के झाडं मूळची इथली नाहीत. आणि शहरीकरण एवढं भरमसाट झालं आहे की नवीन सिमेंटचं जंगल त्यांना भावत नाही. चिमण्या जगात जवळजवळ सगळीकडे दिसतात. फक्त दाट जंगलं व अंटार्टिका इथे दिसत नाहीत. शहरं अथवा खेडी जिथे माणूस राहतो तिथे सर्वकडे चिमण्या राहू शकतात. त्या फार सहनशील असतात. एकदा तर असं लक्षात आलं की अमेरिकेत एका ठिकाणी चिमण्यांनी 640 मीटर जमिनीखालच्या कोळशाच्या खाणीत घर केलं होतं परंतु अन्न मिळवण्यासाठी त्या एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या टेहळणी बुरुजावर रात्री जात असत. साधारण 16 सें.मी. लांबीची चिमणी हे करू शकते. पण एवढय़ा ताकदीची चिमणी झोपते मात्र पंखांमध्ये डोकं खुपसून.

चिमण्या जे खातात त्यात 90 टक्के कोणत्याही बिया असतात वा धान्य असतं. त्या 4-5 पांढरट निळसर वा हिरवट. त्यावर निळे व तपकिरी ठिपके असलेली अंडी देतात. 9 ते 17 दिवस त्यांना उबवलं की पिल्लं बाहेर येतात. नंतर 4 दिवसातच त्यांचे डोळे उघडतात. लहानपणी पिल्लं फक्त लहान किडे खातात. उत्तर अमेरिकेत पतंगांचा त्रास झाल्याने 1852 मध्ये लंडनमधून काही पक्षी आणून इथे सोडले. त्यात चिमण्या होत्या. 1863 मध्ये ऑस्ट्रेलियात काही चिमण्या सोडल्या. पण पूर्वेला सोडलेले हे पक्षी वाढले तर पश्चिमेला चिमण्या मारून टाकलेल्या सापडल्या. 1859 मध्ये न्यूझीलंडला चिमण्या गेल्या व तिथून पुढे हवाईला पोचल्या. 1900 साली द. आफ्रिकेमध्ये चिमण्यांची ओळख करून दिली. तिथून त्या टांझानियाला पोचल्या. द. आफ्रिकेतही 1870 मध्ये चिमण्या आल्या. आता तर टिएरा डेल फुएगो पासून व्हेनेझुएलापर्यंत चिमण्या दिसतात.

जगभर इतक्या चिमण्या आहेत की प्रदेश, हवामान, अन्नपाणी यामुळे त्यांचे 26 पेक्षा जास्त प्रकार सांगता येतात. पहिली म्हणजे घर-चिमणी, आपल्याकडे दिसते ती. मग झाड-चिमणी, युरेशियन-चिमणी, स्पॅनिश, रसेट, इटालियन, वाळवंट, सॅक्शल, चेस्टनट, डेड-सी, सुदान सोनेरी नॉर्दन ठो हेडेड केप, प्लेन बॅक्ड, ठोट, लॅगो पॅरट, अरेबियन, सिंद, सोमाली, केनया, स्वेनसन, सोकोर्टा, सदर्न ठो हेडेड, स्वाहिली, कोर्डोफॅन शेलीज आणि अब्द अल-कुरी… असे आणखी सुमारे चौदा प्रकार सांगता येतात. यातील अनेक चिमण्या मनमोहक रंगांच्या असतात.

एवढे प्रकार असूनही चिमणीची वस्तीत ती अवस्था आहे जी जंगलात वाघाची आहे. आज वाघ धोकादायक प्रजाती आहे आणि तशीच चिमणीही. आता मात्र चिमण्या दिसण्याचं प्रमाण वाढलंय. आणि 21 मार्च 2012 पासून आपण आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस दरवर्षी साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या