
>> प्रज्ञा कुलकर्णी
इवल्याशा चिमणीशी आपलं अगदी लहानपणापासूनच मैत्र असतं. चिऊ-काऊचे घास खात, त्यांचे चिवचिवणे, बागडणे, भुर्र उडणे पाहतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत, परंतु सध्याच्या काळात हे चित्र पार बदलून गेले आहे. आजची लहान मुलं मोठी होतात ती टीव्हीवरचे कार्टून्सचे शो पाहत, मोबाईलवरचे गेम्स खेळत आणि सुपरमॅनच्या गोष्टी ऐकत. माणूस चिमण्यांपासून दुरावलाय, चिमण्यांना विसरलाय आणि म्हणूनच कदाचित जगभरातच चिमण्यांची संख्या कमी होत चाललीय आणि वर्षातला 20 मार्च हा दिवस ‘चिमणी दिन’ म्हणून साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.
अवतीभवती बागडणाऱया चिमण्या परिसर जागता ठेवत असतात आणि पर्यावरण संवर्धनाला हातभारही लावत असतात. मनात आलं, चिमण्यांनाही भावना असतात. माणूस आपल्यापासून दुरावलाय हे दुःख त्यांनाही जाणवत असेलच नाही का? चिमण्यांना बागडायला त्यांचा संसार, त्यांची पिलं वाढवायला अंगण, परसू, झाडंझुडपं, पाणवठे नाहीसे होत चाललेत याचं दुःख आणि ऋतुमानातले बदल यांचा त्रास त्यांनाही जाणवत असेलच ना? मग एखादी चिमणी या साऱया भावना, दुःख कसे व्यक्त करेल? आपले मनोगत ती कोणत्या शब्दांत मांडेल? असा विचार मनात आला आणि वाटलं, चिमणीला बोलता येत नाही, सांगता येत नाही, पण तिच्या भावना आपण समजू शकतो, तिचे मनोगत आपण शब्दबद्ध करू शकतो ना!… आणि चिमणीची व्यथा शब्दबद्ध झाली.
चिमणी आपले मनोगत, आपली व्यथा मांडताना म्हणते,
चिमणीची व्यथा
एकेकाळी माझे माणसाशी
जिव्हाळय़ाचे नाते होते,
त्याच्या जीवनात मला महत्त्वाचे स्थान होते…
माझा चिवचिवाट ऐकत,
माझे भुर्र उडणे निरखत,
माझ्याशी गुजगोष्टी करत,
वरणभाताचे घास रिचवत,
तो लहानाचा मोठा होत होता,
‘‘चिऊताई, चिऊताई दार उघड’’ ही माझी गोष्ट तो पिढय़ान्पिढय़ा आपल्या मुलानातवंडांना सांगत होता…
त्याच्याशी माझे घरोबाचे संबंध होते,
त्याच्या घराच्या वळचणीला मी माझे घरटे
हक्काने बांधत होते…
त्याच्या बरोबरच मीही
माझा संसार वाढवत होते,
त्याच्या घराच्या अंगणात,
परसात मुक्तपणे बागडत होते…
माझ्यासाठी तो आठवणीने
तांदूळ दाणे टाकत होता,
न विसरता पाण्याची ताटली,
वाटी भरून ठेवत होता…
पाहता पाहता अंगण गेले,
परसू गेले
सिमेंटचे जंगल जिकडे तिकडे उभे राहिले
त्याचे माझे चिमणे मैत्र
नकळत लोप पावत गेले…
आता मला न उरला कोठे थारा,
मला न उरला कोणी त्राता
हिरवा झाडोरा,
चिमणचारा करपून गेला सारा आता…
झरे, तळी, पाणवठे सारे आटून गेले,
माझे प्रसवणेही हळूहळू संपत गेले…
माणसा,
देशील का रे मला थोडी जागा
तुझ्या उंच ‘टॉवरा’त?
ऐकशील का पुन्हा माझा गोड चिवचिवाट?
टाकशील का माझ्यासाठी चार भाताची शिते, राखून ठेवशील का तळी, पाणवठे?
फिरूनी मी माझा वाढवेन संसार,
जोडेन तुझ्याशी पुन्हा जिव्हाळय़ाचे मैत्र
पर्यावरण संवर्धनाला माझ्यापरीने
मी लावेन माझा
चिमुकला हातभार…
चिमणीची ही व्यथा आपण समजून घेतली पाहिजे. केवळ चिमण्यांचेच नाही तर सर्वच पशुपक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांचे रक्षण केले पाहिजे. तरच आपले पर्यावरण संवर्धन होईल आणि आपले जीवनही सुंदर होईल…





























































