लेख : श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा हिंदुस्थानला धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन  (निवृत्त)

श्रीलंकेत जिहाद्यांचा प्रभाव ‘दिन दुनी, रात चौगुनी’ पद्धतीने वृद्धिंगत होत असल्याची शक्यता हिंदुस्थानने मागील वर्षीच व्यक्त केली होती. ती गेल्या महिन्यात ईस्टर सण्डेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी खरी ठरवली. या हल्ल्याची पूर्वकल्पना देऊनही तो रोखण्यात सरकार अयशस्वी ठरले. आपल्याकडेही अनेकदा हेच घडते. श्रीलंकेत इसिसने एका तुलनेने अनोळखी असलेल्या जिहादी ग्रुपला हाताशी धरून हे स्फोट घडवून आणले. हिंदुस्थानात तर भूमिगत पद्धतीने दहशतवाद्यांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करणाऱया (ऍक्टिव्ह स्लीपर सेल्स असलेल्या) अनेक जिहादी संघटना कार्यरत आहेत.  तेव्हा मागील चार वर्षांत आपल्या देशात जिहादी हल्ला झाला नाही म्हणून यापुढेही तो होणार नाही या अल्पसंतुष्ट भावनेने कारभार चालवणे परवडणारे नाही.

श्रीलंकेची लोकसंख्या 22 दशलक्ष असून 75 टक्के स्थानीय सिंहली बौद्ध धर्मीय, 10 टक्के मुस्लिम, 7 टक्के तामीळ व सिंहली ख्रिश्चन आणि उर्वरित 8 टक्के इतर धर्मीय लोक आहेत. जगाचं माणिक अशी त्या देशाची ख्याती आहे. मात्र या देशाला आधी तामीळ अलगाववाद आणि आता वर्णविद्वेषाने ग्रासलं आहे आणि 21 एप्रिलच्या ईस्टर संडेला श्रीलंका आठ सीरियल बॉम्बस्फोटांनी हादरून गेली.

11 एप्रिलला श्रीलंकेच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रियालाल दसनायके यांनी ‘इन्फर्मेशन ऑफ ऍन अलेज्ड प्लॅन ऑफ अटॅक’ या शीर्षकाखाली ‘‘नॅशनल तौहीद जमात मोहम्मद सहारन या संघटनेच्या नेत्याकडून श्रीलंकेत सर्वदूर आत्मघाती हल्ले होतील’’ ही वार्ंनग दिली होती. नॅशनल तौहीद जमात ही इस्लामिक स्टेटची ‘शेल ऑर्गनायझेशन’ आहे. या हल्ल्यात जमियाथुल मिल्लाथू इब्राहिम या दहशतवादी संघटनेने जमातची मदत केल्याचे कळते.

मागील काही वर्षांमध्ये श्रीलंकेचा आर्थिक विकास धीम्या गतीने होत आहे. तेथील चलन क्षीण झाले असून त्याचे आणखी अवमूल्यन अपेक्षित आहे. श्रीलंका इंटरनॅशनल मॉनेटरी फंडचं व्याजही देण्याच्या परिस्थितीत नाही. चीनचे ऋण फेडणे अशक्य झाल्यामुळे श्रीलंकेला हबनटोटा बंदर आणि 15 हजार एकर शेतजमीन चीनला देणं भाग पडलं आहे. 2018मध्ये श्रीलंकेत परत एकदा धार्मिक असंतोष उफाळून आला. मध्यवर्ती कॅंडी जिह्यात सिंहली आणि बौद्धांनी मशिदी आणि मुस्लिम संसाधनांवर हल्ले केल्यामुळे धार्मिक हिंसाचाराला सुरुवात झाली. एका अदमासानुसार श्रीलंकेतील 128 तरुण इसिसमध्ये भरती झाले. श्रीलंकेत जिहाद्यांचा प्रभाव ‘दिन दुनी, रात चौगुनी’ पद्धतीने वृद्धिंगत होत असल्याची शक्यता हिंदुस्थानने मागील वर्षीच व्यक्त केली होती. लश्कर-ए-तोयबा 1992मध्येच लिट्टेच्या मदतीसाठी श्रीलंकेत आली होती. लिट्टेने श्रीलंकेतील दहशतवादी मुस्लिम संघटनांना शस्त्र दिली होती. लश्कर-ए-तोयबाच्या ‘फलाह-ई-इन्सानियत’ या चॅरिटी इन्स्टिटय़ूशनने 2016पासून श्रीलंकेत जम बसवला आहे. तेथील मुस्लिमबहुल कट्टनकुडी क्षेत्रात कार्यरत नॅशनल तौहीद जमातचा अल कायदाशी घनिष्ठ संबंध आहे. तसेच ते तामीळनाडूमधील तौहीद जमात या नव्या जिहादी संघटनेशीदेखील संबंध राखून आहेत.

स्फोटानंतर श्रीलंकन सुरक्षा दलांनी अतिशय तडक कारवाई केली. 27 संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. सरकारने त्यांच्याबद्दल अधिक, किंबहुना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास ठामपणे नकार दिला आहे. सर्व ठिकाणी जवळपास एकदमच स्फोट झाल्यामुळे कोणालाही आगाऊ सूचना देता आल्या नाहीत. झाल्याच्या काही तासांमध्येच तीन दिवस कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे उर्वरित जिहाद्यांना देशाबाहेर पलायन करण्याची संधीच मिळाली नाही. संरक्षण मंत्रालयाने अटक झालेल्या संशयितांची नावे जाहीर करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मृत्युदंड मिळणार हे जवळपास नक्की आहे. श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यामुळे तिथे मिलिटरी कोर्टद्वारे खटले चालवले जातील. आणीबाणीमुळे श्रीलंकन सरकारला तेथील दूरचित्रवाणी अँकर्सशी किंवा जिहादी प्रेमात असणाऱयांशी झगडावं लागणार नाही. कुठल्याही राजनेत्याला संशयित्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्याची, त्यांच्याबरोबर सहानुभूती दाखवण्याची किंवा नक्राश्रू ढाळण्याची संधी मिळणार नाही. कुठल्याही तथाकथित मानवाधिकार संस्था किंवा लोक किंवा वकिलांना संशयितांतर्फे मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे खटखटता येणार नाहीत.

हिंदुस्थानने श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांपासून बरंच काही शिकण्याची आवश्यकता आहे.

अ) अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्याकडून बऱयाच आधी पूर्वसूचना मिळूनही श्रीलंकन सरकारने काहीच खबरदारीची उपाययोजना केली नाही. आपल्या येथेही पुलवामा हल्ल्याच्या वेळी हेच झालं होतं. आता भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी घेणं आवश्यक आहे.

ब) सीरिया व इराकमधे इसिसचा भौगोलिक पाडाव झाला आहे. तरीही त्यांच्या विचारसरणीला जीवापाड जतन करणारे मुसलमान जगात आणि हिंदुस्थानातही आहेत. कश्मीरमधे सदैव इसिसचे झेंडे फडकत असतात. कधी कधी ते बिहार, उत्तर प्रदेश आणि केरळमधेही पाहायला मिळतात. एका अहवालानुसार हिंदुस्थानातील तीनशेच्या वर तरुण सीरियात इसिससाठी लढले होते, पण सरकार व गृहमंत्री अजूनही हे उघडपणे मान्य करत नाहीत. ही शहामृगी मानसिकता त्यागण्याची वेळ आता आली आहे आणि तसे न केल्यास आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

क) श्रीलंकेत इसिसने एका तुलनेने अनोळखी असलेल्या जिहादी ग्रुपला हाताशी धरून हे स्फोट घडवून आणले. हिंदुस्थानात तर भूमिगत पद्धतीने दहशतवाद्यांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करणाऱया (ऍक्टिव्ह स्लीपर सेल्स असलेल्या) अनेक जिहादी संघटना कार्यरत आहेत. तेव्हा मागील चार वर्षांत आपल्या देशात जिहादी हल्ला झाला नाही म्हणून यापुढेही तो होणार नाही या अल्पसंतुष्ट भावनेने कारभार चालवणे परवडणारे नाही.

ड) इसिस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. संपूर्ण युरोप, अमेरिका, मध्य आशिया आणि दक्षिण/दक्षिण पूर्व आशियात त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ते हिंदुस्थानात नसतील असं मानणं बालिशपणाच असेल.

इ) श्रीलंकेत ज्याप्रमाणे राष्ट्रपती व पंतप्रधानांमधून विस्तव जात नाही तसेच हिंदुस्थानातही केंद्र सरकार व गैर भाजपशासित राज्यांमधेही राजकीय व प्रशासकीय बेबनाव आहे. ही परिस्थिती श्रीलंकेसारखीच आहे. त्यामुळे जिहाद्यांसंबंधी केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱयाकडे ही राज्ये जाणूनबुजून दुर्लक्ष करणार नाहीत याची खात्री कोणी देऊ शकणार नाही आणि ही परिस्थिती भयावह आहे.

ई) श्रीलंकेतील हल्ल्यात जबरदस्त ‘इंटलिजन्स फेल्युअर’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण यापासून निश्चितपणे धडा घेणं आवश्यक आहे. श्रीलंका, तामीळनाडू आणि केरळच्या मुसलमानांना या क्षेत्रात ‘इस्लामी राजवट’ आणायला चिथावणारा, मौलवी झहरान बिन हाशीम नावाच्या जिहाद्याचा व्हिडीओ याचा प्रत्यय आणून देतो. या बिन हाशमीचा श्रीलंकेतील शांग्रिला हॉटेलवरील हल्ल्यात मृत्यू झाला असा तेथील सरकारचा दावा आहे. मात्र यावरही लक्ष ठेवणे सरकारला अत्यावश्यक आहे.

फ) श्रीलंकेत जिहाद्यांनी हल्ल्यासाठी ईस्टर संडे निवडला. हिंदुस्थानात नजीकच्या भविष्यात कुठलाही सण येत नसल्यामुळे जिहाद्यांच्या रडारवर सांप्रत निवडणुका आणि त्यानंतरचा उन्माद आला तर त्यात काहीच नवल नसेल. निवडणुकीच्या धामधुमीत आपण देशसुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये हीच देवापाशी प्रार्थना. कारण ‘पुढच्यास ठेच मागील शहाणा’ हा जगाचा न्याय आहे आणि त्याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही.