श्री शैल्यम् मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी

श्री शैलशृडें विविधप्रसडें शेषाद्रीशृडें पि सदा वसंन्तम् ।
तमर्जुनं मल्लिकपूर्वमेनं नमामि संसारसमुद्रसेतुम् ।।

ॐ मल्लिकार्जुन नमः

आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या तटावर दक्षिणेचा कैलास असणारे श्री शैल पर्वतावर मलिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. महाभारत, शिवपुराण तसेच पद्मपुराण या ग्रंथामध्ये याची महिमा आणि उल्लेख आढळतो.

भगवान महादेव यांचे दोन पुत्र श्री गणपती आणि श्री कार्तिकेय स्वामी विवाहासाठी आपापसात भांडण करू लागले. दोघेही म्हणू लागले की आधी माझा विवाह होईल. यांना आपापसात भांडण करताना बघून भगवान महादेव आणि पार्वती यांनी सांगितलं की, तुमच्या मध्ये जो पहिला पृथ्वीची प्रदक्षिणा घालून येईल, त्याचा सर्वप्रथम विवाह केला जाईल. मातापित्याचं ऐकून श्री कार्तिकेय स्वामी आपल्या मयूर वाहनावर विराजित झाले आणि लगेच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. पण श्री गणपतींना हे कार्य खूप कठीण होते, कारण त्याच वाहन मूषक-उंदीर होते. म्हणून ते स्वामी कार्तिकेय यांच्या बरोबरी कशा प्रकारे करू शकले असते ? पण त्यानी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी एक उपाय केला. समोर बसलेले माता पिता भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे पूजन करून त्यांना सात प्रदक्षिणा त्यांच्या भोवती केल्या आणि त्यांनी पृथ्वीच्या प्रदक्षिणेचे कार्य पूर्ण आणि सर्वप्रथम शास्त्रानुसार केले.

पित्रोश्व पूजनं कृत्वा प्रक्रान्ति च करोतिय: ।
तस्य वै पृथिवीजन्य फलं भवति निश्चितम् ।।

पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मारून जेव्हा कार्तिकेय स्वामी आले, तेव्हा त्याआधी गणपतीचा सिद्धी आणि बुद्धी या दोन कन्यांसोबत विवाह झालेला आणि त्यांना ‘क्षेम’ आणि ‘लाभ’ असे दोन पुत्र प्राप्त झाले होते. हे बघून कार्तिकये स्वामी दुःखी झाले होते व त्यांना समजवण्यासाठी माता पार्वती गेल्या. तसेच त्यांच्या मागून भगवान शंकर हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये तेथे प्रकट झाले आणि तेव्हा पासून मलिकार्जुन ज्योतिर्लिंग हे नावाने प्रसिद्ध झाले यांची पूजा अर्चा मल्लिका पुष्पांनी केली होती.

या मल्लिकार्जुन शिवलिंगाची दर्शन पूजन करण्यासाठी भक्ताचे सर्व मनकामना व सर्व ईच्छा पूर्ण होतात त्यांची श्रद्धा भगवान शिव यांच्या चरणावर स्थिर होते आणि दैहिक, दैविक, भौतिक या सर्व व्याधी पासून मुक्ती मिळते.

ऐतिहासिक माहिती –

शिवपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे हे स्थान पवित्र असल्याचे मानले जाते. 18 महाशक्ती स्थानांपैकी 1 वीरशैव संप्रदायाचा 5 प्रमुख मठांपैकी एक आहे आर्य-द्रविड शैव यांच्यात या पवित्र स्थानी एकता झाली. इ.स 1404 मध्ये विजयनगरच्या राजाने या मंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याच ठिकाणी श्रीकृष्ण, देवराय, हरिहर व ब्रह्मानदाय यांनी तीन गोपुरे बांधली.

श्रीशैल्यमचा इतिहास सात वाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैल्यमचा सुवर्ण काळ मानला जातो. राजाने प्रोलयाने पाताळगंगा कृष्णा नदी ते श्री शैल्यम आता मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणारे राजा कृष्ण देवराय यांनी राजा गोपुरे आणि सलूमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुरांचे बांधकाम केले.

([email protected])