परखड आणि व्यासंगी समीक्षक

387

>> प्रशांत गौतम

प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा धडाडीचे पत्रकार अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार घोषित झाला. त्याचे वितरण उद्या 17 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर येथे होत आहे. हा पुरस्कार याआधी विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱया महनीय व्यक्तींना दिला गेला. यावर्षी डॉ. रसाळ यांना साहित्य समीक्षा आणि भाषा या क्षेत्रातील विशेष कार्यासाठी प्रदान केला जाणार आहे.

डॉ. सुधीर रसाळ हे मराठी भाषा व वाङ्मयाचे नामवंत शिक्षक, पत्रकारितेचे जाणकार म्हणून ओळखले जातात. सर म्हणजे काटेकोर शिस्त, स्पष्टवक्ते, विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, असे गुणविशेष त्यांच्या बाबतीत सांगितले जातात. साक्षेपी समीक्षक, मर्मग्राही विश्लेषक सौंदर्यासक्त अभ्यासक, व्यासंगी संपादक, अशी त्यांची महत्त्वाची ओळख आहे. हीच रसिकता, शिस्तप्रिय अभ्यासाची सवय त्यांनी वयाच्या 85व्या वर्षीही जपली आहे. त्यांच्या लेखन योगदानाने समीक्षेचे क्षेत्र समृद्ध झालेले आहे. सुधीर रसाळ यांचा दैनिक मराठवाडा व अनंतराव भालेराव यांच्याशी अतूट स्नेह राहिलेला आहे. एवढेच नव्हे तर मराठवाडा साहित्य परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशीही त्यांचा प्रदीर्घकाळ ऋणानुबंध राहिला आहे. मराठवाडय़ात राहून त्यांचे पन्नासेक वर्ष साहित्य, समीक्षा, भाषा, वाङ्मयीन संस्कृती संवर्धन आणि संगोपनात महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

वडील न.म. जोशी (रसाळ), यांचे शैक्षणिक संस्कार, डॉ. ना.गो. नांदापूरकर, प्राचार्य भगवंत देशमुख यांच्यासारखे लाभलेले गुरू, प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर यांच्यासारखे मार्गदर्शक यातून रसाळ यांनी शैक्षणिक प्रगती केली. साहित्य, समीक्षा क्षेत्राचा व्यासंग वाढवला. शिक्षणाच्या निमित्ताने सरस्वती भुवन, मिलिंद महाविद्यालय, संभाजीनगर, उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद आणि मराठवाडा विद्यापीठ असा प्रवास झाला. अध्यापनाच्या निमित्ताने शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात तीन वर्षे मराठी विभागप्रमुख, 34 वर्षे तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात अधिव्याख्याता, प्रपाठक आणि विभागप्रमुख म्हणून सेवा बजावली. या आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप तर सोडलीच परंतु याबरोबरच एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची प्रतिमा बनली जी आजही तशीच आहे. रसाळ सर आपल्या विद्यार्थ्यांना वाङ्मयीन अभ्यासाची बैठक कशी असावी, एखाद्या कलाकृतीचा रसग्रहण आणि वस्तुनिष्ठतेच्या दृष्टीने कसा विचार करावा, त्यात भावना आणि बुद्धीचा कसा समतोल ठेवावा, हे सांगत असत. मराठी समीक्षा क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. त्यांच्या समीक्षा लेखनाच्या संदर्भात प्रा. डॉ. गंगाधर गाडगीळ म्हणतात, ‘‘एखाद्या विषयाचा तर्कशुद्ध, व्यवस्थित आणि सांगोपांग विचार करण्याची रसाळांची शैली मला आवडते. प्रख्यात कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्यावर प्रसिद्ध झालेले रसाळ सरांचे लेखन परखड असेच आहे, पण यामुळे हे दोघेही रसाळांवर नाराज झाले नाहीत की कोणताही गैरसमजही निर्माण झाला नाही. उलट कुसुमाग्रज या तरुण समीक्षकाच्या लेखनाचे चाहते बनले. आपल्या ‘निवडक गोविंदाग्रज’ या कविता संग्रहासाठी त्यांचीच प्रस्तावना घेतली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर सदस्य म्हणून निवडही केली.

‘कविता आणि प्रतिमा’ हा डॉ. सुधीर रसाळ यांच्या पी.एचडी. चा विषय. प्रा. वा.ल. कुलकर्णी यांच्यासारखे दिग्गज मार्गदर्शक त्यांना लाभले. 1982 च्या सुमारास मौज प्रकाशनाने त्यांच्या या प्रबंधावर आधारित पुस्तक प्रकाशित केले. मात्र त्यानंतरही रसाळ यांचा या विषयाचा अभ्यास सुरूच राहिला. या संग्रहाने त्यांची समीक्षक ही प्रतिमा ठसवण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

बा.सी. मर्ढेकर हेही त्यांच्या अभ्यासाचा विषय असलेले कवी. त्यांच्यावरील समग्र अभ्यासातून 1) मर्ढेकरांच्या कविता ः जाणिवांचे अंतःस्वरूप, 2) मर्ढेकरांची कविता ः आकलन आणि विश्लेषण, 3) मर्ढेकरांचे कथात्मक वाङ्मय ही ग्रंथनिर्मिती झाली. कविवर्य ना.घ. देशपांडे यांच्या कवितांवरील लेखन मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले. दासोपंत रचित अठरावा अध्याय याचेही संपादन केले. ‘साहित्यप्रकार ः स्वरूप आणि अध्यापन’ हे महत्त्वाचे संपादन सांगता येईल. रसाळ यांचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेला ग्रंथ वाङ्मयीन संस्कृती आणि प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘काही मराठी कवीः जाणिवा आणि शैली’ हे सांगता येतील. समीक्षेच्या संदर्भात रसाळ म्हणतात, ‘कुठल्याही भाषेत समीक्षक तीन स्तरातून घडत असतात. काही सर्जनशील लेखकातून, काही सामान्य वाचकातून, तर काही वाङ्मयाच्या अभ्यासकातून घडलेले असतात. ज्या भाषेत सर्जनशील लेखक/समीक्षक असतात, त्या भाषेतील समीक्षा समृद्ध बनत जाते; परंतु असे समीक्षक ठरवून योजनाबद्ध निर्माण करता येत नाहीत. ते जन्मावे लागतात. तात्यासाहेब शिरवाडकर, विंदा करंदीकर या दोघांही दिग्गजांचे मोठे व्यक्तिमत्त्व, त्यांचा स्नेह लाभणे ही रसाळ यांच्या प्रवासातील मोठी कमाई. असाच लोभ त्यांना अनंतराव भालेराव यांचाही लाभला. अण्णांना ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास होता, त्यातीलच एक म्हणजे सुधीर रसाळ. त्यांचा आज अनंत भालेराव स्मृतिपुरस्काराने गौरव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या