लेख – शेतकऱ्यांसाठी साखर कडू कशी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> प्रा. सुभाष बागल 

साखरेचे विक्रमी उत्पादन होत असल्याने ग्राहकांना ती कमी किमतीत मिळाल्याने त्यांच्यासाठी ती गोड ठरेलही, परंतु शेतकऱ्यांसाठी ती कडू ठरते की काय, अशी सध्याची स्थिती आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगितले जात असले तरी, सहकार क्षेत्रातील 40 पेक्षा अधिक बंद असलेले कारखाने चालू असते तर हा प्रश्न कदाचित निर्माण झाला नसता.

राज्यात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 5.6 टक्क्यांनी वाढ होईल, असे खुद्द सरकारच म्हणू लागलंय. राज्यातील 118.81 लाख टनावरचे उत्पादन 125 लाख टनावर जाईल, असे सांगितले जाते. आजवर उत्तर प्रदेश साखरेच्या उत्पादनात अव्वल स्थानी असायचा. यंदा हे स्थान महाराष्ट्राने पटकावलंय. मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने राज्याला ही किमया साध्य करता आली आहे. लागवडीखालील क्षेत्र 11.42 लाख हेक्टरवरून 12.3 लाख हेक्टरवर जाण्यातूनच खऱ्या अर्थाने समस्येचा उगम झालाय तो म्हणजे अतिरिक्त उसाच्या गाळपाचा निर्माण झालेला प्रश्न. यापूर्वीदेखील अनेक वेळा असा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु यंदा त्याची तीव्रता अधिक आहे इतकेच. गाळपाचा हंगाम संपत आला तरी अजूनही 100 लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. त्यातील 60 लाख टन केवळ मराठवाडय़ातील आहे. राज्य सरकारने त्यासाठीच परिसरातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणार हे नक्की.

आपल्याकडील मध्यमवर्गीयांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिमा भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा करून पाणीटंचाई निर्माण करणारा अशीच आहे, परंतु तो ऊस का घेतो हे जाणून घेण्याची तसदी त्यांच्याकडून घेतली जात नाही. उसाला अधिक पाणी लागते, हे आकडेवारीनिशी अनेकांनी दाखवून दिले असल्याने त्याविषयी चर्चा करण्याचे कारण नाही, परंतु उसाशिवाय इतर अनेक पिकांना तेवढेच किंवा त्याहूनही अधिक पाणी लागते. तसेच सर्वच संकरित वाणांसाठी निविष्ठांची अधिक प्रमाणात आवश्यकता असते, त्यात पाणीही आले हे आपण कधी लक्षात घेणार? आपल्याकडील महानगरीय जीवनशैली पाण्याची बचत करणारी आहे असे म्हणणे वस्तुस्थितीचा विपर्यास ठरण्याचीच शक्यता आहे. पाऊस चांगला झाला. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले असे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. त्याला इतर घटक तेवढेच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या पोतडीत सध्या ऊस हेच एकमेव पीक उरले आहे. जे त्याला परवडणारे, हमखास एकरकमी उत्पन्न मिळवून देणारे आहे. नीती आयोगाने साखर उद्योगाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने याला दुजोराच दिला आहे. भाव व विक्रीच्या हमीमुळे लहान-मोठय़ा अशा सर्व शेतकऱ्यांचा उसाकडील ओढा वाढतोय. इतर पिकांच्या भाव अथवा विक्रीची कुठलीच हमी असत नाही. काही पिकांच्या हमीभावाची घोषणा केंद्र सरकारकडून केली जाते खरी, परंतु खरेदीची व्यवस्था न केल्याने खुल्या बाजारात मिळेल त्या किमतीला शेतकऱ्याला माल विकणे भाग पडते.

उसाचे वाढलेले उत्पादन, कारखान्यांचा सरत आलेला गळीत हंगाम, ऊसतोड कामगारांना गावी परतण्याचे लागलेले वेध यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल दिवसागणिक वाढतेय. याचाच फायदा ऊसतोड कामगार व वाहतूकदारांकडून उचलला जातोय. त्यांच्या अवाच्या सवा मागण्यांची पूर्तता करता करता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतेय. पूर्वीदेखील अशा मागण्या केल्या जात, परंतु उसाच्या वाढलेल्या उत्पादनामुळे मागण्यांचा आकार वाढला आहे, जो शेतकऱ्यांसाठी जाचक ठरतोय. थोडय़ाफार फरकाने असाच अनुभव इतर पिकांच्या बाबतीतही येतोय. शेतीवरील मशागतीची इतर कामे वेळेवर न होणे, काढणीस आलेले पीक वाया जाणे असे प्रकार वारंवार घडतायत. राजकीय पक्षांची मते काही का असेनात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगडमधील मजुरांनी ही तूट भरून काढल्याने राज्याला विकासाचा दर राखणे शक्य झाले आहे, हे नाकारता येत नाही.

शेतीच्या यांत्रिकीकरण, रासायनिकीकरण मजुरांची भासणारी वानवाच कारणीभूत आहे. यांत्रिकीकरणालाही काही मर्यादा आहेत. काही कामासाठी मजुरांची आवश्यकता टाळता येत नाही. रासायनिकीकरणाचा जमिनीच्या आरोग्यावर पर्यायाने उत्पादकतेवर होणारा परिणाम दुर्लक्षिण्याजोगा निश्चितच नाही. शिवाय यांत्रिकीकरणात म्हणजे शेतीचे भांडवलीकरण आणि या प्रक्रियेत सामान्य शेतकरी शेती व्यवसायाच्या बाहेर फेकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हमीभावाइतकेच मजुरांच्या कमतरतेचे संकट महत्त्वाचे आहे. ही वानवा मजूर गावात उपलब्ध असताना भासतेय, हे विशेष. असे घडण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे शेतीच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, अन्यथा श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केवळ कृषी क्षेत्रात नव्हे तर सर्वच व्यवसायात कमी-अधिक प्रमाणात श्रमिकांची वानवा सध्या भासतेय. यातील गमतीचा भाग म्हणजे जगभरात तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या हिंदुस्थानसारख्या देशात ती भासतेय, हे विशेष. 15-34 वर्षे वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्याने तरुणांचा देश हे बिरूद हिंदुस्थानला प्राप्त झालंय. देशातील 56 टक्के लोकसंख्या सध्या कर्त्या/उत्पादक लोकसंख्येच्या वर्गात मोडतेय. हिंदुस्थानबरोबर चीनही लोकसंख्या संक्रमणाच्या (Demographic Dividend) लोकसंख्यात्मक लाभाच्या अवस्थेतून जातोय. खरे तर तरुणांची संख्या अधिक असल्याने कृषी काय, कुठल्याच क्षेत्राला श्रमिकांची कमतरता भासावयास नको, पण ती भासतेय हे वास्तव आहे. एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि दुसरीकडे श्रमिकांची भासणारी वानवा असे विरोधाभासी गमतीचे चित्र सध्या आपल्याकडे आहे. देशातील श्रमशक्तीचे व्यवस्थापन, योग्य वापर करण्यात आलेल्या अपयशाचे हे निदर्शक आहे. चीनने तरुणाईचा पुरेपूर वापर करून आपल्या विकास दरात वाढ घडवून आणली आहे. हिंदुस्थानसाठी अजूनही वेळ हातची गेलेली नाही. आणखी दशक-दीड दशकासाठी हा लाभ घेता येऊ शकणार आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

एका दाण्याचे शंभर दाणे (वाढावा निर्माण करणे) करण्याची क्षमता शेतीत असल्याने निसर्गवादी शेतीला उत्पादक व्यवसाय मानतात. उद्योग-व्यापारात असा वाढावा निर्माण होत नसल्याने त्यांच्या दृष्टीने ते व्यवसाय अनुत्पादक आहेत. शेतकऱ्यांकडील हा वाढावा काढून घेण्याचा प्रयत्न सरंजामशाही असो की व्यापारशाही, प्रत्येक काळात झाला आहे. तसाच तो आताही होतोय. मजुरांकडून शेतकऱ्यांकडे केल्या जाणाऱ्या अवाच्या सवा मागण्या हे त्याचेच द्योतक आहे. व्यापारी, दलाल, मध्यस्थ, यंत्रमालक, मजूर यांचे मोबदले देण्यातच सध्या हा वाढावा संपून जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही उरेनासे झालंय. नवीन तंत्राच्या वापरामुळे उत्पादन वाढले खरे, परंतु त्याचा लाभ शेतकऱ्याला होताना दिसत नाही. वाढता कर्जबाजारीपणा, दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्या हे त्याचेच प्रतीक होय.

[email protected]