लेख – सत्य प्रस्थापित करणारा निकाल

882

>> विलास पंढरी

रामाचा जन्म अयोध्येत जेथे रामजन्मभूमी आहे त्याच जागी झाला होता याचे पुरावे आहेत. 1885 पासून हिंदू चौथऱ्यावर व सीता रसोईघरातही पूजा करत होते असे पुरावे आहेत. राम मंदिर बनवण्यासाठी तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करणे, रामजन्मभूमी न्यासाला वाद असलेली जमीन देणे, अयोध्येतच मुस्लिमांना मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देणे असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने प्राप्त परिस्थितीत सर्वच संबंधितांच्या हितांचे रक्षण करणारा हा निकाल दिला आहे.

आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श भाऊ अशा सर्वच आदर्शांचे प्रतीक असलेले प्रभू रामचंद्र पित्याने आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षे वनवासात राहिले. वनवास संपल्यावर अयोध्येत परत आल्यावर अयोध्यावासीयांनी आनंदाप्रीत्यर्थ नगरी सजविली होती. गुढय़ातोरणे उभारली होती. आपण सर्व गुढीपाडवा या आनंदाप्रीत्यर्थ साजरा करतो. 1528 मध्ये बाबर या परप्रांतीय आक्रमकाने मंदिर पाडून मशीद बांधली. त्याला 2028 मध्ये 500 वर्षे पूर्ण होतील. 80 टक्के हिंदू असलेल्या हिंदुस्थानात हिंदूंचे आस्था व श्रद्धास्थान असलेली रामजन्मभूमी मुक्त होऊ शकली नाही यापेक्षा दुर्दैवी घटना हिंदुस्थानसारख्या निधर्मी देशात कोणती असू शकते? देशातील जवळपास सर्वच रहिवाशांचे पूर्वज हिंदू होते यावर दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या घटनेने सर्वच धर्मांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचा कायदेशीर अधिकार तर दिला आहेच, शिवाय धार्मिक अल्पसंख्याकांना विशेष अधिकार दिलेले आहेत. सुमारे 500 वर्षे मुघलांनी, तर 150 वर्षे ब्रिटिशांनी देशावर राज्य केले. पैकी मुघल शासकांनी सक्तीचे धर्मांतर व हिंदूंच्या मंदिरांची मोडतोड केली होती हा इतिहास आहे. त्यापैकीच रामजन्मभूमी वाद ही एक घटना आहे. रामजन्मभूमी मुक्तीसाठी स्वातंत्र्यापूर्वी हिंदूंनी रक्त सांडले आहे, पण ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीनुसर हिंदू-मुसलमानांत वाद लावून दिला व प्रकरण कोर्टात गेले याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आजच्या निकालातही घेतली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विवादित जागेवर उत्खनन केल्यानंतर मंदिराचे अवशेष सापडले आहेत व त्याच कागदपत्रांच्या आधारावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. वादग्रस्त जागेवर नमाज अदा केली जात नव्हती व आताही नाही. देशातील 20 कोटींपेक्षा संख्येने अधिक असलेल्या मुस्लिमांपैकी अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळ व असदुद्दीन ओवेसीसारख्या काही नेत्यांचा विरोध सोडता बहुसंख्य मुस्लिमांचा विवादित जागेवर मंदिर बांधण्यास विरोध नाही. आता सुप्रीम कोर्टाचा सयुक्तिक निकाल आल्याने सर्वच हिंदुस्थानी सुप्रीम कोर्टाचे ऋणी आहेत.

खरे तर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होत नाही. तरीही न्यायालयाने खास या निकालासाठी शनिवारी कामकाज सुरू ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे याप्रकरणी 40 दिवस सलग सुनावणी झाली असल्याने ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी हा निकाल देणे आवश्यक होते. 17 नोव्हेंबरला रविवार असून सरन्यायाधीश निवृत्त होत असताना त्या दिवशी निकाल दिला जात नाही. त्यामुळे हा निकाल 14 किंवा 15 नोव्हेंबरला दिला जाईल अशी अपेक्षा होती, पण निकालानंतर त्यातील पक्षकारांकडून पुन्हा एकदा न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची इच्छा असल्यास वेळ मिळावा म्हणून याचा विचार करूनच न्यायालयाने 9 नोव्हेंबरला याप्रकरणी आपला निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाचही न्यायमूर्तींनी एकमताने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयात पुढील महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव आहे,

बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचाच अर्थ बाबरी मशिदीच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं हे सिद्ध होतं. रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. म्हणजेच श्रीराम हे काल्पनिक पात्र होतं हे पूर्वीच्या काँग्रेस सरकारने याच कोर्टात दिलेल्या सत्यवचनाला अर्थ नव्हता. या वादाचा निर्णय जमीन विवादाच्या कायद्यानुसारच निर्णय दिला जाईल. आस्था आणि विश्वास याबाबत कोणताही वाद होऊ शकत नाही. म्हणजेच ही रामाची जन्मभूमी आहे या हिंदूंच्या आस्थेचा विचार करावा लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पुरातत्व विभागाने दिलेल्या रिपोर्टनुसार मशिदीच्या जागी आधी मंदिरसदृश अवशेष होते व मशीद असल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही. तिथे 12 व्या आणि 16 व्या शतकात काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही. अठराव्या शतकापर्यंत तिथे नमाजाचे पुरावे नव्हते. आस्था आणि विश्वासाच्या आधारावर नाही, तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल. इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज पढला जात होता असा पुरावा नाही.

मुस्लिम पक्ष जमिनीवर रामलल्लाचा अधिकार नाही हे सिद्ध करू शकला नाही. रामाचा जन्म अयोध्येत जेथे रामजन्मभूमी आहे त्याच जागी झाला होता याचे पुरावे आहेत. 1885 पासून हिंदू चौथऱ्यावर व सीता रसोईघरातही पूजा करत होते असे पुरावे आहेत. राम मंदिर बनवण्यासाठी तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करणे, रामजन्मभूमी न्यासाला वाद असलेली जमीन देणे, अयोध्येतच मुस्लिमांना मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देणे असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने प्राप्त परिस्थितीत सर्वच संबंधितांच्या हितांचे रक्षण करणारा हा निकाल दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या