
>> डॉ. महेश गायकवाड
वृक्षारोपणासाठी नेमकी कोणत्या प्रकारची झाडे लावणे उपयुक्त ठरते याबाबतचं चित्र स्पष्ट नाही. जलद वाढ होणारी, शेतीला पूरक असणारी, नत्र जास्त साठवणारी, जमीन सुधारण क्षमता असणारी स्थानिक झाडे निवडावीत हेच पर्यावरण अभ्यासकांचे मत असते. हे मत नेमके कोणत्या निकषांवर आधारित असते, हे सांगणारा आणि वृक्षारोपणाबाबतचा संभ्रम दूर करणारा हा लेख.
आई आणि झाड’ याचं नातं म्हणजे आई जन्म देते आणि झाड श्वास देत माणसाला जगवत असतं… आपल्या आयुष्यात ज्या झाडाचं पान, फूल, फळ, मूळ आपण खाऊ शकतो अशीच झाडे माणसाने लावली पाहिजेत जेणेकरून आपल्याबरोबर परिसरातील जैवविविधताही वाढेल याची पूर्ण काळजी एक झाड लावताना घेतली पाहिजे. जागतिक तापमान वाढ, वातावरण बदल व दुष्काळ या विविध समस्या गेल्या 10-20 वर्षांपासून आपण भोगत आहोत. यासाठी पाणलोट क्षेत्रात विविध कामे करत असताना स्थानिक वृक्षारोपण चळवळ अतिशय महत्त्वाची वाटते.
हिंदुस्थानातील भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाखाली असावे असा नारा देशभर असून त्यापैकी महाराष्ट्रात कागदावर 20.04 टक्के क्षेत्र वनाखाली असल्याचे अहवालात दिसून येते. कदाचित आपल्याला मिळणारा 21 टक्के ऑक्सिजन (O2) मिळावा आणि मानवजात जगावी यासाठी हे प्रमाण ठरलेले असावे असे मानले तर आजच्या हिंदुस्थानची अवस्था खूपच वाईट होत चालली आहे असे दिसून येत आहे.
सर्वात प्रथम आपल्याला वनीकरण, वृक्षारोपण करताना शास्त्र्ााrय माहिती घेऊनच महाराष्ट्रभर काम करावे लागेल, मात्र असे वन विभागात होताना दिसत नाही. आपल्या पर्यावरणाचा कोणताही विचार न करता आपला विभाग मोठय़ा प्रमाणात गेली अनेक वर्षे चुकीच्या पद्धतीने परकीय झाडे लावून वनीकरणाचे कार्यक्रम राबवीत आहे. वृक्षारोपण करताना एक अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यावी आणि ती म्हणजे फक्त स्थानिक व किफायतशीर झाडेच लावावीत. कारण आपली स्थानिक जैवविविधता वाचविणे खूप गरजेचे आहे. सद्यस्थितीत वनीकरण आणि वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून मोठय़ा संख्येने परकीय जातीची रोपे पिशव्यांतून आणायची व वृक्षारोपण करायचे. यामुळे ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत तिथल्या मातीला, वातावरणाला तसेच तेथे आढळणाऱया स्थानिक जैवविविधता यामध्ये कीटक, पक्षी, फुलपाखरे, प्राणी यांना पोषक नसणारी झाडे लावली तर स्थानिक वाढीसाठी उपयोग होणार नाही. तसेच एकाच प्रकारची झाडे लावल्यास हे उपयुक्त ठरणार नाही. स्थानिक झाडे लावून नैसर्गिक पुनर्जीवन केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता वाढेल. यासाठी किमान 3 ते 5 वर्षे हवी. कारण मूळ अधिवास नष्ट झाल्याने या पुढील काळात नियमित पाणी, मशागत आणि कुंपण आत्यंतिक आवश्यक आहे.
विदेशी प्रजाती का लावू नयेत
वनीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत 1970-80 च्या दशकात स्थानिक प्रजातीला तोंड देऊ शकतील अशी विदेशी झाडे भराभर लावली आणि एकसंघ हजारो एकाच जातीची झाडे लावण्यात आली. यात सुबाभूळ, नीलगिरी, ओस्टोलीयण बाभूळ, सुरू, सिल्वर ओक, उंदीरमारी अशी झाडे लावली. सुरुवातीला काही दुष्परिणाम दिसले नाहीत, मात्र हळूहळू याचे परिणाम दिसू लागले. यात काही झाडांचे परागकण हवेत पसरून श्वसणाचे रोग होऊ लागले. अशा झाडांखाली स्थानिक झुडपे जळू लागली, गवत यायचे बंद झाले. परिणामी माती धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागली. त्यामुळे माती वाहू लागली. परिणामी पाणी मुरण्याची क्षमता कमी होऊ लागली. तसेच विदेशी झाडे मोठय़ा प्रमाणावर जमिनीतून पाणी खेचून घेतात. त्यामुळे परिसरातील भूजलपातळी झपाटय़ाने कमी होऊ लागली. तसेच विदेशी झाडांची पाने खूप हळूवारपणे कुजतात. त्यामुळे त्या मातीत सूक्ष्म जीव जगू शकत नाहीत. त्यामुळे जैविक विघटन होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळय़ात किंवा वादळात विदेशी झाडे लवकर पडतात आणि जीवितहानीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर होत असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की, स्थानिक झाडांची पानगळीतूनच फक्त सुपीक माती तयार करण्याचे काम सूक्ष्म जीव काम करतात हे सर्व शेतकऱयांनी लक्षात ठेवावे. स्थानिक झाडेच जास्त प्रमाणात ऑक्सिजन व ओझोन देण्याचे काम करतात आणि वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात.
आपल्या जैवविविधतेचा विचार करता परदेशी झाडांवर बहुधा पक्षी घरटे करत नाहीत. केले तरी अनेकदा पावसात अशा पक्ष्यांची पिल्ले खाली पडून मारतात. अनेक कीटक, किडे, मधमाश्या यांना कसलेही फायदे मिळत नाहीत. परदेशी झाड म्हणजे जैविक अतिक्रमण असून आपल्या स्थानिक झाडांसाठी हानीकारक आहे. अशा परदेशी झाडांमधून अनेक घातक रसायने बाहेर पडतात, यामुळे इतर पिके व स्थानिक जैवविविधता धोक्यात येत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक झाडे खूप मोठय़ा प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेत असतात.
परकीय जातीची झाडे लावून स्थानिक माती, वातावरण तसेच स्थानिक जैवविविधता यामध्ये विविध कीटक, पक्षी, फुलपाखरे, प्राणी यांना पोषक नसणारी झाडे लावली तर त्याचा फायदा स्थानिक जैवविविधता वाढीसाठी होणार नाही. आपला विभाग नेहमीच एकाच प्रकारची झाडे शेकडो एकरांवर लावत असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वन्य जीव हानी होत असते. सर्वात वाईट म्हणजे भूजलपातळी वाढविणारी झाडे लावण्याऐवजी आपण नीलगिरीसारखी झाडे पूर्ण वनीकरणात लावल्याचे दिसून येत आहे. उंबर जगातील सर्वात जास्त पाणी जमिनीत सोडत असतो, मात्र आपला विभाग अशी देशी झाडे लावत नाही हे दुःखदायक वाटते. आपल्या चुकीच्या वृक्षारोपणाचा तोटा माळढोक पक्षाला झाला असून हा पक्षी आता दुर्मीळ ठरला आहे. यामुळेच वन विभागाने या पुढील काळात स्थानिक झाडे लावण्यासाठी स्वतःच्या ताब्यात असलेल्या नर्सरीत स्थानिक प्रजातींची रोपे लाखोंच्या संख्येने वाढविणे गरजेचे आहे.
आपल्याला राज्यात कोणती झाडे लावावीत याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. संशोधक गावपातळीवर काम करणारे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून सदर झाडांची यादी आणि महत्त्वाचे निष्कर्ष आपल्याकडे देत आहोत.
स्थानिक झाडे जैवविविधतेचे संरक्षण करतात म्हणून त्यांना देव वृक्ष असेही म्हणतात. यात वड, उंबर, पिंपळ, चाफा, तुळस, पारिजातक, शमी, चिंच अशी झाडे आहेत. कारण या झाडांतून ओझोन वायू जास्त प्रमाणात सोडला जातो. परदेशी वृक्ष मात्र ओझोन वायू सोडत नाहीत. म्हणून ज्यांना घरबसल्या ओझोन थेरपी घ्यायची असेल त्यांनी फक्त स्थानिक झाडेच लावावीत. सर्पगंधा, अश्वगंधा, शतावरी अशा मधुमेहावर उपयोगी आयुर्वेदिक वनसंपदा ते जाई, जुई, चमेली, मोगरा, रातराणी, पारिजातक अशा नैसर्गिक सुगंध थेरपी देणाऱ्या वनस्पतींचे अनंत उपकार लक्षात न घेता आपण विदेशी वनस्पतींच्या मागे लागतो हे चुकीचे आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे त्याची ऊर्जा घेऊन वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात आणि कसे औषधी गुण त्यांच्यात तयार होतात व नक्षत्राप्रमाणे जन्मलेल्या व्यक्तीला कसे फायदे होतात, हे तर फक्त स्थानिक झाडांमध्येच आहे. शिवाय नक्षत्रवन ही संकल्पना फक्त स्थानिक वृक्षांनाच आहे. वड, आंबा, पिंपळ, चिंच, रामफळ, सीताफळ, पिम्परण, नंदृक, बाभूळ, बोर, उंबर, जांभूळ, बिबा, शेवगा, पळस, कवट, बेल, कडीपत्ता, कडुलिंब, अंजीर, खैर, अर्जुन, अंजन, आपटा, मेडसिंगी, मोहा, आवळा, देवबाभुळ, भोकर, चंदन, गुळभेंडी, हिरडा, बेहडा, सीतेचा अशोक, काटेसावर, सोनचाफा, बहावा, पळस, पांगारा, तामण, करंज, फणस अशी विविध झाडे आपल्या जागेनुसार लावावीत. अगदी परवाच थोर निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी कुसुम्ब आणि रक्तचंदन व वड, उंबर जातीची झाडे लावली पाहिजेत अशी माहिती दिली. यात कुसुम्ब तर भरउन्हाळय़ात आपल्या पानातून तुषार सिंचन करीत परिसर थंड ठेवतो, रक्तचंदन तर वातावरणातील कार्बन शोषून घेतात. त्यामुळे अनेक आजार बरे होतात.
(लेखक पर्यावरणतज्ञ व निसर्ग जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.)
[email protected]


























































