सवाष्णी घाट – तेलबैला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता दामले

सवाष्णी घाटाचे मोठे टप्पे पार केले होते आणि मुळशी भागातील तेलबैला अगदी दृष्टिपथात आला होता. तिथून खाली बघताना नजर ठरत नव्हती. पुढे वाट वाकडी करून ठाणाळे लेण्यांकडे येण्याचे सार्थक झाले होते.

जूनमधल्या त्या सकाळी पाऊस रंगात आला होता. लाल माती, हिरवीगार शेते, नुकतेच पडू लागलेले छोटे-छोटे धबधबे, सारे दृश्य विलोभनीय होते. जांभूळपाडय़ाला पोहे, मिसळ, उपमा, शिरा, बटाटेवडा आणि मऊ लुसलुशीत उकडीच्या मोदकवर फक्कड चहा पिण्याची चंगळ केली आणि धोंडसेच्या दिशेने वेगाने निघालो. खोपोली-पाली रस्ता मस्त होता. धोंडसेवरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बहिरामपाडय़ाला पोहोचलो. सोबतीला वाटेने सुधागड आणि सरसगड होते. बहिरामपाडय़ामध्ये मुलांना विचारले, ‘‘चलता का वरती तेलबैलाला? सवाष्णीवर मुक्काम करून उद्या रात्री वाघजाईने उतरू या.’’ मग गजाननबुवा आपली काठी आणि पाण्याची बाटली घेऊन, घरी जाऊन कारभारणीला ‘‘उद्या परत येईन’’ असे सांगून आम्हाला वाट दाखवायला निघाले. हा चढ तसा फार तीव्र नाही, उंचीही बेताची. हसत-खेळत-मजेत जाऊ. आपल्याला साधारणपणे कुठे जायचंय याचा अंदाज यावा म्हणून ‘ळ’ आकाराच्या खिंडीच्या दिशेने जायचे आहे, असे गजाननबुवांनी सांगितले होते.

आमची स्वारी उत्साहात निघाली. फळझाडे फळांनी लगडली होती. बाजूला घनगड उभा होता. घनगडाला गेलो होतो तेव्हा मिळालेल्या पैऱया आणि घनगडाच्या गुहेकडून दिसणारे भूदृश्य दोन्ही खास… सरसगडाला जाताना उन्हामुळे चक्कर आली होती आणि सुधागडाची वाट दाट जंगलातून जाणारी, शीतल छाया देणारी आणि छोटय़ा-छोटय़ा शिडय़ांनी चढवणारी. प्रत्येक वाटेचा पोत वेगळा. अस्वलखिंडीच्या वाटेतले जादूचे गवत, दवाने भिजलेली पाती, काही स्मरणचित्रे तरळून गेली. दाट जंगल आणि हिरव्या पालवीची कोवळीक मन प्रसन्न करत होती. पाऊसवारा वाहत होता, पण पाऊस लपाछपी खेळत होता.

सुधागडाच्या समोर मोकळी जागा बघून डबे काढले. आता सवाष्णी घाटाचे मोठे टप्पे पार केले होते आणि तेलबैला अगदी दृष्टिपथात आला होता. आजच तिकडेही जाऊ या, विचार झाला होता. दुपारचे अडीच-तीन वाजले होते आणि दूर बासरी साद घालत होती. रानात गुरे चरत होती. जवळच मुले खेळत होती. जवळ जाऊ तसे तेलबैला आपले वेगळे रूप दाखवत होते.
तेलबैला गाव आले. जेवणाची आणि राहण्याची सोय कुठे होईल का, चौकशी करू लागलो. सगळी घरे मेन्यांची आहेत. गजाननबुवांचे सोयरे भेटले. मास्तरांचे घर मोठे आहे. राहण्याची सगळी व्यवस्था झाली. पिण्याचे पाणी हापशाचे. सामान घरात ठेवून लगेच तेलबैलाकडे निघालो. दुसऱया रस्त्यानी तेलबैलाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. झेंडय़ाची काठी लागली. तिथून खाली बघताना नजर ठरत नव्हती. मंदिराकडे निघालो. रोवलेला त्रिशूळ, शेंदूर फासलेले देव आणि एक पाण्याचे टाके असावे आतमध्ये. हे मंदिर दोन डोंगरांच्या सांध्यात बांधले आहे. ‘देवाचिये द्वारी’ दोन कडय़ांच्या खिंडीत बसलो होतो. समोर तेलबैला प्रस्तरारोहणासाठी लावलेले बोल्ट दिसत होते. खालच्या बाजूला मंदिर होते आणि वर उंच कडे. आरामात खाली उतरलो. गावात फेरफटका मारला. बाजूला डोंगर दिसत होते. सूर्यास्ताचे काही चिन्ह नव्हते, पण पावसाचे ढग मात्र जमू लागले म्हणून आम्ही परत फिरू लागलो. थोडा विसावा खाऊन भरपेट जेवण आणि जेवणानंतर शतपावली.

पहाटे साडेपाचला झोप उघडली. मुखमार्जन करून चहा झाल्यावर मेन्यांबरोबर पह्टो काढून, गजानन बुवांना सोबत घेऊन वाघजाईच्या रस्त्याला लागलो. उतार सुरू होण्याआधी सारा परिसर नजरेच्या कवेत घेणारी आणि सुधागडाची सोबत असणारी मस्त मोकळी जागा मिळाली. पुन्हा एकदा आसमंतात पावा घुमत होता. आज मात्र येताना त्या बासरीवाल्याची आणि झाडांचा घोडा करणाऱया मुलांची थोडी वाट वाकडी करून भेट घेतली. भरपूर न्याहारी करून लगबगीने निघालो. या वाटेवर बाजूला दिसणारी ठाणाळे लेणी सोबत करत होती. देवीचे ठाणे आले. भगवा ध्वज फडफडत होता. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर लेणी दिसली. वाघजाई घाट पूर्ण उतरून मग लेण्यांची वाट शोधायची होती. म्हणून मग लेण्यांच्या उंचीवर आल्यानंतरही बरेच उतरून गेलो. ठाणाळे गावाकडे जाणारी वाट दिसली, पण वाघजाई घाटातून ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट शोधायची होती. दिशेचा अंदाज घेऊन साधारण मळलेल्या पायवाटेला लागलो आणि अचानक लेणी समोर आली. सुरुवातीची काही लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. पुढे एक प्रशस्त लेणे लागले. या लेण्यांमध्ये सुंदर कोरीवकाम आणि कातळात कोरून काढलेल्या सुबक पायऱया होत्या. कमळ कोरलेले होते. तसेच कमानींच्या सोंडेत कमळ घेतलेले दोन हत्ती, सर्प, वाघ वगैरे सुंदर कोरीवकाम होते. यापुढील एका लेण्यात बरेच स्तूप होते. वाट वाकडी करून ठाणाळे लेण्यांकडे येण्याचे सार्थक झाले होते आणि पावसाने भिजवून चिंब केले होते.

दुपारचे अडीच-तीन वाजले होते आणि दूर बासरी साद घालत होती. रानात गुरे चरत होती. जवळच मुले खेळत होती. जवळ जाऊ तसे तेलबैला आपले वेगळे रूप दाखवत होते. हे डोंगर इतक्या जवळून प्रथमच बघत होते. डावीकडे नवरा-नवरी आणि वऱहाडे होती.
‘देवाचिये द्वारी’ दोन कडय़ांच्या खिंडीत बसलो होतो. समोर तेलबैला प्रस्तरारोहणासाठी लावलेले बोल्ट दिसत होते. खालच्या बाजूला मंदिर होते आणि वर उंच कडे. आरामात खाली उतरलो. अजून उजेड होता. कारण तो 21 जून म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस होता.