
>> दिलीप जोशी
सध्या जो दूर संपर्काचा काळ आपण अनुभवत आहोत त्यातला बराचसा भाग या दूरसंचार सेवेने सोपा केला आहे. माणसं एकमेकांना भेटू शकत नाहीत पण सुखदु:खाच्या प्रसंगी दुरून का होईना दिलासा देऊ शकतात. याच्या कितीतरी गोष्टी गेल्या काही दिवसात तुम्ही ‘ऑनलाइन’ वृत्तपत्रांतून किंवा टीव्हीवरून जाणल्या असतील. जगात ‘कोरोना’ने ठाणबंद केलेली माणसं आपला मोबाईल फोनवरून परस्परांशी संपर्क साधतायत. ज्यांच्याकडे अद्ययावत फोन आहेत ते तर एकमेकांना व्हिडीओ कॉलवर पाहू शकतायत. सुट्ट्यांची प्रत्यक्ष भेट जेव्हा केव्हा होईल तो सुदिनच. तो लवकर यावा यासाठी संशोधन आणि प्रार्थना दोन्ही सुरू आहे. तोपर्यंत तरी दुधाची तहान ताकावर भागवण्याला पर्याय नाही.
प्राचीन पुराणकथांमध्ये होणारी ‘आकाशवाणी’ हा चमत्कार असायचा. ती ‘रेडिओ’च्या रूपाने प्रत्यक्ष अवतरेल याची कल्पनाही कोणी सतराव्या शतकापर्यंत केली नव्हती. अठराव्या शतकात सॅम्युअल मोर्स या चित्रकाराला ‘टेलिग्राम’ची कल्पना सुचली. तसे प्रयोग इतरत्र सुरू होतेच. मोर्स मात्र त्याच्या पेटिंगमध्ये गुंतला होता. प्रतिभावंत व्यक्ती एकाचवेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात. कला आणि विज्ञान यात सारखंच यश मिळवणार्या लिओनार्दो विंचीप्रमाणेच चित्रकार गोर्सला विज्ञानाची आवड होती. रेनेसॉ किंवा पुनरुत्थानाच्या कालखंडातला युरोप एकामागून एक शोध लावत होता. अमेरिकेतही त्याचे पडसाद उमटत होते. चित्रकलेचा अधिक अभ्यास करण्यासाठी युरोपला गेलेला सॅम्युअल 1832 मध्ये अमेरिकेत बोटीने परत येत असताना त्याची गाठ बोस्टन येथे राहणार्या जॅक्सनशी पडली. जॅक्सनचा इलेक्ट्रॉमॅग्नॅटिझमचा अभ्यास होता. त्याने प्रभावित होऊन सॅम्युअलनेही आपली चित्रकला बाजूला ठेवली आणि संदेशवहनाचं यंत्र बनवण्याची खटपट करू लागला आणि त्याने एका टेलिग्राफीक यंत्राची निर्मिती केली. त्यानंतर ‘तार’ करण्यासाठी जगभर वापरली गेलेली सांकेतिक भाषा ‘मोर्स कोड’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्यामध्ये प्रत्येक इंग्लिश अक्षराला एक गोळा आणि एक रेषा असं चिन्ह असायचं. उदा. ‘ए’ म्हणजे एक ठिपका व एक रेघ अशी तर झेडसाठी दोन ठिपके व दोन रेघ असं चिन्ह. याचा वापर करून कमी उर्जेत दूरवर संदेश पाठवता येऊ लागले. आपल्याकडे ती यंत्र पोस्ट ऑफिसमध्ये असत. ‘कडकट्ट’ असा आवाज करत त्रोटक संदेश धाडत. तो लगेच शेकडो किलोमीटर दूर जात.
त्यानंतर दूर संपर्काच्या क्षेत्रात जगाने अल्पावधीत प्रगती केली. टेलिग्राफ (दूर-आलेख) यशस्वी झाल्यावर टेलिफोन (दूरध्वनी) आला. आपल्या परिचयाची व्यक्ती दूरवरून बोलते आहे ही कल्पनाच त्यावेळी इतकी विस्मयकारक होती की काही जणांना ती ‘भुताटकी’ वाटली!
फोन आपल्याकडे 1882 मध्ये मुंबईत आला. ‘मुंबईचे वर्णन’ या आचार्य आणि शिंगोणे यांच्या पुस्तकात त्याचं सविस्तर वर्णन आहे. टेलिग्राममुळे तर इंग्रजी प्रशासनाला खूप फायदा झाला. संदेशवहन वाढल्याने सर्वदूर घडणार्या घटनांची माहिती ताबडतोब मिळू लागली.
रेडिओ या माहिती आणि मनोरंजनाच्या साधनाचा वापर आजही एकविसाव्या शतकात प्रभावीपणे होतो. मी रोज रेडिओवर प्रसारित होणारे अनेक कार्यक्रम ऐकतो. ट्रान्झिस्टर रेडिओ आल्यापासून रेडिओ कुठेही ऐकू येऊ लागला. आता तर तो मोबाईल अॅपमध्येही असतो. जनसामान्यांचं रेडिओवरचं प्रेम अजूनही ओसरलेलं नाही. 1927 मध्ये मुंबईत सुरू झालेलं रेडिओ प्रक्षेपण 1956 पासून सरकारी ‘आकाशवाणी’ झालं.
त्यानंतरचं दूरस्थ संपर्काचं साधन म्हणजे टेलिव्हिजन दूरदर्शन. सुरुवातीला ते एकतर्फी होतं. परंतु तंत्रक्रांतीबरोबर त्यात प्रेक्षकांचा किंवा दूरवर असलेल्यांचा पडद्यावरचा सहभाग शक्य झाला. ते तंत्रज्ञान ‘इंटरनेट’ने आणलं. आरंभी केवळ क्षणात ‘पत्र’ किंवा ‘टेक्स्ट’ पाठवणारं इंटरनेटपुढे इतकं विकसित झालं की त्यावरून चित्र, फिल्म पाठवता येऊ लागल्या. त्यापूर्वीच्या काळात टेलिप्रिंटर नावाचा प्रकार येऊन गेला. दूरवर ‘टाइप’ केलेलं आपल्याला मिळत असे. त्याचप्रमाणे त्या तंत्राने प्रक्षेपित केलेला ‘रेडिओ फोटो’ही चकीत करणारी गोष्ट वाटायची.
गेल्या पंचवीस वर्षांत दूरसंपर्कात क्षणोक्षणी नवीन काहीतरी घडत आहे. मोबाईल फोन आल्यावर वाटणारं आश्चर्य कमी होतं न होतं तोच व्हिडीओफोन आला. आता ‘व्हॉट्स अॅप’वर विनासायास एकमेकांना पाहात बोलता येतं. दूरसंपर्काच्या प्रगतीचं आश्चर्य वाटण्याचा काळ जाऊन तो सहजतेने आत्मसात करणारी पिढी जन्माला आलीय. या दूरसंपर्क साधनांनी जग निश्चितच ‘जवळ’ आणलं. माहितीच्या आंतरजालाने (इंटरनेट) अंतर ‘कमी’ केलं. आज जगातील घरी बसलेली माणसं ‘ऑनलाइन’ काम करतायत ती त्यामुळेच.





























































