
>> रवींद्र अनंत पर्वते
रोज टीव्ही लावला की कश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद व दोन गंभीर जखमी, दोन-तीन कश्मिरी पोलीस, लान्स नायक शहीद. हे आता रोजचेच झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून, ऐकून मन सैरभैर होते. तळपायाची आग मस्तकात जाते. अलीकडे तर अजून एक हैराण करणारी बातमी ऐकली. मध्य प्रदेशमध्ये सीओडी/ऑर्डिनन्स फॅक्टरीतून 65-67, एके-47 रायफली गहाळ/बेपत्ता/चोरीला गेल्या. म्हणजे प्रशासनातही भ्रष्ट कीड किती भिनली आहे त्याचेच हे उदाहरण आहे. पुढे जाऊन त्याचाच वापर करून बिहारमधील दोन नेत्यांची हत्या केल्याचे समोर येत आहे. म्हणजे चाललंय काय या देशात? तीच शस्त्र पुन्हा आपल्याच सैनिकांवर चालविण्यासाठी वापरली जात नसतील कशावरून? किती दिवस तेच तेच गुळगुळीत, मुळमुळीत झालेले शब्द वापरून इशारे देणारे, कडक शब्दांत निषेध करणारे खलिते पाठवायचे? आता पुरे झाले. एक सामान्य माणूस म्हणून जर माझे एवढे टोकाचे विचार होऊ शकतात, तर आपल्या सैन्याला एक ऑर्डर पुरेशी आहे. मग पुन्हा मान वर करून बघायची कुणाची हिंमत होणार नाही. हीच ती वेळ आहे पाकिस्तानला हिंदुस्थानचे पाणी दाखवण्याची. मग चीनची पण हिंमत होणार नाही कुरापती काढण्याची. आता जशास तसे उत्तर देण्याची भाषा करण्याऐवजी, सर्जिकल स्ट्राइक करण्याऐवजी, कॅरममधील फर्स्ट स्ट्राइक करणार्याप्रमाणे ‘स्टार्ट टू फिनिश स्ट्राइक’ करा व 2019 पूर्वीच एक विषय पूर्णत्वास न्या. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा. हीच खरी सर्व शहीद सैनिकांना आदरांजली ठरेल.





























































