
>> तृप्ती कुलकर्णी
कविता लिहिण्याची खरी वेळ कोणती किंवा बरी वेळ कोणती, याचं उत्तर देता येणं कठीण. कारण काव्यनिर्मितीचा प्रत्येक क्षण कवीच्या दृष्टीने ‘खरा’ आणि ‘बरा’ असतो. कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर. तेव्हा स्वशोधासाठी जवळच्याच्या नजरेत किंवा आरशात डोकावणं, जागोजागी सेल्फी काढणं यापेक्षा कवितेचं बोट धरून स्वतमध्ये रमणंच श्रेयस्कर. त्यातूनच सुरू होतो एका शून्यापासून दुसऱया शून्यापर्यंतचा दीर्घ प्रवास आणि सापडू लागतं
स्व-अस्तित्व.
धर्मवीर पाटील यांचा ‘दिवस कातर होत जाताना…’ हा सुमारे 140 पानी कवितासंग्रह वाचताना हाच विचार प्रकर्षाने जाणवतो. अन्वर हुसेन यांनी चितारलेले मुखपृष्ठ, मलपृष्ठ तसेच आतील चित्रे कवितांच्या आर्ततेला आणि कवीच्या मनःस्थितीला अगदी समर्पक अशीच आहेत. या संग्रहातल्या कविता उदास वाटल्या तरी त्यामागे चिंतनशीलता आणि स्थितप्रज्ञता आहे. दोन दशके पत्रकारीतेत काम केलेल्या कवीने समाज जीवनातील बदल टिपले, अनुभवले, भोगले आणि त्यातून त्याची कवितेशी नाळ जुळली. जीवनातील सुख-दुःख, यश-अपयश त्याने कवितेला अर्पिले. कर्मकांडापासून दूर राहणारा हा कवी कवितेच्या ‘निर्मिका’ला मात्र शरण जातो.
मानवी मनाची कुठलीही गोष्ट निरनिराळ्या दृष्टीने जाणण्याची अद्भुत क्षमता असल्यानं साहजिकच कवितेच्या व्यापकत्वाशी त्याचा एक वेगळाच ऋणानुबंध आहे. तोच या समस्त कवितांमधून दिसतो. संग्रहातील 89 कविता ‘दिवस कातर होत जाताना’, ‘सोलून काढता येत नाहीत त्वचा’, ‘चिकटलेलं असतं दुःख देहाला’, ‘सलत राहते आत दीर्घ जीवघेणे’ अशा चार विभागांत विभागलेल्या आहेत. यातून जीवनातील पोकळ्या, नात्यांची गरज, प्रेम, भूतकाळ, समाजातील घटनांचे भान आणि अंतर्गत संघर्ष अशा अनेक पैलूंचा वेध घेतला आहे.
समुद्र कवितेत आत्मभान जागृत झाल्याने कवीला आलेली जगण्याबद्दलची तटस्थवृत्ती चटकन लक्ष वेधते. तो सहज म्हणतो “अथांग सागरात बुडवता यावीत दुःखं; एवढं सोपं असायला हवं होतं आयुष्य.” आयुष्याबद्दलची विलक्षण उत्कंठा हा या कवितांचा स्थायी भाव. मग ती कधी भवतालातल्या घटनांमधून, तर कधी अंतर्गत संघर्षामधून शोधली जाते अन् ‘क्षण’सारख्या कवितेतूनही प्रकटते …
आपणच जबाबदार असतो आपल्या चुकांना आणि तरीही दोष देत राहतो
नियती, भवतालाला
तेव्हा काहीतरी अपूर्णत्व वाटत राहतं आपल्यातच, ही संदिग्ध वेळ भयंकर
काहूर घेऊन येते आयुष्यात
यात कसल्याही तक्रारीशिवायचं जगणं स्वीकारता आल्याची प्रगल्भता सुखावते.
या मुक्तछंद कवितांना अंगभूत लय, ठाम स्वर आणि ध्येय असल्यामुळे त्यात बंडखोरी, गाव-शहरातील तफावत, आईचं तत्त्वज्ञान, प्रेयसीचा विरह, महापूर अशा विविध विषयांचं प्रतिबिंब दिसतं. कवी प्रश्न विचारायलाही मागे राहत नाही. आक्रमक झुंडीला थेट विचारतो, “झुंड नेमकं काय साध्य करते?” आणि तिची मानसिकताही त्यातून अधोरेखित करतो,
करण्यासारखं काहीच हाती
नसल्याच्या काळात
काहीही करायला तयार होणाऱयांचं
संख्यात्मक प्रमाण असंख्य कोटीत असताना
कोणीही मोजत बसत नाहीत
बरोबर कोण आणि चुकीचं कोण…
आजच्या समाजातील बेबंद कोलाहल, फुकट लढाया आणि दिशाहीन समूह यावर तो मार्मिक भाष्य करतो आणि याच्या शेवटच्या कडव्यात तो याचं कारणही सांगतो. सत्ताबदलासाठी घडवल्या जाणाऱया या झुंडी सामान्यांना नक्की किती उपयुक्त ठरतात असा बोचरा सवाल विचारतो.
प्रत्येक कवितेचा विशाल पट आणि अनेक अर्थच्छटा इथे अल्पक्षरांत मांडणे अशक्य आहे, पण जाता जाता काही कवितांचा मी आवर्जून उल्लेख करेन. ‘पोकळी’, ‘अंगण’, ‘प्रिय अॅन्जोलीना’, ‘स्टोरी इथेच संपत नाही’, ‘आशावाद’, ‘उदास संध्याकाळी’, ‘संदर्भहीन’, ‘आत्महत्येची चिठ्ठी’, ‘मला अदृश्य व्हायचंय’, ‘बदल’ इ. या कविता विचारांना चालना देतात. स्व-अस्तित्वाचा शोध घेऊ पाहणाऱया प्रत्येकानं त्या एकदा तरी वाचाव्यात. तसंही कवीनं आपल्या ‘सगळं जग’ या कवितेत म्हटलंय, “जो स्वतची समजूत काढू शकतो ना, तो सगळं काही करू शकतो या जगात.”
दिवस कातर होत जाताना
कवी ः धर्मवीर पाटील
प्रकाशक ः रेड स्पॅरो ए मीडिया हाऊस