जैव संकेत – प्राणवायूचे मोल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. श्री. दे. नाईक

एरवी आपण ज्या सहजतेने श्वास घेतो ती क्रिया लक्षातही येत नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात तसं ‘अरे जगनं, मरनं एका सासाचं अंतर’ या ‘एका सासाच्या अंतरा’च्या वेदना काय असतात हे कोरोना काळात अनेकांनी अनुभवलं. म्हणूनच जीवनदायी प्राणवायूचं मोल महत्त्वाचं.

आपला नकळत आणि अव्याहत होणारा श्वासोच्छ्वास ही एक जैवरासायनिक प्रक्रिया आह. श्वसनाचा खरा अर्थ अन्नघटकांच्या चयापचय (मेटॅबोलिझम) क्रियेतून प्राणवायूच्या मदतीने ऊर्जा निर्माण करणे! ही जैवरासायनिक ‘प्रक्रिया’ आयुष्यभर चालते. आपल्या छातीच्या पिंजऱयातील दोन फुप्फुसांवर जे अभ्रे असतात, त्यांना प्लुटा असं म्हणतात. घशापासून सुरू होणाऱया चार ते पाच इंच लांबीच्या आणि दोन सेंटिमीटर व्यासाच्या श्वसननलिकेच्या दोन शाखा असतात आणि त्यांनाही पंधरा ते वीस उपशाखा फुटलेल्या असतात. त्यांच्या टोकाला सूक्ष्म म्हणजे पॉइंट एक मिलिमीटर व्यासाच्या नलिका असून त्याना श्वसनिका (ब्रॉन्क्युअल) म्हणतात. या एवढय़ा नलिकाजाळय़ाच्या शेवटी फुगा किंवा द्राक्षाच्या घडासारखे दिसणारे वायुकोष (अल्विओला) असून या सर्व यंत्रणेद्वारे श्वासोच्छ्वास घडतो. आपण श्वास घेतला की, हवेतील प्राणवायू (ऑक्सिजन) आणि कर्बद्विप्राणिल वायू (कार्बन डायऑक्साईड) यांची देवाण-घेवाण फुप्फुसातल्या सुमारे तीस कोटी वायुकोषांद्वारे केली जाते…आणि ही क्रिया एक मिनिटाला चौदा ते पंधरावेळा घडते. यावरून गुंतागुंतीच्या श्वसन यंत्रणेची रचना आणि कार्य हा एक ‘चमत्कार’च वाटू लागतो.

छातीच्या पिंजरा बारा फासळय़ांनी (बरगडय़ा) बनतो. त्यामध्ये चिवट स्नायूंची वीण असते. छाती आणि उदरपोकळीच्या मधोमध श्वासपटल किंवा डायफ्रॅम असतो. त्यांच्यासह छातीच्या पिंजऱयाला जोडलेले गळय़ाचे स्नायू श्वास घेताना भाल्यासारखं काम करतात. श्वास आत घेताना (पूरक श्वास) श्वासपटल सपाट होऊन खाली जाते, तर श्वास सोडताना (रेचक श्वास) ते जाऊन घुमटाकार धारण करतो. म्हणून श्वासोच्छ्वासाच्या क्रियेत श्वास घेताना बरगडय़ा उचलल्या जाऊन छातीची पोकळी फुगवली जाते, तर उच्छ्वासाच्या वेळी आकुंचित केली जाते. श्वासाची गती तो किती दीर्घ (डीप) घ्यावा याचं नियंत्रण ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा दोन्ही प्रकारे होतं. आपला नेहमीच्या श्वासोच्छ्वास अनैच्छिक (नकळत) पद्धतीनेच सुरू असतो. प्राणायामाच्या वेळीही हेतुपुरस्सर दीर्घ श्वास आणि तो रोखून धरणे या क्रिया ऐच्छिक असतात. आपल्या आयुष्यभराच्या श्वासोच्छ्वासाचं नियंत्रण मेंदूच्या मागच्या भागात असलेल्या मस्तिष्कपुच्छ (मेडय़ुला ऑबलांगेटा) आणि पॉनॅस (अनुमस्तिष्क) यातील केंद्रातून होते. श्वासोच्छ्वासात प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करताना सूक्ष्म केशवाहिन्यांमधल्या लाल पेशींचं कार्य महत्त्वाचं ठरतं. यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरेसं म्हणजे किमान चौदा ग्रॅमपर्यंत असावं लागतं.

दिवसाला सुमारे पंचवीस हजार वेळा श्वास घेताना आपण दहा ते बारा हजार लिटर हवा आत घेत असतो. हवेतलं प्राणवायूचं एकवीस टक्के प्रमाण लक्षात घेता आपण रोज दोन ते अडीच हजार लिटर प्राणवायू घेत असतो. आता पृथ्वीवरच्या सात अब्ज लोकांनी सातत्याने एवढा प्राणवायू शोषला तर तो संपत नाही का? याचं कारण म्हणजे प्राणवायू (ऑक्सिजन) स्वतः जळत नाही. तो केवळ कोणत्याही ज्वलनाला मदत करतो. म्हणूनच आपल्या आजच्या श्वासातील ‘अमर’ प्राणवायू हजार वर्षांपूर्वीही कोणीतरी श्वसनातून घेतलेला असू शकतो.

[email protected]