
>> विनायक
पृथ्वीवरच्या 195 देशांपैकी तुवालू हा एक स्वतंत्र सार्वभौम देश असल्याची माहिती फारशी कुणाला असण्याची शक्यता नाही. कारण त्याची तशी ‘व्यावहारिक’ किंवा राजकीय गरजही नाही. जगभरच्या ‘चॅनली’ बातम्यांमध्ये महासत्तांचीच चर्चा अधिक होणं स्वाभाविक. मात्र पृथ्वीचा आणि त्यातही पर्यावरणाचा वगैरे अभ्यास करणाऱयांना तुवालू ठाऊक असेल. अवघ्या दहा हजार जनांचा हा देश. आपल्याकडच्या एखाद्या छोटय़ा खेडय़ासारखा, पण स्वतंत्र. आता ‘स्वतंत्र’ म्हटला तरी नऊ ताऱयांसह निळ्या पार्श्वभूमीवर कोपऱयात ब्रिटनचा झेंडा मिरवणारा. त्यांचं घोषवाक्य ‘तुवालू मो टे अटुआ’ म्हणजे ‘तुवालू विश्वनियंत्यासाठी!’ हा आठ बेटांचा समूह. तुवालूचा अर्थ (त्यांच्या भाषेत) ‘आठही एकत्र राहू’ असा. यातील ‘वाळू’ म्हणजे आठ. त्यांच्या प्राचीन कथेनुसार मूळपुरुष ‘इल’ याने खडकांचे आठ तुकडे करून तुवालू निर्माण केला. आता या देशाची नऊ बेटे त्यांच्या ध्वजावर दिसतात, पण पारंपरिक तुवालू (अष्टक) हे नाव कायम राहिलेय.
पृथ्वीवरच्या अशा छोटय़ा-छोटय़ा समूहांचासुद्धा स्वतंत्र इतिहास, भाषा, संस्कृती असते. अशा विरळ वस्त्या आपलं अस्तित्व आपली रुट्स (मुळे) टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आपला देश त्यांनाही प्राणप्रिय असतो, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तो नाईलाजाने सोडण्याची वेळ आली तर? असा ‘निरुपाय’ फार वेदनादायी ठरतो. आज तुवालू सोडून कायमचं ऑस्ट्रेलियाला निघालेल्यांची भावना तशीच असणार.
ग्लोबल वार्ंमग आणि वाढतं प्रदूषण याची चर्चा तर फार होते. जगातली सगळीच राष्ट्रे त्याबद्दल प्रचंड शाब्दिक कळवळा दाखवतात, परंतु आपल्या स्वार्थाला किंचितही ओरखडा उठणार नाही याची काळजी तथाकथित विकसित देश घेत असतात. त्यांची आपापसातली ‘साठमारी’ जगाचे वातावरण अधिक बिघडवत असते, पण लक्षात कोण घेतो आणि कशाला घेईल? परदुःख शीतल असतं असाच ‘प्रगत’ मानवप्राण्याचा स्वभाव.
परिणाम? तो अगदी नगण्य किंवा जगाच्या नकाशात ठिपक्याहूनही सूक्ष्म वाटाव्या अशा ‘देशां’मधल्या मानवी समूहांना लवकर भोगावा लागतो. फिजी या दक्षिण पॅसिफिक समुद्रातल्या न्यूझीलँडच्या उत्तरपूर्वेला (ईशान्येला) असलेल्या 18,300 चौरस किलोमीटरच्या देशालाही पूर्वी सागराच्या आक्रमणाचा फटका बसलाय. तिथे मूळचे हिंदुस्थानीसुद्धा बरेच आहेत. लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास. या देशाला सागराच्या वाढत्या पातळीचा धोका सतत भेडसावतोय. कारण पॅसिफिकमधलीच सॉलोमन बेटे पाण्याखाली गेलेली त्यांनी पाहिलेली आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरच्या लोकांचे पुनर्वसन त्यांनी आधीच सुरू केलेय.
आपल्या अगदी जवळचा अत्यल्प लोकसंख्येचा मालदीव देशसुद्धा कधीतरी समुद्रात गडप होऊ या भावनेने ग्रासला आहे. त्यांचे माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद यांनी तर 2009 मध्ये आपले हे द्वीप-राष्ट्र कसे पाण्याखाली जातेय हे जगाच्या नजरेस आणून देण्यासाठी 13 अधिकाऱ्यांसह पाणबुडय़ाचा पोशाख घालून समुद्राच्या पाण्यात खोलवर मीटिंग घेतली. 17 ऑक्टोबर 2009 रोजी मालदीवच्या मंत्रिमंडळाची जलपृष्ठाखाली 20 फुटांवर झालेली ही बैठक प्रतिकात्मक होती.
त्यातून जग काही शिकलं? शून्य! मात्र त्यातून पृथ्वीवरचे अनेक देश बुडीत खाती कसे जाऊ शकतात याची झलक जाणवली. ज्यांना या ‘बुडत्या’ प्रश्नाला सामोरं जावं लागतंय त्यात आजच्या घडीला तुवालू देशाची वेदना सर्वाधिक आहे. या देशात 96 टक्के मुळचे तुवालू आदिवासी असून 2022 मध्ये देशाची एकूण लोकसंख्या 10,643 एवढीच होती. आधी
स्पॅनिश आणि 1892 पासून ब्रिटिशांचे राज्य असलेल्या या देशाला 1978 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण त्यांचे राष्ट्रगीत ब्रिटनचेच आहे. आता आपला देश पाण्याखाली जाणार म्हटल्यावर तुवालू सरकारने ‘फिलीपी युनियन’ करारानुसार हवामान बदलामुळे प्रतिवर्षी 280 तुवालूंना ऑस्टेलियात कायमचं जाता येईल असं ठरवलं आहे. मात्र 10 हजार तुवालूंपैकी अनेकांची लगेच सुरक्षित भूभागावर जायची इच्छा असल्याने ऑस्ट्रेलियाकडे ‘स्थलांतरित’ म्हणून जाणाऱया तुवालूंचे अनेक अर्ज प्रतीक्षेत आहेत.
आज अगदी नवतरुण असलेल्या तुवालूंना ऑस्ट्रेलियात जायची संधी मिळाली तर वृद्धावस्थेपर्यंत त्यांना आपला एकेकाळचा देश सागरार्पण झाल्याचे पाहायला मिळू शकते. नुकतेच ऑस्ट्रेलियात आलेले तुवालू तरुण म्हणतात, ‘‘तुवालू खूप शांत आहे. इथे मात्र (ऑस्ट्रेलियात) जीवनशैली वेगवान आहे.’’
आपल्याकडे महाभारतकाळात श्रीकृष्णाची द्वारका सागरात विलीन झाल्याची कथा येते. त्या द्वारकेचे काही अवशेष सागरतळी सापडल्याचंही म्हटलं जातं. तुवालूच्या तर फिल्मही आधुनिक काळात उपलब्ध असतील. या देशाचे अवशेष आणि तिथल्या बुडण्यापूर्वीच्या संस्कृतीचं दर्शन पडद्यावर दिसू शकेल, परंतु 2019 मध्ये त्यांचे प्रधानमंत्री डोक्यावर पारंपरिक फुलांचा मुकूट घालून त्यांच्या संसदेत बोलले ऑस्ट्रेलिया आपला मित्रदेश आहेच. आमचा देश पाण्याखाली जाणार म्हणून त्यांच्या देशात ते घ्यायलाही तयार आहेत. मात्र आपली संस्कृती, परंपरा आणि सार्वभौमत्वाचे काय हा गंभीर प्रश्न आहे. या उद्गारांमध्ये अस्तित्व नष्टतेची भयप्रद वेदना आहे, ती जगाला समजेल?