
>> प्र. ह. दलाल
राज्यात 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इयत्ता बारावी मराठी प्रथम भाषेची कृतिपत्रिका (प्रश्नपत्रिका) या वर्षीसुद्धा परीक्षा मंडळाने सदोषच काढलेली आहे. या पद्धतीने चुकीची प्रश्नपत्रिका काढण्याचा वसा परीक्षा मंडळाने जपला याबद्दल मंडळाचे अभिनंदनच करायला हवे!
प्रश्नपत्रिकेच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरांत ‘कृतिपत्रिका’ असे लिहिले असून काही सूचना दिलेल्या आहेत. त्यातील क्रमांक 1मध्ये ‘आकलन’ व ‘कृती’ हे दोन शब्द वेगवेगळे लिहिले आहेत. वास्तविक ‘आकलनकृती’ हा एकच शब्द आहे. शिवाय ‘कृती’ हा शब्द एकदा ‘कृती’ तर दुसऱयांदा ‘कृति’ असा लिहिला आहे. मग योग्य शब्द कोणता समजावा? विद्यार्थ्यांकडून मात्र मंडळ शुद्ध शब्दाची अपेक्षा करते. सूचना क्रमांक 2 मध्ये ‘लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे’ ही सूचना दिलेली आहे. खेदाची बाब अशी की, हे वाक्यच मुळात लेखन नियमानुसार नाही हे तथाकथित तज्ञ मंडळींना माहीत कसे नाही? ‘दुसऱयास सांगे ब्रह्मज्ञान…’ असेच म्हणायला हवे. स्वतः नियमानुसार लेखन करायचे नाही आणि विद्यार्थ्यांकडून मात्र त्याची अपेक्षा करायची या बेजबाबदारपणाला काय म्हणावे? आपली प्रश्नपत्रिका राज्यातील लाखो विद्यार्थी – पालकांपर्यंत पोहोचते आणि सर्व तेच प्रमाण मानतात त्यादृष्टीने या विद्वान मंडळींची जबाबदारी किती मोठी आहे याचेसुद्धा त्यांना भान नाही. मग गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा तरी का करतात?
मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा यावा म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, पाठ्यपुस्तक, परीक्षा मंडळ इ सर्वांनीच प्रमाणिकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंकांचे काटेकोरपणे पालन करावे असे सुस्पष्ट आदेश राज्य शासनाने प्रथम दिनांक 9 नोव्हेंबर 2009 आणि नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी काढले आहेत. मात्र शासनाच्याच अधीन असलेले शालांत परीक्षा मंडळ सातत्याने चक्क सोळा वर्षांपासून त्या आदेशाला तिलांजली देत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांकडून तुम्ही कोणत्या लेखन नियमांची अपेक्षा करता? शासनाने जे चुकीचे ठरविले आहे त्याला तुम्ही बरोबर म्हणणार का? चुकीच्या नियमांचा प्रसार करणार का? प्रश्नपत्रिकांतील चुकांबाबत मी गेल्या अनेक वर्षांपासून सतत लिहीत आहे, पण पालथ्या घडय़ावर पाणी पडले आहे. आता 12 फेब्रुवारी, 2026 च्या कृतिपत्रिकेत काय आहे ते बघा… ‘गद्य’, ‘पद्य’ असे न लिहिता ‘गदय’, ‘पदय’ असे लिहिले आहे व ते लेखन नियमानुसार नाही. कारण नियम असे सांगतो की, ‘द’ हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे ‘य’ आल्यास ‘द्य’ असे लिहावे. ‘दय’ असे लिहू नये. तसेच सदर पृतिपत्रिकेत सर्वत्र, विठ्ठल, सुद्धा, मुद्दा, द्वंद्व हे व असे जोडाक्षर न लिहिता चुकीच्या म्हणजे सूदद, मुद् दा, पदधत असे तोडाक्षर पद्धतीने लिहिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘श’ आणि ‘ल’ ही अक्षरे जुन्या नियमबाह्य पद्धतीने गाठयुक्त श आणि पाकळीयुक्त हिंदीत लिहितात तसा ‘ल’ लिहिला आहे. व्याकरण विभागातील प्रश्न खूपच सोपे म्हणजे 8 वी- 9 वीच्या विद्यार्थ्यांना सहज येतील असे आहेत. मराठी भाषा अध्ययन व अध्यापन यांची उद्दिष्टे, प्रश्नांचे स्वरूप या मुद्दय़ांकडे लक्ष देण्याऐवजी जास्तीत जास्त विद्यार्थी सहज पास होतील याकडेच अधिक लक्ष दिल्याचे जाणवते. उपयोजित मराठी या विभागात एखादी मुलाखत/ अहवाल किंवा प्रत्यक्ष वृत्तलेखन लिहायला सांगणेही चांगले झाले असते असे मला वाटते. व्याकरण विभागात ‘तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला’ या वाक्यात चांगले याऐवजी ‘मधुर बोला,सत्य बोला’ असे अधिक अर्थपूर्ण विशेषण वापरता आले असते. ‘चांगले’ याचा नेमका अर्थबोध होत नाही. तो सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. विद्यार्थ्यांचे शब्दभंडार समृद्ध करण्यासाठी अनेक समानार्थी शब्द त्यांना माहिती असावे हीच सदिच्छा. हा लेखप्रपंच केवळ त्रुटी, दोष दाखविण्यासाठी लिहिलेला नाही तर व्यवस्था निर्दोष असावी, व्यवस्थेला आपल्या जबाबदारीचे भान असावे याची जाणीव करून देण्यासाठीच आहे.

































































