ट्रॅफिक वडापाव

1389

>> संजीवनी धुरी-जाधव

ठाण्याचे ट्रॅफिक. वाहनांच्या लांबचलांब रांगा. पोटात भूक… हातातल्या मोबाईलचाही कंटाळा आलेला. अशा वेळी ताजा, स्वच्छ गरमागरम वडापाव खायला मिळाला तर…

ठाण्याच्या तीनहात नाक्यावर ट्रफिकमध्ये अडकला आहात… काहीतरी खायचे म्हटले तरी कारमधून उतरावे लागणार… तेवढय़ात समोर एक छान ड्रेस परिधान केलेला तरुण एका मस्त बॉक्समध्ये पॅक केलेला वडापाव घेऊन तुमच्याजवळ आला तर मुळीच भांबावून जाऊ नका. बिनधास्त तो वडापाव खा. कारण तुमच्या सोयीसाठी केलेला ट्रफिक वडापाव आहे. चवदार आणि त्याचबरोबर हायजीनचीही पूर्ण काळजी घेत घरी बनवलेला वडापाव. सध्या याच वडापावची चर्चा सगळीकडे सुरू आहे. विशेष म्हणजे ही भन्नाट संकल्पना एका मराठी तरुणाच्या डोक्यातून आलेली आहे. हा तरुण म्हणजे ठाण्याचा गौरव लोंढे. त्याचा हा अनोखा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या या वडापावची चव चाखायची तर ठाण्याच्या तीनहात नाक्यावर नक्कीच भेट द्यावी लागेल.

चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा या विचाराने गौरवला झपाटले होते. तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्टोअर मॅनेजर होता. त्यावेळी बाईकवरून ठाणे ते अंधेरी असा दोन ते अडीच तासांचा तो प्रवास करायचा. हा प्रवास वेळखाऊ आणि कंटाळवाणा असायचा. अशावेळी आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा असं त्यानं मनाशी ठरवलं आणि अखेर नोकरी सोडून ‘ऑन द रोड’ लोकांना खाता येईल असा व्यवसाय करायचा असं त्यानं ठरवलं. आता कोणता व्यवसाय करायचा याचा विचार त्याने सुरू केला तेव्हा ‘वडापाव’ हा सगळ्यांचाच आवडीचा खाद्यपदार्थ असल्याचं त्याला जाणवलं. लोकांना वडापाव आवडतो, मग तो गाडीवरचा असो किंवा आणखी कुठचा! त्यातही आपण जर उत्तम प्रतीचा वडापाव आणि चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून दिला तर लोक नक्कीच तो वडापाव घेतील असे त्याला वाटले. त्यामुळे ट्रफिकमध्ये अडकलेल्या लोकांसाठी ‘ट्रफिक वडापाव’ विकायचा असं त्यानं ठरवलं. याबाबत गौरव लोंढे म्हणतो, माझ्या या विचाराबद्दल मी बायको आणि आईला सांगितलं तेव्हा आधी त्या चक्क ‘नाही’ म्हणाल्या. कारण नोकरी चांगली होती, पगार चांगला होता. ते सोडून वडापाव काय विकायचा हे त्यांना मान्यच नव्हतं, पण अखेर त्यांनी मला साथ दिली. आम्ही थंड वडापाव ग्राहकाला देत नाही. वडे थंड झाले असतील तरीही पुन्हा ते तेलात टाकून विकत नाही. आम्ही ते बाजूला ठेवतो, पण ग्राहकांना नेहमी ताजे आणि गरमागरम वडापावच देतो असंही गौरव म्हणाला.

ट्रफिक लागले की, त्यात किती वेळ अडकावे लागेल याचा पत्ता नसतो. काही वेळा तासन्तास जातात, त्यात भूकही लागते. अशावेळी हायजीनमुळे आपण बाहेरचे पदार्थ खायचे टाळतो. ते कोणत्या कागदात ठेवले आहेत, तेल कोणते वापरले आहे या सगळ्या गोष्टी येतात, पण सिग्नलवरचा हा वडापाव तुम्हाला नक्की आवडणार. कारण तो घरगुती आहे. त्यासाठी स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचंच साहित्य गौरव वापरतो. हा वडापाव ग्राहकाला गरमागरम मिळणार आहे. एवढेच नाही, तर चांगल्या प्रकारे बॉक्समध्ये पॅक करून मिळणार आहे. सोबत टिश्यू पेपर आणि पाण्याची बाटली अशा कॉम्बो पॅकमध्ये केवळ वीस रुपयांत हा वडापाव आहे. गौरव सांगतो, या उपक्रमासाठी आमची सहा जणांची टीम कार्यरत आहे. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेत ठाण्यात तीनहात नाक्याच्या सिग्नलवरून प्रवास करत असाल तर या वडापावचा नक्की आस्वाद घ्या. सकाळी सहा ते रात्री दहा ही आमची सध्याची वेळ आहे. ऑफिसेस सुटतात. त्यामुळे ही वेळ आम्ही निवडली आहे. दिवसाला साधारण दीडशे ते दोनशे वडापाव विकले जातात. आमचा हा उपक्रम सुरू होऊन अजून दोनच महिने झालेत. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू केला. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण हळूहळू लोकांना माहीत व्हायला लागले. नियमित येणारे-जाणारे प्रवासी तर आमचे ग्राहकच झालेत, असेही गौरव सांगतो.

सध्या तरी आमची ही सुविधा केवळ ठाण्यातच आहे, पण लवकरच मॅनपॉवर काढली की, अन्य भागांतही ही सुविधा सुरू करणार आहोत. ठाण्याच्या इतर सिग्नल्सवरही वडापाव पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही तो सांगतो. सध्या त्यांच्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद येतोय. केवळ उत्कृष्ट पॅकेजिंग नाही, तर त्याचबरोबर तो चवीलाही मस्त आहे. त्यामुळे काही भूक लागली म्हणून, तर उत्सुकतेपोटी हे वडापाव घेऊन लोक त्याच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

बेरोजगार तरुणांसाठी आवाहन
गौरवने बेरोजगार तरुणांनाही आवाहन केले आहे. तो म्हणतो, आमच्या या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर 9867974555 या क्रमांकाकर संपर्क साधा. त्याचबरोबर https://www.facebook.com/Gaurav4555/ फेसबुक पेजवर ग्राहकांनी त्यांचा अनुभव शेअर करावा, असेही आवाहन केले आहे., असे मनोगत त्याने व्यक्त केले आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या