निमित्त – ‘अनुवादा’चं सहज चिंतन

>> नीलिमा देशपांडे

30 सप्टेंबर हा दिवस जगभरात अनुवाद दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकाच्या निर्मितीत लेखकाचं जितकं महत्त्व तितकंच ते पुस्तक जगभरातील इतर भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनुवादकाचंही. अनुवादित साहित्याला आपल्या साहित्य क्षत्रात वेगळं महत्त्व आहे. आपल्या भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवणाऱ्यांसाठी हा दिवस म्हणूनच महत्त्वाचा.

अनुवाद, भाषांतर म्हटलं की, आपल्या मराठी मनाला पटकन आठवतात ते ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ म्हणत संस्कृत गीतेचा रसाळ भावानुवाद मायमराठीत आणला. इतकेच नाही तर पुढे  ‘द्वैत न मोडता केले’ म्हणजे दोन्ही आपापल्या जागी ठेवत ‘आपणा ऐसें’ केले असं ते सांगतात तेव्हा हे वर्णन तंतोतंत अनुवादासाठीही आहे असे मला वाटते.

अनुवाद म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत वाहून नेलेला ‘साहित्यप्रवाह’. मूलतः प्रवाह वाहून नेणे आणि तोही त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता हे मोठेच काम.

जागतिकीकरणाचे वारे वाहिले, जगभरात एकमेकांशी व्यवहार सुरू झाले आणि भाषांची देवाणघेवाण वाढली. तौलनिक विचार करत राहणे हे तर माणसाचे स्वभाव वैशिष्टय़ आणि यातून घडत गेले अनुवाद. माझ्या भाषेतल्या लोकांना या भाषेतली ही माहिती, हे ज्ञान, ही गंमत कळायला हवी यातून अनुवादाचा जन्म झाला.

वैयक्तिक मला लहान असताना अनुवाद वाचताना मूळ भाषेत काय बरं असेल हे किंवा हे असंच असेल की आपल्याला कळावं म्हणून असं सांगितलं असेल असे कुतूहल असायचे. यातून अनेक भाषा शिकाव्यात, समजून घ्याव्यात याची गोडी निर्माण झाली, पण या शिकण्यालाही एक मर्यादा असते. मग आपणच आपल्याला कळलेल्या आणि भावलेल्या साहित्याला आपल्या भाषेत का आणू नये असा विचार सुरू झाला.

वाचनाची आवड होतीच, लेखनासाठी एक-दोन भाषांतरकारांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम सुरू केलं. या कामाची गोडीच लागली.

हळूहळू स्वतंत्र काम सुरू केलं. सुरुवातीच्या काळात ‘तौलनिक विचारांना’ फार वाहू न देणं हीच तपश्चर्या असते.

आतापर्यंत ‘कंटेंट रायटर’ म्हणून अनुवाद करताना भूगर्भशास्त्र ते सेंद्रिय शेती असे असंख्य विषय हाताळत होतेच, परंतु कादंबरी, कथा आणि कविता हा प्रकार मला अनुवादासाठी विशेष आवडत गेला. मानवी भावना जगभरात तशाच असल्या तरी त्यांना जोडली गेलेली प्रतीकात्मक रूपे अगदी वेगळी असतात. या रूपकांतून भावनेची जाणीव तीव्र होते. त्यामुळे त्या त्या प्रांताची रूपके समजून घेणे आणि अनुवादाच्या भाषेत उतरवणे महत्त्वाचे ठरते.

यामुळेच मागे एकदा ‘मृत्यू’ या विषयावरची फ्रेंच भाषेतील कविता मराठीत आणताना मृत्यूविषयक मराठी/हिंदू धर्मीय प्रतीकांचा वापर मला अनिवार्य वाटला. धार्मिक, प्रांतिक चालीरीती अनुवादाच्या हळव्या जागा म्हणता येतील.

अलीकडेच ‘कोकणच्या आख्यायिका’ या पुस्तकाचा अनुवाद करताना, लग्नाच्या विधींबद्दल लिहिताना लेखकाने अक्षता टाकण्याच्या विधीला ‘तांदळाचा मारा केला’ असे लिहिले होते. अर्थात, हे पुस्तक आपल्या मातीशी निगडित आहे. मूळ इंग्रजी लेखक ‘आर्थर क्रॉफर्ड’ यांनी आपली मराठी शिकून या कथा त्यांच्या मातीतल्या लोकांसाठी त्यांच्या भाषेत लिहिल्या आहेत. त्या पुन्हा आपल्या भाषेत आणताना त्याची गंमत जपण्यासाठी मी तो ‘तांदळाचा मारा’ तसाच ठेवला.

‘द कर्स ऑफ नालंदा’ या माझ्या अनुवादित कादंबरीचे (मूळ इंग्रजी) कथानक हिंदुस्थानातील नालंदा प्रांतातले असल्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक वातावरण मराठीला ओळखीचे वाटेल असेच असल्यामुळे अशा चालीरीती उलगडणाऱ्या विवेचनाची आवश्यकता वाटली नाही.

अलीकडेच एक आध्यात्मिक पुस्तक (मूळ इंग्रजी) मराठीत आणले आहे. तो अनुवाद करताना मराठी मातीला लाभलेला ‘विठुरायाच्या वारीचा’ वारसा आपल्याला आध्यात्मिकदृष्टय़ा किती सहजसंपन्न करून गेला आहे याची जाणीव झाली.

अनुवाद किंवा भाषांतर ही सहजपणे करण्याची गोष्ट नसली तरी त्यात ‘सहजभाव’ अतिशय आवश्यक आहे.

सुदैवाने, मराठी भाषेत अनेक अनुवाद होत आहेत हे भाषा संपन्न होण्याचे लक्षण आहे.

अनुवाद कुणी करावा असा एक विचार समोर येतोच. एखादी भाषा कळणे, उत्तम बोलता येणे आणि अनुवाद करता येणे या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे एखादा पदार्थ चांगला जमत असला की, ‘चला हॉटेल उघडू या’ या टिपणीने अनेक क्षेत्रांत व्यवसायाचा आत्मविश्वास फाजील वाढला आहे. यातून अयशस्वी होण्याचे प्रमाण जास्त असणे स्वाभाविक आहे. मात्र याचे खापर एकूण क्षेत्रावर फुटणे दुर्दैवी आहे.

त्यामुळे अनुवादकाने आपला अभ्यास, सराव पूर्ण करून या क्षेत्रात उतरणे अधिक चांगले. ही एक कला आहे. त्यामुळे शास्त्रशुद्धतेबरोबर कलात्मक दृष्टिकोन विकसित होत राहिला पाहिजे. स्वतः अनुवादक उत्तम वाचक असावा.चौफेर विषयांवरचे वाचन त्याची भाषा समृद्ध करते. याचबरोबर मूळ भाषा आणि अनुवादाची भाषा यांचा एक सामाजिक तसेच सांस्कृतिक आढावा घेतलेला असणे आवश्यक असते. क्वचित ठिकाणी बोलीभाषेला दुसऱया बोलीचा संदर्भ देता आला तर (मूळ आणि भाषांतर) अनुवादाचे साहित्य मूल्य वाढते. अनुवाद करताना मूळ संहितेशी प्रामाणिक राहत, आपल्या कलात्मक शैलीने तो दुसऱया भाषेत वाहून नेणे हे या कामाचे मर्म.

रामदासस्वामींनी अक्षराविषयी म्हटले आहे –

‘पहिलें अक्षर जें काढिलें। ग्रंथ संपेतों पाहात गेलें। येका टांकेंचि लिहिलें। ऐसें वाटे।।’

एक अनुवादक म्हणून मला ही ओवी केवळ अक्षरापुरती मर्यादित न वाटता – अक्षर म्हणजे जे जे आपण लिहितो ते – सुरुवातीचा लिहिण्याचा उत्साह शेवटपर्यंत असावा, जेणेकरून वाचक त्या विषयांत गुंतून राहील. अर्थात, हे तेव्हाच शक्य असते जेव्हा तुम्ही पूर्ण विचारानिशी लिहिण्याची सुरुवात करता. त्यामुळे अनुवाद लेखनात परिपूर्ण विचार त्या कलाकृतीला न्याय देतो.

अनुवाद करताना विशेषतः ‘माय मराठीत’ कोणतीही कलाकृती आणताना आपल्या भाषेला अनुवादाचा मोठा वारसा आहे. संस्कृत भाषेतून मराठी उतरून आलेल्या या ग्रंथसंभाराने भाषेची उंची वाढवली आहे. यात आख्यानकवी श्रीधरांचे नाव अग्रक्रमाने येते. मराठी मनाची आध्यात्मिक तहान त्यांनी तृप्त केली. त्या काळच्या मराठीचा बाज वेगळा असला तरी रसिकांची मने नवरसात न्हाऊन निघतील अशी शब्दकळा अवगत करणे आजही तितकेच महत्त्वाचे ठरते. या गोष्टी शिरोधार्य मानून केलेल्या लेखनाने प्रत्येक वाचक त्या त्या अनुवाद आणि अनुवादकाचा ऋणी असेल. तेव्हा जगभरातील वेगवेगळ्या भाषा शिकूया! उत्तम अनुवादाची कास धरून आपल्या भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवत राहूया!

(लेखिका अनुवादक आहेत.)

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या