आभाळमाया – अशनींचे प्रताप

>>  दिलीप जोशी

काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हय़ातील लोणार सरोवराचा रंग अचानक गुलाबी झाल्याची सचित्र बातमी प्रसिद्ध झाली. समुद्राच्या पाण्याच्या सुमारे दहापट खारटपणा असलेल्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार प्रसिद्ध होतंच. त्याचं प्राचीन वर्णन ‘स्वेदबिंदूवत्’ असल्याचं म्हटलं जातं. एकोणीसाव्या शतकापासून तेथे नेमकं काय घडलं असावं याची चर्चा सुरू झाली. विसाव्या शतकात 1972 ते 76 या काळात अमेरिकेतील स्मिथ्सॉनिअन इन्स्टिटय़ूट आणि आपली ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांनी संयुक्तपणे संशोधन करून हे सरोवर-विवर म्हणजे, अवकाशातून महाकाय अशनी (प्रचंड उल्का) पडून त्या आघातातून झालेले विवर असल्याचं सिद्ध झालं. सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी प्रचंड अशनी लोणार भागात कोसळला आणि त्याने हे विवर (क्रेटर) निर्माण केले. केवळ अशाच आघात व उष्णतेने अग्निजन्य खडकात निर्माण होणारा ‘मॅस्केलनाइट’ लोणारला सापडल्याने हे जगातील अद्वितीय विवर ठरले. सध्या त्याच्या पाण्याचा बदलता रंग अतिसूक्ष्म जैविक शेवाळामुळे झाल्याचं सांगितलं जातं.

पृथ्वीच्या जन्मापासून पृथ्वीवर असंख्य अशनी, धूमकेतू आदळतच होते. त्यांचा लाखो वर्षांचा मारा सहन करीत पृथ्वीची जडणघडण होत होती. बर्‍याच काळाने पृथ्वीवर अशनी आदळण्याचं प्रमाण कमी होत गेलं आणि जीवसृष्टीची निर्मिती होऊ लागली. मात्र त्यानंतरही अशनींच्या आघाताचे उत्पात पृथ्वीवर अधूनमधून होत राहिले. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीभर पसलेले महाकाय डायनॉसॉर एका महाकाय अशनीच्या आघातानेच नष्ट झाल्याचं म्हटलं जातं.

त्यानंतर माणसाच्या संस्कृतीचा आरंभ झाल्यावरही आपल्याला ज्ञात इतिहासात अनेक अशनींची नोंद आहे. मोक्सिको हे मोठं विवर-शहर आहे. अमेरिकेतील ऑर्टझोना राज्यातील आघात-विवर प्रसिद्ध असून त्याला ‘बॅरिंजर क्रेटर’ म्हणतात. इतरही कित्येक ठिकाणी मोठमोठी अशनी-आघात विवरं आहेतच. मात्र यापैकी बहुतेक ठिकाणी आजची मानवी वस्ती अस्तित्वात  येण्यापूर्वीच्या या घटना आहेत.

पृथ्वीभोवतीच्या स्पेसमध्ये असंख्य दगड-धोंडे इतस्ततः भरकटत असतात. त्यांपैकी जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कचाटय़ात सापडतात ते पृथ्वीकडे खेचले जातात. हे बहुतांशी छोटे दगड, पृथ्वीच्या वातावरणाच्या घर्षणाने जळून राख होतात. त्या उल्कावर्षावाचा रमा सोहळा दरवर्षी ठराविक तारखांना पहायला मिळतो.

मात्र उल्का आकाराने विराट असेल आणि काही भाग जळून किंवा जळतानाच पृथ्वीवर आदळून उत्पात घडवत असेल तर तो अशनीपात समजला जातो. छोटे दगडगोटे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचले तरी आपल्या ग्रहावरील 75 टक्के पाण्यात ते कोसळण्याची किंवा दर्‍या-डोंगरात, जंगलात पडण्याची शक्यता जास्त असते. मानवी वस्तीवर क्वचित असे आघात झाले आहेत.

परवा 30 जून रोजी पृथ्वीवर कोसळलेल्या एका अशनीने जे घडवलं त्याला 112 वर्षं पूर्ण झाली. 1908 मध्ये याच दिवशी रशियातील सायबेरियाच्या जंगलात 260 फूट आकाराचा आणि 1 लाख टन वजनाचा एक प्रचंड अशनी अवकाशातून पेटत्या अवस्थेत धगधगत आला. त्याचा वेग सेकंदाला 22 कि.मी. किंवा ताशी 80 हजार किलोमीटर एवढा प्रचंड, म्हणजे एखाद्या रॉकेटपेक्षाही जास्त होता. त्याने तुंगुस्का परिसरातील जंगलात भूपृष्टाला धडक दिली. तो आघात एवढा प्रचंड होता की तुंगुस्कापासून 60 किलोमीटर अंतरावर घराच्या अंगणात उभा असलेला माणूस अक्षरशः उडाला.

त्या अशनीच्या आदळण्याचा आवाज सुमारे 1000 किलोमीटर दूरवर ऐकू गेला. म्हणजे जवळच्या माणसांच्या कानठळय़ाच बसल्या असतील. या उत्पाताने लाखो टन धूळ उडाली ती थेट अमेरिकेतील कॅलिफोर्नियापर्यंत जाऊन पोचली. भरदिवसा अंधार करणारे धुळीचे वादळ निर्माण झाले. या अशनीमुळे मोठे विवर निर्माण झाले नाही, परंतु त्यांचे शेकडो तुकडे चहूदिशांना उडाले आणि त्यांनी हाहाकार उडवला. त्यावेळच्या रशियात झार राजांचं राज्य होतं. पहिलं महायुद्ध संपेपर्यंत रशियाने त्याबद्दल जगापासून या आघाताची बातमी दडवून ठेवली.

1927 नंतर मात्र तुंगुस्का भागाची विमानातून घेतलेली छायाचित्रं प्रसिद्ध झाली आणि 50 किलोमीटरचं घनदाट जंगल जळून कोळसा झाल्याचं आणि मोठय़ा झाडांचे अवशेष विखुरल्याचं दिसून आलं. त्यानंतर 1908च्या अशनी आघाताला दुजोरा मिळाला. तुंगुस्काच्या दाट जंगलाने हा आघात सहन केल्याने विवर निर्माण झाले नाही, पण अशनी आघात काय करू शकतो याचे पुरावे सापडले.

आपली प्रतिक्रिया द्या