
>> शिरीष कणेकर
तुम्ही टी.व्ही.वरच्या मराठी मालिका बघता का? थांबा-थांबा, लगेच चपला आणि दगड मला फेकून मारायची घाई करू नका. मी फक्त विचारतोय. मी त्या मालिकांचा निर्माता, दिग्दर्शक किंवा लेखकही नाही. ज्यात त्यात नाक खुपसत मालिकेचा चुथडा करणारा वाहिनीप्रमुखही (त्यांना इंग्लिशमध्ये ‘चॅनेल हेड’ म्हणतात.) नाही. जो हेड फिरवतो तो ‘चॅनेल हेड’! त्याचं नाक तो रुमालात न खुपसता मालिकेत खुपसतो असं मला आतल्या गोटातून कळलं. ज्यांच्याबद्दल छुपी माहिती देतात ती ‘हेड’ माणसं स्वतः आतल्या गोटात कशी नसतात? ते कोणाविरुद्ध बोंब ठोकतात? ते प्रेक्षकांपासून वाचत असले तरी घरी त्यांच्या लग्नाच्या बायका त्यांना धूत असतील. एक तर त्या बायका आहेत, शिवाय त्याही नवऱयाच्या वाहिनीवरील भंगार मालिका बघत असतातच. चला, या ‘हेड’ लोकांना काही तरी भोगावं लागतं तर! भगवान के घर देर है, अंधेर नही…!
मी केवळ ‘कलर्स’ व ‘झी मराठी’वरील मालिका बघतो. का? आता का? कारण मी तसाच आहे. मै ऐसाही हूँ. माझी नियत मला एका वाहिनीवरून दुसऱया, दुसरीवरून तिसऱया, चौथ्या, पाचव्या अशा मर्कट उडय़ा मारायला परवानगी देत नाही. यालाच अव्यभिचारी निष्ठा म्हणतात. आमच्या पिढीत ही फार होती. आजकाल एका वाहिनीत सकाळी कामावर गेलेले कर्मचारी संध्याकाळी दुसऱया वाहिनीच्या वातानुकूलित कार्यालयातून बाहेर पडताना दिसतात. वाहिनीचे ‘हेड’देखील रोज सकाळी दहा पैशांचं नाणं उडवून ‘हेड ऑर टेल’ करतात व वाहिनी निवडतात. प्रेक्षकांनीही नाणेफेक करूनच मालिकेच्या किस्मतीचा फैसला करावा अशी त्यांची अपेक्षा असावी. (‘टीआरपी’ म्हणजे ‘तूच रांडेच्या पहा’!)
मी अन्य मराठी वाहिन्यांवरील मालिकांना मुकतो याची कृपया कोणी खंत बाळगू नये. माझ्या दोन वाहिन्या मला पुरेपूर केरकचरा (गार्बेज, यू सी!) देतात. मी त्यांच्या रंगात रंगून जातो, म्हणजेच पूर्णतः मलिन होतो. मी ‘माझा होशील ना?’ किंवा ‘अग्गं बाई सूनबाई’ किंवा ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ बघून बाहेर पडलोय हे आमच्या बिल्डिंगमधल्यांना कसं कळतं देव जाणे. ते नेम धरून त्यांच्या बाल्कनीतून माझ्या अंगावर उष्टी-खरकटी टाकतात. हा सन्मान, हा ‘कॉप्लिमेंट’ वाहिन्यांपर्यंत कसा पोहोचवायचा? माझा बरबटलेला शर्ट त्यांच्याकडे पाठवून देऊ का? नको, तो अभिमानानं घालून ते मालिकेची व वाहिनीची प्रसिद्धी करतील.
‘माझा होशील ना?’ संपण्याआधी आठवडाभर मी ती बघणे थांबवले. मालिकेपूर्वी मीच संपीन अशी मला धास्ती वाटली. आचरटपणाला मर्यादा नसतात हेच या मालिकेनं आणखी एकदा दाखवून दिले. सुरुवातीला बरी वाटली होती हो. पुढे तिचे शेण होईल हे नाही ओळखता आलं. आमचे मित्र कलाकार त्यांची काही चूक नसताना या मालिकेत गव्हासारखे भरडले गेले. ‘फलाणे-फलाणे होते ती फालतू मालिका’ असंच शेवटी लोक म्हणणार ना?
काही मालिकांतील कलाकार मालिकांवर होणारी टीका अकारण स्वतःवर ओढवून घेतात. मला समजतच नाही. अरे, तुम्ही उत्तम काम करीत असाल, पण मालिकाच भंगार असेल तर तिच्यासह बुडण्याचा अट्टहास कशासाठी? तुम्हाला केवळ गप्प बसायचंय. निर्माते, दिग्दर्शक, लेखक व वाहिनीप्रमुख नामानिराळे राहतात व हे कलाकार हात दाखवून अवलक्षण करून घेतात. खेडेगावातलं येडं भजीला म्हणतंय पेढं…!
‘तुझी माझी जोडी जमली गं’मधली नाजूक नायिका बलदंड गुंडांना एका चापटीत लोळवते ते प्रेक्षणीय आहे. हे म्हणजे केश्तो मुखर्जीनं दारासिंगला उचलून आपटल्यासारखं वाटतं.
‘शुभ मंगल ऑनलाइन’मधल्या शर्वरीच्या आईच्या स्वभावातील अमूलाग्र बदल चमत्कार या सदरातच मोडेल. निदान तो चमत्कार स्वामीजींनी केला असं तरी दाखवा. ‘माझा होशील ना?’ मधली सिंधू साक्षात कैदाशीण दाखवलेय. मालिकाभर ती नीचपणे वागते, कृष्णकृत्य करते, गरळ ओकते. एकाएकी दिग्दर्शकानं तिच्या कानात सांगितलं असावं- ‘हे उलटय़ा काळजाच्या स्त्रीये आता मालिकेला घरघर लागलेय. कधीही संपेल.’
लगेच रातोरात तिला सासरच्या प्रेमाचं भरतं येतं. हातात पेटती पणती घेऊन त्यावर हात धरून ती अग्निपरीक्षा देते. दुरावलेला, तिरसट नवरा धावत येऊन तिचा होरपळलेला तळवा नाजूकपणे कुरवाळतो. जणू मालिकाभर तो याचीच वाट बघत होता. काहीही दाखवा, प्रेक्षक थोडेच झुंडीनं येऊन तुमचा गळा पकडणार आहेत?
सर्व मालिकांतील कुठलंही पात्र कुठल्याही वेळी कसंही वागू शकतं हा आणखी एक सेमी-चमत्कारच म्हणायचा.
लठ्ठ नायिकांचा ट्रेंड येतोय. आणा! पण त्यांच्या सुंदर मनाविषयी बोलताना आपल्याला काहीच धड दाखवता येत नाही, मग अदृश्य सुंदर मन कसं दाखवणार हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का?… त्यापेक्षा तुमच्या मेंदूचा एक्स-रे अधूनमधून दाखवत जा ना! ‘ब्लँक’ एक्स-रेही छान दिसतो!!





























































