लेख – गणित चुकलेला पाऊस

752

>> दिलीप जोशी ([email protected])

उघड पावसा ऊन पडू दे, उडू-बागडू हसू खेळू दे’ अशी एक कविता जुन्या पाठय़क्रमात होती. एरवी ‘येरे येरे पावसा’ तर असायचीच. कारण पावसाच्या येण्याचं अप्रूप आपल्या उष्ण कटिबंधातल्या देशात अधिक. तो जाण्याची किंवा काही काळ उघडीप मिळण्याची गाणी युरोपात जास्त होती. त्यांच्या कवितेत ‘रेन रेन गो अवे, कम अगेन अनदर डे’ असं मुलं म्हणायची. कारण बारा महिन्यांतले जवळपास सगळेच दिवस ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस असणाऱ्या देशात पावसापेक्षा सूर्यकिरणांचेच कौतुक जास्त असणार.

आपल्याकडे मात्र वर्षा ऋतूची आतुरतेने प्रतीक्षा असते. तशी ती असायलाच हवी. कारण चार महिने तीक्र उन्हाने लाहीलाही झालेली धरती शांत करायला धो-धो पावसाचीच गरज असणार. पूर्वी हा पाऊस ‘नेमेचि’ यायचा. ती गोष्ट किती महत्त्वाची होती हे आता उमगतंय. पाऊस ‘नेमेचि’ म्हणजे योग्य वेळी समयोचित आला आणि वेळेवर परतला तरच त्याचं आणि पर्यायाने सृष्टीचे कौतुक. मृग नक्षत्रावर सुरू होणारा, आर्द्रा नक्षत्रात धो धो बरसणारा, श्रावण महिन्यात उन्हाशी लपंडाव खेळणारा आणि हस्त नक्षत्र लागल्यावर गडगडाट करून परतणारा ‘शहाणा’ पाऊस आम्हीही अनुभवलाय.

तोपर्यंत शेतीभाती उत्तम झालेली असायची. पिकं तरारून वर यायची. ‘हस्ता’च्या पावसाने धनधान्याची आबादानी होते आणि स्वाती नक्षत्रातला पाऊस समुद्रात पडला तर मोती पिकवतो हे पारंपरिक आडाखे अनुभववावर आधारलेले होते. कृषी संस्कृतीमधले सगळे महत्त्वाचे सणही याच पीकपाण्याच्या काळाशी निगडित असलेले. पाणी म्हणजे जीवन म्हणून त्यासाठीच्या प्रार्थनाही असायच्या.

काळ बदलला, माणूसही बदलला. नित्यनव्या संशोधनाने पृथ्वीवर यांत्रिक क्रांती केली. त्यामुळे झालेल्या फायद्यांमध्ये माणूस एवढा गुंगला की, त्याला निसर्गभान राहिलं नाही. माणसाच्या या गफलतीचा परिणाम शेवटी केवळ माणसालाच नव्हे तर कोणताही अपराध नसलेल्या इतर जीवसृष्टीलाही भोगावा लागणार हे उघड होतं. याबाबत ‘जागल्या’चं काम करणारे गेली पन्नास वर्षे इशारे देतायत, परंतु संकट दारापर्यंत येतं तोपर्यंत ‘दिल्ली तो बहोत दूर है’ अशा प्रकारच्या भ्रमात राहिलेल्या माणसाला म्हणजे मुख्यत्वे जगभरच्या सत्ताधीशांना उशिरा जाग आली. तोपर्यंत उद्योग-व्यवसायाच्या जागतिक स्पर्धेपुढे बदलत्या निसर्गचक्राचा विचार करण्याची ‘गरज’ कोणालाच भासली नव्हती. मात्र वातावरणातला ‘ओझोन’ वायूचा थर नष्ट होऊन त्याचे थेट दुष्परिणाम ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या देशांना ‘चटके’ देऊ लागले तेव्हा ते खडबडून जागे झाले. ‘ग्लोबल वॉर्मिंग’, कार्बनचं उत्सर्जन यावर ‘वसुंधरा’ परिषदांमधून चर्चा होऊ लागली. ठोस उपायांच्या गर्जना तर भरपूर झाल्या, पण योग्य दिशेने ठोस पावलं उचलणाऱ्या चालीने काही वेग घेतला नाही.

परिणाम दिसतोच आहे. पावसाचं गणित चुकलंय. ‘क्लायमेट चेंज’ला केवळ मानवनिर्मित प्रदूषणच जबाबदार आहे असं नाही असं म्हणणाऱ्यांचीही काही मतं आहेत. मात्र प्रदूषणाचा त्रास जगभरच्या सर्वच सजीवांना, अगदी झाडापानांनाही सतावतोय. जगातल्या अनेक महानगरांमध्ये ‘मास्क’ लावून फिरायची वेळ आलीय आणि फुप्फुसांचे विकार वाढतायत हे कशाचं लक्षण?

ही वेळ कोणी कोणावर दोषारोप करण्याची नाही. त्यातच वेळ जातो किंवा घालवला जातो आणि मूळ समस्येकडे दुर्लक्ष होतं. हा अनेक बाबतीतला अनुभव आहे. नुसत्या चर्चाचर्वणाने काही होणार नाही. पाऊस ‘नेमेचि’ यावा असं वाटत असेल तर बरंच काम करावं लागेल. त्याच वेळी गणित चुकलेला पाऊस एका दिवसात एका महिन्याच्या पावसाचं पाणी बदाबदा ओतत असेल, वारंवार ढगफुटी होत असतील तर निसर्गाच्या या लहरीचाही मुकाबला करावा लागेल. त्यासाठी पाऊस संपत असतानाच पुढच्या वर्षासाठी तयारीला लागलं पाहिजे. अन्यथा तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं पूर आल्यावर बघू असं म्हटलं तर सारं विपरीतच बघावं लागेल. संभाव्य समस्येला आतापासूनच जाणून उपाययोजना करायला हवी. त्यासाठी सरकारी प्रयत्नांबरोबरच समाज प्रबोधनही आलंच.

आता (बहुतेक) पाऊस परतलेला असेल. त्याला निरोप देताना ‘पुनरागमनायच’ म्हणजे ‘पुन्हा परतण्यासाठी (सध्या) जा’ असे सांगितलं जातं. त्याचं पुनरागमन आणि वास्तव्य ‘समयोचित’ व्हावं असंही आता म्हणायला हवं. पाणी हे जीवन आहेच, पण त्याने माणसाचं जीवन वाहून जाऊ नये किंवा त्याविना शुष्क होऊ नये. पावसाचं गणित आपल्याला कदाचित सुधारता येणार नाही. ते बिनसलं असलं तरी पण आपलं गणित आपल्यालाच मांडावं आणि सोडवावं लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या