अर्बन ऑक्टोबरच्या निमित्ताने…

>> मयुरेश भडसावळे

आपली मोठी शहरे हवामान बदलांबद्दल मोठय़ाने बोलू लागली असली तरी आपल्या मध्यम वा छोटय़ा शहरांचा आवाज अजून उमटलेलाच नाही. दबक्या पावलाने येणाऱया हवामान संकटाची तीव्रता मात्र याच शहरांकरिता, त्यांच्या अर्धनागरी भवतालाकरिता सर्वात जास्त असणार आहे. शहरांच्या ज्या शाश्वत विकासाबद्दल नेहमीच बोललं जातं तो कधी शक्य आहे? हवामान बदलांशी दोन हात करण्याची क्षमता सर्व शहरांमध्ये न्याय्य आणि समान प्रमाणात उभी राहिली तरच तो विकास शाश्वत ठरण्याची शक्यता आहे. ‘अर्बन ऑक्टोबर’च्या सुरुवातीलाच आपण ही न्याय्य तत्त्वे लक्षात घ्यायला हवी आहेत.

नेमेची येणारा ‘ऑक्टोबर’ हा हिंदुस्थानातल्या सर्वांसाठी सणासुदीची चाहूल घेऊन येणारा महिना असला तरी जागतिक स्तरावर मात्र शहरं-शहर नियोजन-शहरांचा शाश्वत विकास याबाबत गांभीर्याने विचार करणाऱया प्रत्येकासाठी हाच महिना ‘अर्बन ऑक्टोबर’ म्हणून ओळखला जातो. जागतिक पातळीवर आपली शहरे, शहरांपुढील गंभीर समस्या, त्यावरच्या उपाययोजना अशा आयामांबाबत विचारविनिमय व्हावा, त्यामध्ये नागरिक-सरकार-उद्योग जगत यांचा सक्रिय सहभाग असावा, स्थानिक पातळीवरही या महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत जागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ऑक्टोबर महिना ‘अर्बन ऑक्टोबर’ म्हणून घोषित केला आहे. महिनाभर चालणाऱया या विचारमंथनाची आणि पृतिप्रवण उपक्रमांची सुरुवात होते ती ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी, ‘जागतिक अधिवास दिन’ अथवा ‘वर्ल्ड हॅबिटॅट डे’पासून आणि त्याचा शेवट होतो तो 31 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक शहर दिन’ अथवा ‘वर्ल्ड सिटीज डे’ या दिवशी. या चार आठवडय़ांमध्ये शहरांच्या शाश्वत विकासाच्या अनुषंगाने एखाद्या विशिष्ट संकल्पनेवर, थीमवर चर्चा, उपक्रम चालतात. या वर्षीच्या चर्चेसाठी संकल्पना आहे ‘जग कार्बनमुक्त करण्यासाठी शहरांची सक्रियता वाढवणे’. या संकल्पनेच्या निमित्ताने जागतिक हवामान बदल, हे बदल घडण्यामागे असणारा शहरांचा ठळक वाटा आणि बदलत्या हवामानाचा जो अतोनात फटका शहरांना, त्यांच्या परिघातल्या भवतालाला बसू पाहतो आहे, तो रोखण्यासाठी शहरवासीयांनी तत्काळ ठाम पावले उचलण्याची गरज हे सारे प्रकर्षाने पुढे आले आहे.

अर्बन ऑक्टोबरनिमित्ताने गेल्या काही दिवसांमधल्या ज्या महत्त्वाच्या जागतिक बातम्या आहेत, त्याकडे नजर टाकली तर अनेक बिंदू जुळून येताना दिसतील. या वर्षीचे जे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यात फिजिक्सचे नोबेल ज्या शास्त्रज्ञ त्रयीला मिळाले आहे, ते तिघेही हवामान शास्त्रज्ञ आहेत आणि जागतिक हवामान बदलांच्या अभ्यासाचे शास्त्रीय प्रारूप तयार करण्यामध्ये त्यांचे प्रचंड योगदान आहे. मानवी हस्तक्षेपामुळे घडून येणाऱ्या हवामान बदलांमुळे मानवी अस्तित्वासमोरच जे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, त्याबद्दलच्या संशोधनाची नोबेल निवड समितीने 2007 नंतर प्रथमच इतकी ठळक दखल घेतली आहे. 2007 सालचे नोबेल पुरस्कार अमेरिकेचे उपाध्यक्ष अल गोर आणि आयपीसीसी यांना हवामान बदलाला कारणीभूत असणाऱया कारणांचा सविस्तर शोध घेतल्याबद्दल प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर आज 2021 साली हा मुद्दा इतक्या ठळकपणे पुढे आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2021 ते 2030 हे दशक ‘क्लायमेट डिकेड’ म्हणून घोषित केले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो इथे 26 वी हवामान परिषद भरत आहे आणि मानवी हस्तक्षेपापोटी होणाऱया तीव्र हवामान बदलांचा कमीत कमी फटका आपल्या शहरांना बसावा यासाठी नियोजनाची एकच धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या हिंदुस्थानातील शहरे, महाराष्ट्रातील शहरे आणि या शहरांचे व्यवस्थापन कोणत्या दिशेने जात आहे याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा व्हायला हवी.

हवामान बदलांना सामोऱया जाणाऱया शहरांचा विचार करताना Climate Adaptation and Mitigation याचा विचार प्रामुख्याने होतो. बदलत्या हवामानाशी, बदलत्या ऋतुचक्राशी जुळवून घेईल अशी शहरं उभी करणे म्हणजे Climate Adaptation तर अधिक कार्बन उत्सर्गाद्वारे हवामान बदलांना तीव्रतर करणारे, बढावा देणारे जे उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था, राहणीमान आहे, त्यात परिवर्तन घडवून आणून कार्बन उत्सर्ग कमी कमी करत आणणारी व्यवस्था उभी करणे म्हणजे Climate Mitigation. Climate Adaptation आणि Mitigation या दोन्ही आघाडय़ांवर एकाच वेळी कार्यरत राहणे हे शहरांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. मात्र आपल्या शहरांमध्ये काही अपवाद वगळता यावर विशेष काम सुरू झाल्याचे, लोकजागृती झाल्याचे आढळून येत नाही याची गंभीर नोंद अर्बन ऑक्टोबरच्या निमित्ताने घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर `C40’सारख्या आंतरराष्ट्रीय समूहाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. हवामान बदलांना सामोरे जाणारी, शाश्वत विकासाचा ध्यास घेणारी शहरे निर्माण करण्यासाठी प्रचंड लोकसंख्येची, आर्थिकदृष्टय़ा ताकदवर अशी 20 जागतिक शहरे 2005 मध्ये एकत्र आली. तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरणपूरक शहरी व्यवस्था उभ्या करण्यामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना, एकमेकांच्या भावनांतून शिकण्याची भावना त्यामागे होती. 20 सदस्य-शहरांपासून सुरू झालेला हा प्रवास आता 97 सदस्य-शहरांपर्यंत पोहोचला आहे. हिंदुस्थानातील दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू ही शहरे या ‘C40’ समूहाचे सदस्य आहेत आणि डिसेंबर 2020 पासून मुंबईदेखील या शहर समूहाचा सदस्य बनली आहे. यानिमित्ताने मुंबई शहराचा Climate Action Plan तयार करण्याचे काम बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. घन कचरा व्यवस्थापन, शहरी जैवविविधता, हरित वाहतूक व्यवस्था, शुद्ध हवा, हरित ऊर्जा अशा विषयांवर मुंबईचे Climate Planning सुरू झाले आहे. हवामान बदलाला सामोरे जाणारी आपली शहरे नियोजन जरी उत्तम करत असली तरी अंमलबजावणीचे आव्हान ती पेलू शकणार का? हा अतिशय मोठा प्रश्न आहे. उत्तम नियोजनाची उत्तम अंमलबजावणी हवी असेल तर त्यापाठी सजग नागरिकांचा मोठा आवाज सातत्याने उभा राहायला हवा. नागरिकांची सजगता वाढण्यासाठी शहरांपुढे असणारी हवामान बदलांची आव्हाने त्यांच्यासमोर पोहोचायला हवीत.

आपली मोठी शहरे हवामान बदलांबद्दल मोठय़ाने बोलू लागली असली तरी आपल्या मध्यम वा छोटय़ा शहरांचा आवाज अजून उमटलेलाच नाही. दबक्या पावलाने येणाऱया हवामान संकटाची तीव्रता मात्र याच शहरांकरिता, त्यांच्या अर्धनागरी भवतालाकरिता सर्वात जास्त असणार आहे. शहरांच्या ज्या शाश्वत विकासाबद्दल नेहमीच बोललं जातं तो कधी शक्य आहे ? हवामान बदलांशी दोन हात करण्याची क्षमता सर्व शहरांमध्ये न्याय्य आणि समान प्रमाणात उभी राहिली तरच तो विकास शाश्वत ठरण्याची शक्यता आहे. ‘अर्बन ऑक्टोबर’च्या सुरुवातीलाच आपण ही न्याय्य तत्त्वे लक्षात घ्यायला हवी आहेत.

मानवी हस्तक्षेपातून होणाऱया हवामान बदलांमुळे जी आव्हाने उभी ठाकतात, ती आपल्या शहरांचा उंबरठा ओलांडून आत आली आहेत. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेल्या राज्यामधील परिस्थिती काय सांगते ? बदलते पर्जन्यचक्र, पावसाच्या सरींची वाढती आणि बदलती तीव्रता, वाढत्या तापमानांमुळे उष्ण व शुष्क दिवसांचे वाढते प्रमाण, वारंवार उद्भवणारी चक्रीवादळे हे महाराष्ट्रामध्ये वारंवार अनुभवायला येत आहे. मुंबई-पुणे-सांगली-कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये उद्भवणारी पूरपरिस्थिती अधिक वारंवार आणि तीव्रतर झाली आहेच, पण मराठवाडय़ासारख्या भागामध्येही या वर्षी विध्वंसक जलप्रलय उद्भवला आहे, कोकण किनारपट्टीला चक्रीवादळ आणि महापूर असा दुहेरी तडाखा बसला आहे. या बदलांकडे पाहताना ‘क्वचित अवचित येणारे अस्मानी संकट’ असे न पाहता या घटनांमधून जे पॅटर्न दिसून येतात, त्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची गरज आहे.

[email protected]

(लेखक ‘अर्बन डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर’ आहेत. ‘क्लायमेट रिसायलेंट अॅण्ड सस्टेनेबल सिटीज’ या विषयावर त्यांचे
काम सुरू आहे.)

आपली प्रतिक्रिया द्या