ठसा – उत्तम बंडू तुपे

2509

>> प्रशांत गौतम

‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांच्या संघर्षशील वाटचालीचा प्रवास काल पुण्यात 89 व्या वर्षी संपला. आपल्या कसदार कथा, कादंबरी, नाटकातून ठामीण जीवनाचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारी धगधगती लेखणी आता विसावली आहे. ‘काटय़ावरची पोरं’ या आत्मचरित्र लेखनाने चर्चेत आलेले तुपे अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करणारे, झोपडपट्टीच्या दुर्गंधीयुक्त वातावरणात कसदार साहित्य निर्माण करणारे, मोलमजुरी करून पोट भरणारे, अल्पशिक्षित पण प्रतिभावंत लेखक होते. कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मयप्रकारात विपुल प्रमाणात लेखन करून त्यांनी आपली नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली. विस्थापित, उपेक्षित, बेरोजगार, वंचित, भटक्या विमुक्तांचे जीवन, दलित स्त्रियांचे प्रश्न या विषयींच्या व्यथा, वेदनांचे विदारक चित्रण तुपे यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. वेगळय़ा धाटणीचे दलित साहित्य मराठी साहित्यात आले आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. ते मराठी साहित्य रसिक आणि जाणकारांना अस्वस्थ करून गेले. अशा लेखनामुळे, धगधगत्या जीवनानुभवामुळे त्यांच्या साहित्यकृतीने मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. कारण समाजातील जळजळीत वास्तव आणि अनुभवांची दाहकता ही त्यांनी आयुष्यभर आपल्या साहित्यातून मांडली.

उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. उतारवयात पत्नीस पक्षाघाताने त्रस्त केले. त्यामुळे आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली. या विषयीचे वास्तव प्रसार माध्यमातून लोकांच्या, वाचकांच्या समोर आल्याने सर्व जण व्यथित झाले. प्रसार माध्यमांच्या पुढाकारामुळे तुपे यांना मुख्यमंत्री सहायता फंडातून पाच लाखांची मदत मिळाल्याने अडचणीतून काही मार्ग सापडू शकला. सातारा जिल्हय़ातील खटाव तालुक्यातील एका खेडेगावात जन्मलेले तुपे नंतरच्या काळात पुण्यात स्थायिक झाले. पुढील प्रवासात त्यांची वामनराव देशपांडे यांच्याशी भेट झाली. तेथे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचले आणि प्रभावित झाले.

आत्याच्या आश्रयाने पुण्यात राहून मोलमजुरी करू लागले. मिळेल ती कामे त्यांनी स्वीकारली. मीना नावाची मानलेली बहीण तुपे यांच्या साहित्य प्रवासात आली. सख्ख्या बहिणीने जेवढी माया लावली नाही तेवढी मानलेल्या बहिणीने लावली. उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्य प्रवासाची जडणघडणच मानलेल्या बहिणीच्या साक्षीने पुढील काळात होत गेली.

उत्तम बंडू फक्त तिसरी शिकलेले. अल्पशिक्षित असूनही उत्तम दर्जाचे साहित्य ते लिहू शकले. त्यांचे अनेक कथासंठाह, कादंबऱया असे लेखन आजही विविध विद्यापीठांत मराठीच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी अभ्यासत असतात. शाळेत असतानाच्या काळात एका शिक्षकाने जातिवाचक व माणुसकीला काळीमा फासणारी वागणूक तुपे यांना दिली. सख्ख्या बहिणीने त्यांची पैशासाठी अडवणूक केली. आयुष्याच्या खडतर प्रवासात जे भोगले तेच तळमळीने आणि प्रामाणिकपणाने साहित्यात अभिव्यक्त केले. भावणाऱया व्यथा, वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण केले. त्यांचे लेखन म्हणजे धगधगते वास्तव असते. त्यात सचोटीची अनुभूती असते. त्यात संघर्षाचे वर्णन असते. त्यात सामाजिक स्थितीचे विदारक चित्रण असते. म्हणूनच त्यांचे आत्मचरित्र असणारे ‘काटय़ावरची पोरं’ हे दलित साहित्यातील अव्वल दर्जाचे ठरले आहे. ‘इजाळ’, ‘खाई’, ‘खुळी’, ‘चिपाड’, ‘झावळ’, ‘भस्म’, ‘झुलवा’, ‘लांबलेल्या सावल्या’, ‘शेवंती’, ‘संतू’ याप्रमुख कादंबऱया. ‘आंदण’, ‘कोबरा’, ‘माती आणि माणसं’, ‘पिंड’ यासारखे कथासंठाह, ‘काटय़ावरची पोरं’ (आत्मचिरित्र) या कादंबऱया आणि कथासंठाहांचा उल्लेख करणे अगत्याचे ठरते. यातील ‘भस्म’ कादंबरीचा साहित्य अकादमी पुस्काराने, तर ‘काटय़ावरची पोरं’ या आत्मचरित्राचा राज्य सरकारच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने गौरव झाला. उत्तम बंडू तुपे यांची ओळखच ज्या ‘झुलवा’ कादंबरीमुळे आहे, ती जोगतीणीच्या वाटय़ाला येणारे दाहक अनुभव मांडणारी आहे. विशेष म्हणजे या कादंबरी लेखनासाठी तुपे स्वत:चा वेष बदलून जोगतीण झाले आणि तिच्या वाटय़ाला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. ‘मला येगळय़ा वाटनं जायाचंय, ही मळल्याली वाट सोडून चालायचंय’ म्हणणाऱया यल्लमाच्या कीर्तीचा बाजार मांडणाऱया खोटय़ा दुनियेविरुद्ध प्राणपणानं बंड पुकारून उठलेल्या जगन जोगतिणीची ही कहाणी ‘झुलवा’मध्ये वाचकांना अंतर्मुख करून जाते. एका बाजूला परशु दुसऱया बाजूला येलूमध्ये चालणारी जगन वाचकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहते. या व्यक्ती आणि जोगत्यांचं आजवर अनोखं असलेलं दुर्लक्षित विश्व ‘झुलवा’मध्ये आहे.

हीच ‘झुलवा’ कादंबरी वामन केंद्रे यांनी नाटकात आणली. कादंबरीवर झालेल्या नाटकात अभिनेता सयाजी शिंदे आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी भूमिका समर्थपणे केल्या. विशेष म्हणजे दोघांच्याही नाटय़ प्रवासाची सुरुवात ‘झुलवा’पासून झाली. उत्तम बंडू तुपे यांनी आपल्या प्रभावी लेखनाने मराठी साहित्य प्रवाहाच्या दिशाही व्यापक करण्याचे काम केले आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना मांडणारा लेखक आता आपल्यातून निघून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या