वाढवण बंदर मच्छीमारांच्या मुळावर!

>> पंढरीनाथ तामोरे

सर्वाधिक मासे देणारा गोल्डन बेल्ट वाढवण परिसरात असून समुद्रातील या पट्टय़ातील खडकाळ भागात अनेक प्रजातीचे मासे प्रजननासाठी येत असल्याने अशा माशांच्या प्रजोत्पादन तसेच आगामी काळात त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. याच समुद्री पट्टय़ात दाढा, घोळ, रावस, पापलेट, बोंबील, शेवंड हे मौल्यवान मासे मिळतात. त्यामुळे शासनाला मत्स्य निर्यातीमुळे कोटय़वधी रुपयांचे चलन मिळते. वाढवण बंदर लादले गेले तर मच्छीमार व्यवसाय नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील उत्तर कोकणच्या पालघर जिल्हय़ातील डहाणू तालुक्यामधील सागराच्या कुशीत विसावलेले सुंदरसं वाढवण गाव! द्वापारयुगात सांदिपनी ऋषीच्या पुत्राचा शोध घेत असताना श्रीकृष्ण या ठिकाणी पोहोचले आणि समुद्रात शंखासुर राक्षसाबरोबर युद्ध केले व त्यांचा उद्धार केला. म्हणून या क्षेत्रास शंखोद्वार असेही म्हणतात. वर्षाच्या एके दिवशी म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाढवण समुद्रातील हा भाग पूर्ण ओहोटीच्या वेळी निर्जन होतो व लोकांना दर्शनाकरिता काही काळ मोकळा होतो. प्रभू रामचंद्र नाशिक येथील दंडकारण्यात वनवासात असताना राजा दशरथाचे पिंडदान करण्यासाठी वाढवण येथील शंखोद्वार या पवित्र ठिकाणी आले होते. इथल्या किनाऱयावर मोठी भरती जिथपर्यंत येते तिथपर्यंत खोल समुद्रात ही भूमी भगवान परशुरामाची समाधीभूमी म्हणून ओsळखली जाते. हजारो वर्षांपासून देशातील कानाकोपऱयातून लोक पितरांचे पिंडदान करण्यासाठी या पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी येत असतात.

अशा या पौराणिक क्षेत्र असलेल्या वाढवण येथे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 5 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे आणि या बंदरासाठी आश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले असून बंदरासाठी विशेष कंपनीची स्थापना केली आहे. समुद्रात सुमार 5 हजार एकर भराव टाकून जगातील सर्वात मोठे बंदर बांधण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. सुमारे 65 हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारण्याचा इरादा जाहीर केला आहे.

सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला स्थानिकांचा तीक्र विरोध आहे. स्थानिक भूमिपुत्र, सागरपुत्र तसेच डायमेकर, शेती बागायतदार यांनी विरोध दर्शविला आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने 15 डिसेंबर 2020 रोजी मुंबईच्या कफ परेडपासून ते डहाणू तालुक्यातील झाईपर्यंतच्या कोळीवाडय़ांनी ‘बंद’ची हाक दिली होती. बंदरविरोधी भूमिकेसाठी आता पालघर जिल्हय़ातील सातही आमदार आणि खासदार पक्षातील मतभेद बाजूला ठेवून एकवटले आहेत.

सर्वाधिक मासे देणारा गोल्डन बेल्ट याच भागात असून समुद्रातील या पट्टय़ातील खडकाळ भागात अनेक प्रजातीचे मासे प्रजननासाठी येत असल्याने अशा माशांच्या प्रजोत्पादन तसेच आगामी काळात त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. याच समुद्री पट्टय़ात दाढा, घोळ, रावस, पापलेट, बोंबील, शेवंड हे मौल्यवान मासे मिळतात. त्यामुळे शासनाला मत्स्य निर्यातीमुळे कोटय़वधी रुपयांचे चलन मिळते. हे बंदर लादले गेले तर मच्छीमार व्यवसाय नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरातील 13 गावांमध्ये वसलेल्या व मच्छीमारीवर अवलंबून राaहणाऱया हजारो सागरपुत्रांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय हे आंतरराष्ट्रीय बंदर तारापूर अणुशक्तीच्या 6 कि.मी. परीघ मैलाच्या आत येणार असल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. येथील समुद्रात 5 हजार एकर जमिनीत दगडमातीचा भराव टाकला तर पावसाळी उधाणाच्या भरतीने येथील किनारपट्टी गावांत समुद्राचे पाणी शिरून स्थानिक रहिवाशांचे अतोनात नुकसान होणार आहे. वाढवण बंदर झाल्यास पालघरच्या समुद्रातील जलसंपदेची मोठी हानी होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेषतः मासेमारी बंद होणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखता येणे मुश्कील होणार आहे. वाहनांची वर्दळ, यंत्रसामग्री यांचादेखील स्थानिकांना त्रास होणार आहे.

1995 मध्ये जनक्षोभ उसळल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाच्या युती सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने 1998 साली या प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका ग्राहय़ धरून बंदर उभारणीच्या कामास स्थगिती दिली होती.

प्रस्तावित वाढवण बंदर बांधण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. मात्र या बंदरामुळे मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर नेस्तनाबूत होणार असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आंदोलनाची धार आणखी तीक्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकार संघ, आदिवासी एकता समिती, आदिवासी कष्टकरी समिती, अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने मुंबईच्या कफ परेड ते डहाणूच्या झाईपर्यंत ‘कोळीवाडे बंद’ची हाक दिली होती. त्यास कोळीवाडय़ांमध्ये कडकडीत बंद, मानवी साखळी, निदर्शने, मुंडण करून उत्स्फूर्त सहभाग घेऊन बंद 100 टक्के यशस्वी केला. आजही वाढवण परिसरातील गावोगावी ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द!’चा फलक पाहावयास मिळतो आहे.

15 डिसेंबर 20चा कडकडीत बंद पाळल्यानंतर वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. तेव्हा पिढय़ान्पिढय़ा वाढवण परिसरात राहून तुफान वादळवाऱयाशी लढून मासेमारी करणारे मच्छीमार, उन्हापावसात शेती-बागायती करणारे शेतकरी, विजेचे बेभरोसे लाईट असतानाही डायमेकिंगचा व्यवसाय करणारे डायमेकर, कष्ट करणारे येथील आदिवासी आपल्या निढळाच्या घामानं आपली जीवनशैली जगत आहेत.

वाढवण बंदर प्रकल्पविरोधी वाढवण परिसरात तीक्र एकजुटीची लाट पसरली आहे. केंद्र शासनाने त्यांच्याकडे आपलेपणाने पाहून त्यांना नको असलेले वाढवण बंदर रद्द करून दिलासा द्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या