ठसा – वैद्यचुडामणी रघुवीर भिडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

रत्नागिरी नगर परिषदेच्या दवाखान्यात अनेक वर्षे रुग्णसेवा करणारे वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. ते ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असे ब्रीदवाक्य पाळणारे होते. सेवानिवृत्तीनंतरही रुग्णसेवा सुरू ठेवली होती. आयुर्वेद संशोधन, ब्रिज खेळ, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

रघुवीर भिडे यांनी आयुर्वेद क्षेत्रातील ‘वैद्यचुडामणी’ ही त्यांच्या काळातील सर्वोच्च पदवी संपादन केली होती. नगर परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात अनेक वर्ष त्यांनी रुग्णसेवा दिली. त्या काळात अनेक जण नगर परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास प्राधान्य देत. नगर परिषदेच्या दवाखान्यात सेवा देत असताना वैद्य भिडे यांचे लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार तसेच एड्ससारख्या रोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांवर ते उपचार करत. टिळक आळीत त्यांनी दवाखाना सुरू केला होता. या वयातही ते त्यांचे रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत होते. एका अपघातात रघुवीर भिडे यांच्या पायाला दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वैद्य म्हणून सर्वांना परिचित असलेले रघुवीर भिडे हे उत्तम ब्रिज खेळाडू होते. अनेक राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या. ब्रिजच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व केले. रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. ब्रिज खेळाचा प्रसार व्हावा याकरिता काही स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. ते स्पर्धेच्या आयोजनात एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणे राबत असत. खेळाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, बालसुधारगृह अशा संस्थांमध्ये ते कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना रा. भा. शिर्के प्रशालेच्या गुरुकुल उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. रत्नागिरीतील वेदपाठ शाळेचे ते अध्यक्ष होते. वेदपाठ शाळेत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची. बार्ंडग रोड येथील मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

आयुर्वेदातील आधुनिक संशोधनात त्यांना रस होता. त्यांनी कर्करोग आणि मुत्रपिंडाच्या आजारावरील आयुर्वेदिक औषधांवर संशोधन केले. अलीकडे कोरोनावरील आयुर्वेदिक औषधाचे त्यांनी संशोधन सुरू केले होते. आयुर्वेदिक क्षेत्रातील एक प्रयोगशील वैद्य अशी त्यांची ओळख कायम राहिली आहे.