‘वास्को द गामा’ला सॅल्यूट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

मी पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये पाय ठेवला आणि एक खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.

लिस्बन म्हणजे लंडन, पॅरिस, रोम नव्हे, पण मनातल्या मनात आपण आपल्या गोव्याच्या थोरल्या भावाकडे जात आहोत असं वाटतं होतं. कदाचित ‘आपलं गोवं’ असं मी म्हणणं म्हणजे जवळच्या नातेवाईकाच्या मुलाला दत्तक घेण्यासारखं आहे. कारण मला कोंकणी येत नाही, माझं गोव्यात घर नाही, पण आमचं कुलदैवत तिथे आहे आणि एक अदृष्य नाळ गोव्याशी जोडली गेलीय. त्यात जिभेने मी गोवेकर.

पोर्तुगीजांच्या छळामुळे ज्या काही सारस्वत कुटुंबांनी गोवं सोडलं त्यातलं एक आमचं कुटुंब. मला जुनं ऐतिहासिक ‘शत्रुत्व’ खांद्यावर घेऊन फिरायला आवडत नाही. गोरेसुद्धा तेवढे उदारमतवादी असतात. नाहीतर महात्मा गांधींचा पुतळा ब्रिटिशांनी पार्लमेंटमध्ये कशाला उभारला असता!

स्वा. सावरकरांनी तर त्यांच्यावर क्रांतीचं पिस्तूल रोखलं, पण ते जिथे लंडनमध्ये राहत तिथे त्यांची पाटी आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

आणखी एक व्यक्तिमत्त्व मला पोर्तुगालकडे ओढून घेऊन गेलं ते म्हणजे ‘वास्को द गामा’! इतिहास आणि भूगोल फक्त मार्कांसाठी मी अभ्यासला नाही. त्यातल्या काही मंडळींनी किंवा ठिकाणांनी मला भुरळ घातली. वास्को द गामा त्यातला एक. पुढे त्याच्याबद्दलचं वाचन वाढलं, मग आदर आणि मग त्या जागा जाऊन पाहाव्याशा वाटल्या. मी दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’च्या खडकावर उभा होतो तेव्हा मला फक्त तो समुद्र, त्या उसळणाऱया निळय़ा लाटा दिसल्या नाहीत. त्या लाटांचं संगीत हे माझ्या डोळय़ांसमोर सरकणाऱया ऐतिहासिक काळाच्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत होतं. तो खडक ओलांडण्याच्या प्रयत्नात अनेक बोटी त्या खडकावर आपटल्या. तो खडक यम होऊन त्या नावाडय़ांकडे पाहून खदाखदा हसतोय असं वाटायचं. यकश्चित मानवाचं हे काम नाही असं त्याला वाटत असताना वास्को द गामा त्याला डोळा मारून तिथून निघून गेला. तो थेट त्याच्या इच्छित स्थळी हिंदुस्थानात पोहोचला. ८ जुलै १४९७ रोजी तो लिस्बनहून निघाला. बरोबर चार बोटी आणि १७० खलाशी असा लवाजमा. बरं, बोटी म्हणजे आजच्या जमान्यासारख्या नाहीत. एवढी मोठी टायटॅनिक, पण समुद्राने तिला गिळली. याचं साहस कसं होतं, तर एक हात यमाच्या हातात द्यायचा आणि त्यालाच आव्हान द्यायचं, ‘‘तू जिंकतोस की मी जिंकतो.’’

…आणि तो जिंकला. तो हिंदुस्थानात कॅलिकट म्हणजे आताच्या कोझिकोडला पोहोचला. तारीख होती २० मे १४९८. त्यानं जे अंतर कापलं होतं ते संपूर्ण विषुववृत्ताला अख्खी फेरी मारण्यापेक्षा जास्त होतं. तो तिथून परतला तेव्हा त्या १७० पैकी फक्त ५५ खलाशी त्याच्या बरोबर होते (बाय द वे, गुगल नव्हतं तेव्हा).

एका जन्मासाठी खरं तर हे एक साहस, ते मृत्यूला खिजवणं पुरेसं होतं, पण तिथेच तो थांबला नाही. पोर्तुगीज राजा पहिल्या मॅन्युअलला आता हिंदुस्थानातल्या वसाहतीचं स्वप्न पडलं. मसाल्याच्या व्यापारावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यामुळे वास्को द गामा पुन्हा हिंदुस्थानात आला. पुन्हा मृत्यू हतबल झाला. जगाच्या इतिहासात नाव काय, वास्को द गामाचे धडे लिहिले गेले होते, पण त्याला सुरक्षित जमिनीपेक्षा खवळलेला समुद्र जास्त प्यारा होता. पुन्हा तिसऱयांदा तो हिंदुस्थानात आला. समुद्र त्याने पुन्हा एकदा जिंकला, पण त्यानंतर त्याला चक्क डासांनी हरवलं. त्याला मलेरिया झाला आणि त्यात तो गेला. तारीख होती २४ डिसेंबर १५२४.

लिस्बनमध्ये गेल्यावर विविध स्थळं पाहताना ‘वास्को द गामा’ हे नाव सातत्याने कानावर पडलं. फक्त साहस आणि हिंदुस्थानचा समुद्रमार्गे शोध हेच त्याचं कार्य नव्हतं. विविध मसाले आणि इतर हिंदुस्थानी वस्तूंचं युरोपियन मार्केट त्यानं काबीज केलं. युरोपियन देशांना पोर्तुगालकडून माल घ्यावा लागायचा. त्यानंतर शंभर वर्षांनी डच, इंग्लिश, फ्रेंच आणि डॅनिश मंडळीने पोर्तुगालचं व्यापारावरचं वर्चस्व तोडलं आणि जगभर आपल्या वसाहती स्थापायला सुरुवात केली. त्यामुळे वास्को द गामाला तिथे अत्यंत मानाचं स्थान आहे.

गोव्यात जशी मांडवी तशी लिस्बनला टॅगस नावाची नदी आहे. त्याच्या समोर मॅन्युलाइन वास्तुशैलीतली जेरोनिमोज मॉनेस्ट्री आहे. तिथे एक चर्च होतं. त्याचं नाव चर्च ऑफ सेंट मेरी ऑफ बेलेम. त्या चर्चमध्ये वास्को द गामा आणि त्याच्या सहकाऱयांनी हिंदुस्थानला निघण्यापूर्वी रात्रभर प्रार्थना केली होती. वास्को द गामाच्या या सफरीची आठवण म्हणून या चर्चच्या जागी ही वास्तू उभारण्यात आली. १५०२ मध्ये या वास्तूच्या उभारणीला सुरुवात झाली. ती वास्तू पूर्ण व्हायला पन्नास वर्षे लागली. दरवर्षी सत्तर किलो सोन्याएवढा पैसा या वास्तूवर खर्च केला. नुसत्या या आकडय़ांनीच त्या वास्तूची भव्यता डोळय़ांसमोर येईल. त्यासाठी हिंदुस्थानातून येणाऱया मसाल्यावर विशेष कर बसवण्यात आला. त्या भव्य वास्तूत सुंदर नक्षीकाम केलेल्या जागेत राजघराण्यातल्या मंडळींसह वास्को द गामा चिरनिद्रा घेतोय.

टॅगस नदीच्या समोर एक प्रचंड चौक आहे. त्यात सुंदर बाग वगैरे आहे. मुंबई स्टाईलमध्ये सांगायचं तर एकमजल्याची वास्तू आहे, पण इमारत, बंगला आणि वास्तू यातला फरक ती पाहिल्यावर जाणवतो. गॉथिक-मॅन्युलाइन आर्किटेक्चर म्हणजे काय ते कळतं. तिथे मेरीटाइम आणि आर्किऑलॉजिकल म्युझियमही आहे. या वास्तूचा जो प्रमुख दरवाजा आहे त्याला नेहमी चर्चवर दिसतात तशी शिखरं आहेत, कमानी आहेत. माझं लक्ष वेधून घेतलं ते त्यावरच्या एका शिल्पाने. सेंट जेरोमच्या आयुष्यावरचे दोन प्रसंग त्यात आहेत. आधी हा सेंट जेरोम म्हणजे कोण ते सांगतो. ख्रिश्चन धर्मातला एक संत ज्याने बायबलचं भाषांतर लॅटिनमध्ये केलं. तो चर्चचा डॉक्टर होता. एकदा त्याच्या चर्चमध्ये एक सिंह आला. सर्व घाबरून पळाले. त्याला जाणवलं की, तो सिंह जखमी आहे, त्याच्या पंजात काटा घुसलाय तो त्याने काढला. तो प्रसंग फार सुंदर चितारलाय. मोनेस्ट्रीचं अंतरंगही अतिशय देखणं आहे, पण आणि एक गंमत सांगतो, वास्को द गामा ख्रिस्तवासी झाला कोचीनमध्ये. त्याला कोचीनमधल्या सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये पुरलं, पण नंतर सोनं आणि रत्नांच्या पेटीतून त्याचे अवशेष लिस्बनला नेले गेले आणि आता त्या मोनेस्ट्रीत तो चिरनिद्रा घेतोय.

त्याच्या साहसाला, त्याच्या ऐतिहासिक कार्याला सॅल्यूट ठोकून मी टॅगस नदीच्या किनाऱयावर बेलेम टॉवरकडे गेलो, जिथून तो हिंदुस्थानकडे रवाना झाला. मनाने मी झटपट 1498 मध्ये गेलो. ते सर्व चित्र डोळय़ांसमोर उभं राहिलं. अंगावर काटा आला नुसत्या त्या प्रवासाच्या कल्पनेने!

हे लिहितानाही तो काटा तसाच आहे.
– [email protected]