
>> नीती मेहेंदळे
हे मंदिर संत चांगदेव यांनी स्थापन केले असा निष्कर्ष तज्ञ काढतात. चांगदेव हे ज्ञानेश्वरांना समकालीन. वटेश चांगा, चांगा वटेश्वर अशा नावानेही ते ओळखले जातात. प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकरांच्या दुर्गभ्रमण गाथा पुस्तकात हरिश्चंद्रगडावरच्या शिलालेखात याच चांगा वटेश्वर नावाचा उल्लेख चांगदेवासंदर्भात सापडतो. संत मुक्ताबाईने चांगदेवांना वडाच्या झाडाखाली ईश्वररूप दाखवले म्हणून हा वटेश्वर असेही काही संशोधकांचे मत आहे.
पुणे जिह्यातला सासवड भाग तसा प्रचंड ऐतिहासिक ठेवा बाळगून असलेला टुमदार परिसर. इथली मंदिरं आठवली की पहिले आठवतं ते कोटांमधली सुरक्षित मंदिरं, उंच जोती, मोठे भव्य नंदी व नंदीमंडप. या मंदिरांचा काळ हा नव यादव काळ समजला जातो. अठराव्या शतकातल्या मंदिर स्थापत्याच्या काही प्रमुख प्रकारातला हा एक प्रकार. गाभारा, अंतराळ, काही प्रमाणात उघडा बाह्यमंडप व नंदीमंडप अशी या मंदिरांची साधारण रचना दिसते. मंदिरावर आता इस्लामिक प्रभावातल्या छत्र्या व मनोरे येऊ लागलेले दिसतात. सासवडमधलं संगमेश्वर, वटेश्वर या शैलीचा नमुना म्हणता येईल.
बोपदेव घाटातून सासवडमध्ये चढून आलं की पहिलं हिवरे नावाचं जुनं गाव लागतं. हिवऱ्यातलं प्रचंड कोटातलं प्रशस्त महादेव मंदिर तसंच सासवडहून पुरंदराच्या रस्त्यात लागणारं पूरचं नारायणेश्वर ही पण याच काळातली अप्रतिम मंदिरं. खुद्द सासवड गावातलं पुरंदरे वाडय़ाच्या भिंतीला खेटलेलं भैरवनाथाचं भक्कम कोटातलं सुरेख मंदिर, वाडय़ाचाच भाग असलेलं गणपती मंदिर इथून संगमेश्वर, राममंदिर असं पाहत आपण गावाच्या टोकाशी येऊन ठेपतो.
झाडीत लपलेलं पुन्हा तटबंदीयुक्त बांधकामातलं चांगा वटेश्वर हे अतिशय देखणं मंदिर आजही आपल्या सुबक स्थापत्यशैलीचा पुरावा देत टिपून आहे. मंदिर असं बाहेरून लगेच दिसत नाही. कोटाची सुरेख कमान व प्रवेशद्वारापासून लागणाऱ्या पायऱ्या आपल्याला देवळापाशी नेऊन सोडतात. अशाच पायऱ्या कोटाच्या डावीकडूनही येताना दिसतात.
देवळाची रचना भूमिज विधानाची असून चारी बाजूंनी प्रक्षेप(रथ) काढलेले दिसतात. देवळाबाहेर विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या दीपमाळा षटकोनी चौथऱ्यावर बांधलेल्या दिसतात.
या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य़ म्हणजे याच्या खांबांवर, भिंतींवर अनेक प्रकारची फुले कोरली आहेत. पूर्ण मंदिरावर दीडएकशे फुलं कोरली असावीत.
मंडपाच्या भिंतींवरचं शिल्पकाम फारच ठसठशीत देखणं झालं आहे. यांत दहीमंथन करणारी स्त्री, अलंकारयुक्त मोर, गरुड, मल्ल, विशिष्ट मुद्रांमधले नर्तकनर्तकी अशी निरनिराळी दुर्मिळ शिल्पं इथे दिसतात. नंदीमंडपातले उठावदार स्तंभ सालंपृत शिल्पकामाने खचाखच भरलेले दिसतात. हे स्तंभ मध्ये चौकोनी, षटकोनी कधी दंडगोलापृती आहेत व त्यावर साखळ्या, पंगन, मणिमाला कोरल्या आहेत.
आतल्या मंडपात रंगमंडप व चार स्तंभ तसेच भिंतीत बारा अर्धस्तंभ दिसून येतात. मध्यभागी कासव आणि स्तंभाच्या मध्यभागी वेगवेगळ्या प्रकारांची फुलं कोरली आहेत. गाभारा (गर्भगृह) चौकोनी असून बाहेरून नक्षत्राकार आहे. बाहेरच्या भिंतीवर थरांची रचना आपली दृष्टी खिळवून टाकते. पंकण, पट्टे इत्यादींनी सुशोभित केलेले थर मंदिराची शोभा वाढवतात.
मंदिराचा परिसर अतिशय रम्य मनमोहक असा आहे. पूर्वेकडे पाहिल्यास भगीरथाचं देवालय दिसतं. संगमेश्वराप्रमाणे शेजारून कऱहा नदी व एक ओढा वाहत असल्याने मंदिराला एक नैसर्गिक देखणेपण आपोआपच आलं आहे.
एक मात्र नक्की, संगमेश्वरासह वटेश्वर, सिद्धेश्वर, पूरचे नारायणेश्वर ही मंदिरे समकालीन असल्याने त्यांचा निर्मितीकाल हा परिसरात सुबत्ता नांदत असावी. नंदी वा वाहनमंडप, त्याच्या सभोवतीचे कक्षासन या खुणा त्याच्या समृद्ध कालखंडाची साक्ष देतात.





























































