
>> सुबोध जठार
महाराष्ट्रातील दुर्गम खेडय़ांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या व त्यामुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या गरजू, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेला अनुरूप असे व्यावसायिक कौशल्याधारित शिक्षण घेण्यास सर्व प्रकारे मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधून एक संवेदनशील, जागरूक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे विद्यादान सहाय्यक मंडळाचे उद्दिष्ट आहे.
विद्यादान सहायक मंडळ (विद्यादान VSM) ही एक स्वयंसेवी संस्था म्हणून 2008 साली स्थापन करण्यात आली. संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय ठाणे येथे असून शहापूर, ठाणे, पुणे, बोरिवली, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेच्या एकूण सहा शाखा आहेत. या शाखांद्वारे संस्थेचे महाराष्ट्रभर जाळे विस्तारलेले आहे. 2008 पासून आजपर्यंत संस्थेच्या स्वयंसेवकांची व विद्यार्थ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढते आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिह्यांमधून संस्थेच्या योजनांचा लाभ घेणारे 475 विद्यार्थी तसेच शिक्षण पूर्ण केलेले 648 माजी विद्यार्थी आहेत.
विद्यादानची कार्यपद्धती
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विद्यादान संस्थेने अतिशय अनोखे आणि नावीन्यपूर्ण असे मार्गदर्शक विद्यार्थी प्रारूप विकसित केले आहे. संस्थेमध्ये निवडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता एक मार्गदर्शक नियुक्त केला जातो, जो विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा बनून विद्यार्थ्यांचा पालक, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांकरिता एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून काम करतो. त्याची उत्तम प्रगती व्हावी म्हणून वेळोवेळी त्याला प्रेरणा-प्रोत्साहन देतो. एक स्वयंसेवी संस्था म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन हे विद्यादानचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यानुसार संस्थेमध्ये व्यावसायिक तज्ञांच्या नेतृत्वाखाली 14 करीअर मार्गदर्शन संघ आहेत. शैक्षणिक कार्यशाळा, विविध क्षेत्रांतील तज्ञांचे व्याख्यान, चर्चासत्र, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवाने आदान-प्रदान, विद्यार्थ्यांचा नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने बायोडाटा बनवणे, मुलाखतीची तयारी असे विविध उपक्रम करीअर मार्गदर्शन संघ राबवीत असतात.
विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा या हेतूने संस्था व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे भरवणे, इंग्रजी संभाषण कलेचे शिक्षण देणे, सामाजिक व वैद्यकीय शिबिरांसाठी विद्यार्थ्यांना प्रायोजित करणे असे विविध उपक्रम संस्था राबवीत असते. विद्यादान शाखा स्तरावर आणि करीअर मार्गदर्शन संघ स्तरावर मासिक बैठका, चर्चासत्र, बी फ्रँक गटचर्चा आदी उपक्रमांचे आयोजन करते. अशा अभ्यासेतर कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येऊन त्यांच्या मनातील संकोच व भीती दूर होण्यास व आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडण्यास मदत होते.
या अनोख्या कार्यपद्धतीद्वारे प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक प्रवासाच्या शेवटी एक स्वतंत्र, स्वावलंबी व सामाजिक जाणीव असलेला समाजाचा जबाबदार सदस्य म्हणून विकसित व्हावा हा संस्थेचा हेतू आहे.
विद्यादानला मिळालेले यश
संस्थेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, परिचारिका, अभियंता, तंत्रज्ञ, वास्तुविशारद, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे काम करत आहेत. काही विद्यार्थ्यांची निवड गरूड कमांडो (हवाई दलाची एक शाखा), पीएच.डी. फेलो अशा वैशिष्टय़पूर्ण क्षेत्रांमध्येही झालेली आहे. संस्थेच्या मदतीने घडून आलेली विद्यार्थ्यांची अशी प्रगती पाहणे ही कार्यकर्त्यांकरिता अतिशय समाधानाची बाब आहे. संस्थेचे सुशिक्षित, अर्हताप्राप्त कमावते व जबाबदार माजी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत, त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेत आहेत. संस्थेचे माजी विद्यार्थी त्यांच्या कार्यातून समाजातील दुर्बल घटकांच्या शिक्षणाला, प्रगतीला हातभार लावत आहेत व संस्थेचे कार्यदूत बनून सक्षम राष्ट्रनिर्मितीचे उद्दिष्ट जोमाने साकार करत आहेत.
विद्यादानचे बातमीपत्र
‘VSM Connect’ नावाचे तिमाही बातमीपत्र संस्थेतर्फे इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केले जाते. ‘VSM Connect’ च्या माध्यमातून संस्थेचे देणगीदार, हितचिंतक, विद्यार्थी, स्वयंसेवक मार्गदर्शक अशा सर्व घटकांपर्यंत संस्थेची अद्ययावत माहिती, विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व अशा अन्य महत्त्वाच्या बाबी पोहोचविल्या जातात.
संस्थेला मिळणाऱ्या एकूण निधीचा साधारण 25 टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व उर्वरित फक्त 5 टक्के निधी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजावर खर्च केला जातो. सलग सहा वर्षे विद्यादानला एक विश्वासार्ह स्वयंसेवी संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे व ‘GuideStar India Transparency Key Award’ हा प्रतिष्ठत सन्मान मिळाला आहे.

























































