मुद्दा – आधुनिक द्रोणाचार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> फ्रान्सिस डिमेलो

परळच्या कामगार वस्तीत नावारूपाला आलेल्या आर. एम. भट हायस्कूलचे 1968-69 हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. शाळेचा तो खरोखरीचा सुवर्णकाळ! याच वर्षी शाळेच्या मंडपाला आणखी एक सुवर्णपताका लागली. तत्कालीन मुख्याध्यापक प्रिं. एन. जी. जोशी यांच्या अथक प्रयत्नाला यश येऊन शाळेला एन. सी. सी. पथकाची परवानगी मिळाली. शाळा हे पथक चालविण्यासाठी तरुण, तडफदार आणि थोडेसे रांगडे व्यक्तिमत्त्व असलेल्या शिक्षकाच्या शोधात होती. त्याच सुमारास विकास काटदरे नावाचा एक तरुण स्वबळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड करीत होता. पार्ल्याचे डॉ. घोटीकर कुटुंब त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम करीत होते.

…आणि एक सुंदर योग जुळून आला. आर. एम. भट हायस्कूलचा शोध संपला; तसाच विकास काटदरेंच्या जीवननौकेला एका बंदराचा आश्रय मिळाला. त्यांची भवितव्याची चिंता संपली. आर. एम. भट हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून ते रुजू झाले. त्याहीपेक्षा पुढील सुमारे तीन तपांसाठी शाळेच्या एन. सी. सी. पथकाला अगदी रांगडे शिपाईगडी मिळाले. ‘समसमा संयोग की जाहला.’

योगायोगाने घडलेला हा संयोग पुढे अर्धशतकापर्यंत नुसता जुळून नाही राहिला; तर अधिकाधिक दृढ होत गेला. तीन वर्षांपूर्वी शाळेने शतकमहोत्सव साजरा केला; तेव्हा सुवर्णमहोत्सवानंतरच्या शाळेच्या अर्थशतकाचे साक्षीदार म्हणून काटदरेसर मोठय़ा गौरवाने सहभागी झाले होते. पण अचानक कोरोनाच्या पहिल्या लाटेने विकास काटदरे नावाचे व्यक्तिमत्त्व अकल्पितपणे वयाच्या 74 व्या वर्षी पडद्याआड नेले. या दुःखद घटनेला चार दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त तमाम आर. एम. भट हायस्कूल परिवाराच्या वतीने काटदरेसरांना मानवंदना दिली होती. काटदरे सरांचे आयुष्य एक सामान्य व्यक्ती म्हणून गेले. मात्र त्यांची ओळख ‘एक कडक शिस्तीचा शिक्षक, एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्ता आणि एक परखड पत्रकार’ अशी होती. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी अशाच शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. मला वाटतं यातच काटदरेसरांचा मोठेपणा सामावला आहे.

काटदरेसरांच्या मार्गदर्शनाखालील आणि अधिपत्याखालील एन.सी.सी. पथकाने गौरवशाली परंपरा निर्माण केली आहे. आजतागायत ती परंपरा टिकवत हे पथक काटदरेसरांचा वारसा पुढे नेत आहे. हे पथक म्हणजे काटदरेसरांचे स्वतंत्र साम्राज्य होते. त्यात शाळेचे मुख्याध्यापकही कधी ढवळाढवळ करू शकले नाहीत. शिस्त, वक्तशीरपणा, जबाबदारीची जाणीव आणि कणखरपणा ही एन. सी. सी.ची आवश्यक गुणवत्ता. हे गुण कॅडेट्समध्ये निर्माण करताना आधी काटदरेसरांनी ते पुरेपूर अंगी बाणवले होते. याच व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन शाळेच्या कितीतरी माजी विद्यार्थ्यांनी लष्करी सेवेत दाखल होऊन उच्च पदे भूषविली आहेत व भूषवत आहेत. इंडियन नेव्हीमधून कमांडर ऑफिसर पदावरून निवृत्त झालेले कमांडर महेश कोठूरकर, हवाई दलातून निवृत्त झालेले हर्षद गाभारे, लेफ्ट. कर्नल पदावर कार्यरत असलेले संदेश दाभोळकर आणि नेव्हीमध्ये कमांडंट ऑफिसरच्या पदावर असलेले सुरेश पांडे या सगळय़ांचे प्रेरणास्त्रत कोणी असतील तर ते काटदरेसर!

याशिवाय पोलीस दल आणि अन्य क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उठविणारे या शाळेचे माजी विद्यार्थी त्यांच्या यशाचे मोठे श्रेय काटदरेसरांनाच देतात हे विशेष! केदार शिंदे, अंकुश चौधरी, मंदार चांदवडकर हे सर्व आघाडीचे कलाकार तसेच आयएएस अधिकारी अजित पाटील काटदरेसरांच्या एन.सी.सी.च्या मुशीतूनच घडले आहेत. काटदरेसरांचा परीसस्पर्श झालेला एक सेनाधिकारी लेफ्ट. कर्नल संदेश दाभोलकर यांनी लेहच्या युद्धभूमीवरून या स्वर्गस्थ आधुनिक द्रोणाचार्याला एक पत्र पाठवून आदरांजली वाहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘काटदरे सरांच्या या शिस्तीचा बडगा आणि आवाजातली जरब आम्हाला जीवनाची योग्य दिशा दाखवून गेली हे कोणालाच नाकारता येणार नाही. आपापल्या क्षेत्रात चमकून आम्ही त्यांचे नाव उज्ज्वल करत आहोत. नव्या रक्ताचे तरुण शिक्षक यांची धुरा पुढे चालवतील अशी खात्री आहे.’’

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने काटदरे सरांवर तरुण वयातच गारुड केले होते. ‘पत्रकारिता’ हा काटदरेसरांच्या जीवितकार्याचा एक अविभाज्य भाग होता.