ठसा – विक्रम गोखले

>>प्रशांत गौतम

विक्रम गोखले नावाच्या रंगभूमीवरील या अनभिषक्त नटसम्राटाने एक्झिट घेतली आणि अवघे कलाविश्व पोरके झाले. भूमिका मग ती चित्रपटातील असो, रंगभूमीवरील असो नाहीतर छोटय़ा पडद्यावरची असो. वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतून त्यांनी कसदार, अभिजात अभिनय सादर केला. भूमिकेचा सखोल अभ्यास, लाभलेली चौफेर निरीक्षणशक्ती, राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि महत्त्वाचे म्हणजे आवाज या गुणविशेषावर त्यांनी स्वतःचे ‘गोखले पर्व’ निर्माण केले.

तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा हा अभ्यासू अभिनेता. त्यांच्या अभिनयाने उंची गाठली. निकषाचे मापदंडही ठरवले. त्यांच्या जाण्याने या तिन्ही क्षेत्रांची अपरमित हानी झाली आहे. अभिनयासोबत प्रगल्भ सामाजिक भान असलेले ते दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या राजकीय भूमिका वेगळय़ा असल्या, तरी त्यावर ते ठाम होते. गोखले यांच्या घरातच अभिनयाचे बाळकडूही परंपरेने आले. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. आजी कमलाबाई (कमलाबाई कामत) या पहिल्या बालअभिनेत्री होत्या. त्यांनी दोनशे नाटकांत भूमिका केल्या. वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमीवरील सशक्त, दमदार अभिनेते होते. लालजी गोखले, सूर्यकांत गोखले हे तबलावादक होते.

एकूणच काय तर पणजी, आजी, आई, वडील यांच्याकडून आणि आईच्या माहेरकडूनही अभिनयाचा संपन्न वारसा त्यांना मिळाला. पुण्यात 30 ऑक्टोबर 1947 रोजी कलावंतांच्या घरात जन्मलेल्या विक्रम गोखले यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमांतून काम केले होते. वैविध्यपूर्ण भूमिका साकार केल्या होत्या. अभिनयासोबतच लेखन, दिग्शदर्शन हा त्यांचा महत्त्वाचा पैलू अधोरेखित करावा असाच आहे. पल्लेदार संवादफेक, भूमिका साकार करताना घेतलेला पॉस कुणीही नाटय़रसिक विसरू शकणार नाही. बाळ कोल्हटकर यांच्या नाटकातून त्यांना भूमिका मिळण्यास प्रारंभ झाला. ‘स्वामी’ या नाटकातील माधवराव पेशवे यांची ऐतिहासिक भूमिका त्यांनी साकारली. ‘बॅरिस्टर’, ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’ आणि ‘मकरंद राज्याध्यक्ष’, ‘खरं सांगायचे तर’, ‘नकळत सारे घडले’ अशा दमदार नाटकांतील त्यांच्या कसदार भूमिका रसिक प्रेक्षकांना आठवतात. ‘संकेत मिलनाचा’ या नाटकापासून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. यात आजही रसिकांच्या मनात घर करून असते ती भूमिका म्हणजे ‘बॅरिस्टर’मधील ही नाटय़कृती, हा अभिनय म्हणजे कसदार अभिजाततेचा उत्कृष्ट मापदंड म्हणावा लागेल.

मराठी सिनेमातील त्यांच्या भूमिका यानिमित्ताने नजरेसमोर येतात. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कळत-नकळत’, ‘माहेरची साडी’, ‘पुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’, ‘वऱहाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’, ‘सावरखेड एक गाव’, ‘अनुमती’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘दुसरी गोष्ट’ यांचाही उल्लेख येथे करावा लागेल. वि.वा. शिरवाडकर यांचे नाटक ‘नटसम्राट’ हे रूपेरी पडद्यावर जेव्हा चित्रपट म्हणून आले, तेव्हा रसिकांना ते बघण्याची उत्सुकता होती. यात विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांची रंगलेली जुगलबंदी कुणीही विसरू शकणार नाही. असाच निर्भेळ आनंद ‘आप्पा-बाप्पा’ या चित्रपटानेही दिला. यात विक्रम गोखले आणि दिलीप प्रभावळकर यांची रंगलेली जुगलबंदी याचाही उल्लेख करावा लागेल. ‘वजीर’ चित्रपटातील भूमिकेसाठी गोखले यांना फिल्मफेअर सन्मान मिळाला. मराठी चित्रपटांप्रमाणेच गोखले यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैया’, ‘मदहोशी’, ‘तूम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘श्याम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘मिशन मंगल’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘गफला’, ‘धुवाँ’ अशा कितीतरी हिंदी चित्रपटांची नावे सांगता येतील. नुकताच आलेला चित्रपट ‘गोदावरी’ यात त्यांची भूमिका होती. तीच भूमिका शेवटची ठरली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका गाजवल्या. तशा अनेक हिंदी, मराठी मालिकांचा छोटा पडदाही व्यापून टाकला. नाटय़मंदिर, रंगमंदिरांची दुरवस्था हा त्यांच्या आस्थेचा, आपुलकीचा संवदेनशील असा विषय होता. अभिनयासोबत सामाजिक बांधिलकी जपणारे ते कलावंत होते. 2016 साली ‘के दिल अभी भरा नहीं’ नाटय़ातून नागपुरात प्रेक्षकांच्या भेटीला ते आले होते. घशाचा त्रास होत असल्याने त्यांनी रंगभूमीला अलविदा केले. आज मात्र त्यांनी या जगातून एक्झिट घेतली. असा नटसम्राट, असा बॅरिस्टर होणे नाही. यासम हाच म्हणतात तेच खरे!
n