
>> द्वारकानाथ संझगिरी
विराट कोहलीने टी-20मधल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. उलट मी असे म्हणीन – देर से आए दुरुस्त आए… खूप दिवस याबाबत चर्चा चालली होती की, एका माणसाकडे तीन प्रकाराचे नेतृत्व असावे की नाही. क्रिकेट जगतातल्या इतर देशांनी त्याबाबतीत कधीच निर्णय घेतला होता. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी त्यांच्याकडे वेगवेगळे कॅप्टन्स आहेत. आपलाच एक देश आहे की जिथे तिन्ही फॉरमॅट एकाच देवाला वाहिले जात होते.
सध्या क्रिकेट खूप वाढलंय. त्यामुळे दबावसुद्धा खूप वाढलाय. एकाच माणसाला कर्णधार म्हणून तीन फॉरमॅट हाताळणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक फॉरमॅटचे डावपेच वेगळे असतात. खेळाडूंकडून अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे त्याचा दबाव हा कॅप्टनवर पडतोच पडतो. कॅप्टनला स्वतःच्या बॅटिंगबरोबर इतर खेळाडूंचा विचार करावा लागतो. गेल्या तीन वर्षांत असं लक्षात आलं की कोहलीच्या धावा होत नाही आहेत. शेवटी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध ठोकलेल्या शतकानंतर त्याचं कुठल्याही फॉरमॅटमध्ये शतक झालेलं नाही आहे. कुठेतरी त्याला फलंदाजीतील अपयशानंतर नेतृत्वाचा दबाव जाणवत होता.
खुर्च्या तीन असल्या तरी एक सोडतानाही जिवावर येतं. आपल्या फॉर्मच्या जिवाशी नेतृत्व येतं म्हटल्यानंतर त्याने एक खुर्ची सोडली. नेतृत्व सोडण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. आजवर अनेक महान खेळाडूंनी नेतृत्व सोडलेलं आहे. सचिन तेंडुलकरने सोडलंय. कपिलदेवने सोडलं. सुनील गावसकरने सोडलं. इयान बॉथमने सोडलं. इयान बॉथमला जेव्हा कॅप्टन केला तेव्हा त्याला यश मिळत नव्हतं. त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होत होता. एक दिवस त्यानं नेतृत्व सोडलं इंग्लंडचं आणि माईक ब्रेअरली त्यांचा कर्णधार झाला. माईक ब्रेअरलीने इंग्लंडला अॅशेस तर जिंकून दिलाच पण बॉथमने अफलातून ग्रेट परफॉर्मन्स त्या मालिकेत केला. बरं असं आहे का, विराट कोहली हा उत्तम, कावेबाज, निष्णात कर्णधार आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. जास्तीत जास्त सामने जिंकणं हा चांगल्या नेतृत्वाचा मापदंड मानला तर त्याला चांगला कर्णधार म्हणता येईल. पण ते नेहमीच खरं नसतं. उत्तम संघ असताना क्लाइव्ह लॉईड 15 वर्षे जागतिक क्रिकेटवर राज्य करीत होता. तरीदेखील त्याला पुणी महान कर्णधार वैगैरे म्हटलं नाही. उलट ज्या ज्या वेळेला हिंदुस्थानचं नेतृत्व अजिंक्य रहाणे किंवा रोहीत शर्माने केलं तेव्हा ते विराटपेक्षा उजवे वाटले. थोडक्यात असं की विराट महान फलंदाज असल्यामुळे त्याला नेतृत्वाची वस्त्र चढवली होती. त्या वस्त्रांना हात घालायची कुणाची हिंमत नव्हती. या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तो नेतृत्व सोडणार आहे, ही योग्य गोष्ट आहे. कारण पुढल्या वर्षी पुन्हा टी-20 वर्ल्ड कप आहे. त्या वेळी हा जो नवीन कर्णधार होईल त्याला पुढच्या वर्ल्ड कपसाठी आपला संघ कसा असावा हे विचार करायला वेळ मिळेल. विराट कोहलीने वन डेच्या कॅप्टनशिपचासुद्धा विचार करावा. अलीकडे तीन तीन क्रिकेटचं फॉरमॅट व सातत्यानं असणारं क्रिकेट त्यामुळे कुठला तरी एक किंवा कुठले तरी दोन फॉरमॅट निवडतात. उदा. अॅण्डरसन फक्त कसोटी सामने खेळतो. तर काही खेळाडू फक्त टी-20 व वन डेवर लक्ष केंद्रीत करतात. पुढे पाच ते सहा वर्षे जर विराट कोहलीला खेळायचं असेल आणि क्रिकेटमधील अधिकाधिक विक्रम खिशात ठेवायचे असतील तर त्यानं योग्य आखणी करून इतर दोन फॉरमॅटमधल्या नेतृत्वाचासुद्धा विचार करायला हवा. त्यातच त्याच्यातल्या महान फलंदाजाचं हित आहे.
विराट महान फलंदाज असल्यामुळे त्याला नेतृत्वाची वस्त्र चढवली होती. त्या वस्त्रांना हात घालायची कुणाची हिंमत नव्हती. या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तो नेतृत्व सोडणार आहे, ही योग्य गोष्ट आहे.



























































