शतपावली

>> डॉ. नेहा सेठ

शतपावलीजेवल्यानंतर 100 पावले चालले की जेवण आपसूक पचते. आजीआजोबांसाठी ही एक उत्तम पचनव्यवस्था. त्यांनी शक्यतो ही शतपावली चुकवू नये.

रात्रीच्या जेवणानंतरची शतपावली हा आजी-आजोबांच्या दिनक्रमाचा एक भाग… हल्ली काही जागेचा अभाव, रस्त्यांवरील गर्दी, आवाज, आजारपण यामुळे त्यांना शतपावलीसाठी जाता येतेच असे नाही… त्यामुळेही आजारपणाच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात… स्वतःसाठी वेळ देणे, दिवसभरात घडलेल्या घटनांचे मनन-चिंतन, शांतता मिळावी, शरीर सुदृढ राहावे, यासाठी हा जेवणानंतर करायचा अगदी हलका व्यायाम आहे.   अजूनही अनेकांना ही शतपावली केल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही…बऱ्याचदा जेवणानंतर टीव्हीवरील मालिका बघण्यात वेळ घालवणे, वाढत्या वयामुळे बैठय़ा कामांना प्राधान्य देणे यामुळे शरीराची हालचाल होत नाही यामुळेच आजार वाढू नये यासाठी आपल्याकडे पूर्वापार सुरू असलेली ही ‘शतपावली’ कधी आणि कशी करावी? ते पाहूया.

शतपावली हा व्यायाम नव्हे

चालण्याचा व्यायाम अगदी पूर्वीपासून फायदेशीर समजला जातो. जेवणानंतरचे चालणे अर्थात शतपावली हा घाम गाळून करण्याचा व्यायाम नव्हे, पण तो पचनासाठी चांगला आहे. शतपावली दोन्ही जेवणांनंतर केली तरी चालते. पण रात्रीच्या जेवणानंतर केलेली जास्त चांगली असते. कारण एरवी आपण जेव्हा व्यायामासाठी चालतो तेव्हा भरभर चालण्यावर भर दिला जातो. शतपावली मात्र भरभर चालून करायची नसते. जेवल्यानंतर फार वेगाने चालल्यास पचन कमी होईल. सावकाश आणि जास्तीतजास्त 20 ते 25 मिनिटेच शतपावली करावी. ज्यांना एवढे चालणे शक्य नाही, त्यांनी 10 ते 15 मिनिटे शतपावली केली तरीही चालते. जेवणाचे समाधान अशा सावकाश केलेल्या शतपावलीतून मिळते.

मधुमेह नियंत्रणासाठी

मधुमेही व्यक्तींची पोस्ट प्रँडल शुगर म्हणजे जेवणानंतर मोजली जाणारी साखर शतपावलीमुळे चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून शतपावलीचा साधा हलका व्यायाम सुरू करता येईल. पण इन्शुलिन नेहमीप्रमाणे घेतले असेल व कमी खाल्ले असेल तर मात्र एकदम शतपावली करताना चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या प्रकृतीला काय झेपते याचा विचार करणे आवश्यक आहे.

काही फायदे

 • जेवणानंतर व्यायाम केला की शरीरात एंडॉर्फिन नावाचा द्रव स्त्रावू लागतो. या स्रवणामुळे समाधानाची भावना निर्माण होते.
 • चालायला सुरुवात केली की, भरलेले पोट थोडे हलके वाटू लागते. याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग असे म्हणतात. यात खाल्लेले अन्न आतडय़ांमध्ये जाण्यास चालना मिळते आणि पचनक्रिया लवकर होते.
 • शतपावलीमुळे ढेकर येणे, गॅसेस होणे आणि ऑसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • वजन कमी करण्यामध्येही शतपावलीची मदत होते, कारण अन्न शरीरात शोषले जात असतानाच एकीकडे हलका व्यायाम होत असतो. हे चालणे हलके असावे हे पुन्हा लक्षात घ्या. आधी सांगितल्याप्रमाणे शतपावली घाम गाळून करण्यासाठी नव्हे.
 • रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 • बऱ्याच जणांना निद्रानाशाची समस्या असते. त्यावर मात करण्यासाठी चालण्याची सवय फायदेशीर ठरते. यामुळे रात्री शांत झोप लागते.
 • शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.
 • शरीर उत्साही, चपळ आणि क्रियाशील राहते.

काही नियम

 • शतपावली करताना फोनवर बोलत, व्हिडीयो पाहात, गाणी ऐकत करू नये.
 • सपाट रस्त्यावरून चालावे. रस्त्यात खाचखळगे नसावेत. विजेची पुरेशी सोय असावी.
 • जेवणानंतर लगेचच झोपू नये. घराबाहेर चालण्याची सोय नसल्यास घरातल्या घरातही फेऱ्या मारू शकता.
 • जेवणानंतर चालताना शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या