
>> सुजाता बाबर
अंतराळातून वेगाने फिरत असलेल्या एका सूक्ष्म कचऱ्याच्या तुकडय़ाने ‘शेनझोऊ-20’ या अंतराळयानाला धडक दिली. हा अपघात चीनपुरता मर्यादित नसून जागतिक अंतराळ व्यवस्थेसाठीही धोका दर्शवणारा आहे. अंतराळातील वाढता कचरा आणि त्यातून निर्माण होणारे अपघात रोखण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये चीनच्या तिआनगोंग अंतराळ स्थानकावरून परतीसाठी सज्ज असलेली ‘शेनझोऊ-20’ ही मानवरहित मोहीम अचानक स्थगित करावी लागली. कारण अंतराळातून वेगाने फिरत असलेल्या एका सूक्ष्म कचऱयाच्या तुकडय़ाने या अंतराळयानाला धडक दिली. तीन चिनी अंतराळवीरांचे पृथ्वीवर परत येणे लांबले. या अपघाताने अंतराळातील वाढता कचरा आणि त्यातून निर्माण होणारे जागतिक धोके हा मोठा प्रश्न अधोरेखित केला आहे.
अंतराळातील कचरा म्हणजे उपग्रह, रॉकेटचे तुकडे, उपकरणांचे अवशेष, रंगाचे कण अशा मानवनिर्मित वस्तू ज्या कक्षेत फिरत असतात, पण त्यांचे कोणतेही कार्य उरलेले नसते. या कचऱयाचा वेग ताशी जवळपास 29,000 किलोमीटर इतका प्रचंड असल्याने अगदी सूक्ष्म कणदेखील जीवघेणे ठरू शकतात. एखादा छोटा तुकडा एखाद्या उपग्रहाला धडकला तर त्याचे अनेक लहान तुकडे तयार होतात आणि अशा रीतीने कचऱयाची संख्या झपाटय़ाने वाढत जाते.
या पार्श्वभूमीवर शेनझोऊ-20 ला लागलेला धक्का हा केवळ चीनपुरता मर्यादित प्रश्न नाही; तो आजच्या जागतिक अंतराळ व्यवस्थेचा गंभीर धोका आहे! विशेषत चीनसाठी ही बाब अधिक संवेदनशील ठरते, कारण चीनची अंतराळक्षमता गेल्या दोन दशकांत प्रचंड वाढली आहे. तिआनगोंग अंतराळ स्थानक हे चीनच्या 30 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानले जाते आणि 2030 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निवृत्त झाल्यानंतर तिआनगोंगच जगातील एकमेव सक्रिय स्थानक राहण्याची शक्यता आहे.
अंतराळातील कचऱयाच्या निर्मितीत चीनचे स्वतचे योगदान मोठे आहे. 2007 मध्ये चीनने फेंग्युन-1 सी या निक्रिय हवामान उपग्रहाचा नाश करून अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्राची चाचणी केली. या घटनेत 3,000 हून अधिक तुकडे निर्माण झाले आणि ते आजही पृथ्वीभोवती फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला अनेकदा या तुकडय़ांपासून वाचण्यासाठी कक्षा बदलावी लागली. अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्रांच्या विकासामागे स्पष्ट लष्करी कारणे आहेत. आधुनिक युद्धात उपग्रहांची भूमिका अनन्यसाधारण आहे. पहिल्या आखाती युद्धात अमेरिकेने उपग्रहाधारित क्षमतांचा प्रभावी वापर करून जगाला त्याचे सामर्थ्य दाखवून दिले. अमेरिकेची उपग्रहांवरची असलेली मोठी अवलंबित्व चीनला अमेरिकेची संभाव्य मर्यादा वाटली आणि चीनमध्ये अँटी-सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या संशोधनाला वेग आला. परंतु काळ बदलला आहे. आज चीन मोठय़ा प्रमाणावर उपग्रहांवर अवलंबून आहे.
2021 मध्ये रशियाने केलेल्या अँटी-सॅटेलाइट चाचणीतील तुकडे एका चिनी उपग्रहाजवळून धोकादायकरीत्या गेले होते. त्याच वर्षी तिआनगोंग स्थानकाला स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपग्रहांपासून वाचण्यासाठी अचानक कक्षा बदलावी लागली. आणि 2025 मध्ये आता प्रत्यक्ष धडक लागण्याची घटना घडली. चीनसह अमेरिका, रशिया, युरोपियन देश उपग्रहसमूह उभारण्यात गुंतले आहेत. केवळ स्टारलिंक उपग्रहांची संख्या 40,000 पर्यंत जाणार आहे तर चीनही आपल्या गुओवांग आणि क्यानफान प्रकल्पांतून दहा-दहा हजार उपग्रह पाठवण्याच्या तयारीत आहे. शेनझोऊ-20 दुर्घटनेनंतर चीनमध्ये आणि जागतिक स्तरावरही अंतराळ कचऱयाबाबत गंभीर चर्चा होण्याची शक्यता वाढली आहे. महत्त्वाच्या प्रकल्पाला बसलेला धक्का जगाला सांगतोय की, अंतराळ ही आता केवळ राष्ट्रांमधील स्पर्धेची जागा नसून सामूहिक जबाबदारीची पायरी आहे. संभाव्य धडकांबाबत परस्परांना माहिती देणे, उपग्रहांचे आयुष्य संपल्यावर ते सुरक्षितरीत्या कक्षेबाहेर काढणे, कचरा कमी करण्याच्या जागतिक नियमांची आखणी हे सर्व सहकार्याचे विषय ठरू शकतील.
अंतराळातील कचरा हा केवळ तांत्रिक प्रश्न नाही; तो राजनैतिक, पर्यावरणीय आणि सुरक्षा धोरणांचा केंद्रबिंदू होत आहे. कचऱयाचा धोका आता निव्वळ संभाव्यता राहिलेली नाही तर तो प्रत्यक्षात घडू शकणारा आणि राष्ट्रांच्या अंतराळ कार्यक्रमांना ठप्प करणारा संकटबिंदू बनला आहे. आता प्रश्न असा की चीन, अमेरिका आणि इतर अंतरिक्ष राष्ट्रे या संकटातून कोणते धडे घेतात. अंतराळातील कचरा गायब होणार नाही; त्याला रोखण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. शेनझोऊ-20 ची घटना या प्रयत्नांची सुरूवात ठरणार का हे पुढील वर्षांत समजेल.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)





























































