मुद्दा : पाणीटंचाईचे संकट

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे वनीकरणाचे महत्त्व अतोनात वाढलेले आहे. भविष्यात अल्प पावसामुळे मानवी प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत, त्यासाठी जगभरात जलजागृती करण्याची नितांत गरज आहे. या वर्षी तर मार्च महिन्यातच विहिरी, बारवा कोरडय़ा पडल्या असून महाराष्ट्रातील लहानमोठय़ा धरणातील पाण्याचा साठा अंदाजे 30 टक्क्यांच्या खाली गेला आहे. परिणामी एप्रिल-मेचा उन्हाळा अधिक तापदायक जाणार असल्याचे एप्रिलमध्येच जाणवत आहे. सर्वात तापदायक ठरणार आहे ते भूजल पातळीत सुधारणा कशी होईल, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवणारे आहे, कित्येक ठिकाणी तर भूजल पातळी अगदी एक मीटरच्या खाली गेलेली आहे. ठिकठिकाणच्या लहानमोठय़ा पाणी प्रवाहातील वाळू उपसा हे महत्त्वाचे कारण असताना बांधकाम व्यावसायिकांच्या दबावामुळे त्याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष होत आहे. प्रचंड प्रमाणात ग्रामीण भागाचे शहरीकरण होत असल्यामुळे पावसाच्या पाण्याला रिचवायला मोकळय़ा जागा कमी कमी होत चालल्या आहेत. अगदी शहरे व गावे जोडणारे रस्तेही मोकळय़ा जागांअभावी पाणीप्रूफ झाल्यामुळे त्या प्रमाणातील मोकळय़ा जागांमधून पाणी जमिनीत जिरवण्याचे प्रमाण कमी झालेले आहे, परंतु विकासाच्या नावाखाली हा प्रकारही कुणाच्या ध्यानात येऊ नये याचे नवल वाटते.

ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला रस्त्यावरून धावणारे पाणी वाया जाते अशा रस्त्यांच्या कडेला जर पाणी जमा करणारे चर वा खंदक खोदले तर त्या भागातील भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत नसल्याचे अनुभवास आले आहे. म्हणून पावसाचे पाणी कणाकणाने जिरवता आले पाहिजे व थेंबाथेंबाने थांबविता आले पाहिजे याबाबतचे प्रबोधन अगत्याचे झालेले आहे.

राज्यातील सिंचन व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र जनतेचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय पाण्याचा प्रश्न संपणारा नाही. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन केले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता काटेकोर वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या व जलौघाचे प्रदूषण रोखण्यापासून पाणी सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासाठी कायदे व नियमांचे पालन करणे, त्याबाबतची जागृती करण्याचे जरूरीचे झालेले आहे.