पाणी वाचवूया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हेमंत लागवणकर, पर्यावरण तज्ज्ञ

आज मुंबई पुण्यात पाणीबाणी जाहीर झाली आहे. पाऊस अजून पडण्याचे मनावर घेत नाहीए. सगळय़ाच गोष्टी शासनावर ढकलता येत नाहीत. थोडी काळजी आपण घेतली तर आपण सामान्य माणसं पाणी वाचवून पुढचा काळ सोपा, सुलभ करू शकतो.

जल साक्षरता…म्हणजे पाणी वापरताना ते वाया जाऊ नये त्याची साठवण व्हावी. यासाठी घ्यायची काळजी. आज अमर्याद होणारी वृक्षतोड…यामुळे पडणारा कमी पाऊस…भूजल पातळी कमी होणं… या साऱयाचा परिणाम म्हणून पाणीटंचाई होऊ लागली आहे. यासाठी आपण सर्वांनी पाणी बचतीबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. दैनंदिन कामे करताना किती पाणी वापरले जाते, किती वापरायला हवे याकडे सर्वसामान्य माणसाने लक्ष द्यावे. यामुळे रोजच्या वापरात अनावश्यक वापरले जाणारे पाणी वाचवता येऊ शकते. याकरिता सध्याच्या ‘जलसाक्षरता 2019’ निमित्त योग्य पाणी वापराबाबत घेतलेला हा आढावा …
पाणी वाचवण्यासाठी उपाय
l बऱ्याचदा घरांमधूनही लिकेजेस असतात. वॉशर खराब असतो, नळ नीट बंद केले जात नाहीत किंवा कुठेतरी थेंब थेंब पाणी गळत असतं. तेव्हा अंदाज येत नाही की किती पाणी वाया जातंय, पण असं जर असेल तर त्या गळणाऱया पाण्याखाली भांड ठेवावं. आणि तासाभरात किंवा दोन तासात किती पाणी जमा होतं. ते बघावं. हा प्रयोग केल्यावर लक्षात येतं की आपण किती लिटर पाणी वाया घालवतो.
l नळ अनावश्यक सुरू ठेवू नका.
l बेसीनमधला नळ चालू ठेवून दाढी करणे टाळा.
l बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा. शॉवरखाली उभे राहून अंघोळ करू नका.
l नळाखाली भांडी धुण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन घासलेली भांडी धुवा.
l अंघोळ केलेले पाणी जमा करा. त्याच पाण्याचा सडा टाका, त्याच पाण्यातून गाडया धुवा, तेच पाणी संडास सफाईसाठी वापरा, तेच पाणी बगीच्यातील झाडांना टाका, यालाच पाण्याचा पुनर्वापर म्हणतात.
l पाहुणे गेल्यास प्यायला दिलेले पाणी उगाचच उष्टावून ठेवू नका.
l घरातील गळक्या तोटया विनाविलंब दुरूस्त करून घ्या. कारण जरी ते थेंबथेंब गळत असले तरी दिवसभरातील गळती शेकडो लिटर असू शकते.
l पाण्याचा कोणी चुकीचा वापर करीत असेल तर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगून परावृत्त करा.
l गच्चीवरील पाण्याच्या टाक्या नळ बंद न केल्यामुळे विनाकारण वाहतच राहतात. त्या वाहणार नाहीत याची काळजी घ्या.
l झाडांना पाणी देतांना ते झाडांना द्या, जमिनीला देवू नका. झाडाला जेवढे पाणी हवे तेवढेच दिल्याने त्याची वाढ चांगली होते व पाणीही वाया जात नाही.
l वॉशिंग मशिनचे एक लोड पूर्ण होण्याइतके कपडे धुण्यासाठी रोज निघत नसतील तर मशीन एक दिवसाआड वापरल्यास पाणी मोठया प्रमाणात वाचू शकेल.
l भरपूर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्याठिकाणी पाण्याच्या ग्लासचा आकार छोटा ठेवला तर बरेच पाणी वाचू शकेल कारण अशा ठिकाणी अर्धाच ग्लास पाणी वापरून बाकीचे पाणी सहसा फेकून दिले जाते.
l सोसायटीच्या पाईपमध्येही काहीवेळा लिकेजेस असतात त्यामुळे बरंच पाणी वाया जातं. लिकेजेस थांबवणं महत्त्वाचं आहे.
l घराघरांतली लिकेजेस बंद केली तर बरंच वाया जाणारं पाणी थांबू शकतं.
l खूप मोठय़ा प्रमाणावर गरज नसताना पाणी उगाचच वापरलं जातं. हे टाळता येण्यासारखं आहे.
l दाढी करताना अनावश्यक नळ चालू राहतो. हे टाळता येऊ शकतं.
l अंघोळ करतानाही अनावश्यक शॉवर चालू राहू शकतो.
l वाया जाणाऱया पाण्याचा आढावा घ्यावा. कुठे, किती पाणी वाया जातं.
l घरातील फरशा, जिने, गच्च्या ओल्या पोछाने जरी पुसले तर त्या स्वच्छ राहतात.
l कालचे भरलेले व उरलेले पाणी शिळे पाणी म्हणून फेकून देवू नका. पाणी एका दिवसात शिळे होत नसते.
जलसाक्षरतेचा प्रसार
l शाळा, महाविद्यालयातून जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
l विद्यालयीन अभ्याक्रमात पाणी व त्याचे व्यवस्थापन याबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात यावी.
l पाणी वापरात काटकसर कशी करायची यावर प्रबोधन होणे आवश्यक आहे.
l शाळाशाळांमधून जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
l राजस्थानमध्ये घर बांधतेवेळीच घराचे खाली पाण्याची मोठी टाकी बांधण्यात येते. या टाकीत पावसाचे पाणी संग्रहित केले जाते व जसजशी गरज लागेल तसतसे हे पाणी वापरले जाते. असे करून कमी पाऊस पडत असूनसुध्दा तिथे पाणी प्रश्नावर मात केली जाते.
l तुमच्या घरी बोअरवेल असेल तर गच्चीवरील पावसाचे पाणी फिल्टर करून सरळ त्या बोअरवेलमध्ये सोडून द्या. उन्हाळ्याच्या आधीच ते बोअर आटून जात असेल तर असे केल्यामुळे पुढील पावसाळ्याचे पाणी बोअरला येईस्तोवर बोअर चांगल्याप्रकारे पाणी पुरवित राहील.
पाणी वापराबाबत समाज जागरूक का नाही?
l यामध्ये शहरातल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यांची मानसिकता अशी आहे की आम्ही वेळच्या वेळी बिलं भरतो. तुम्हाला काय करायचंय. त्याऐवजी याचा समाजाशी काय संबंध आहे. मी काय करतो आणि समाज माझ्यासाठी काय करतो, याचा विचार करायला हवा पण फारसा यावर कोणीही विचार करत नाही.
l ग्रामीण भागातील लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्याकडे पाणी मिळण्याची साधनंच फार कमी उपलब्ध आहेत. आजही पाणी आणायला पाच-दहा मैल चालत जावं लागतं. ते निमूटपणे सगळं सहन करतात. अशा जगण्याची समाजाला सवय लागली आहे.
पाणीवापराचा आढावा घ्या …
घरगुती वापरासाठी दररोज किती पाणी वापरले गेले. ते कशाकशासाठी वापरले गेले. उदा. भांडी धुणे, कपडे धुणे, अंघोळ करणे, स्वयंपाक करणे इत्यादी त्याची प्रत्यक्षात आवश्यकता किती होती. याची यादी करून त्याचा आढावा घेता येईल. प्रत्येक घरातून अशा प्रकारे आढावा घेतला आणि होणाऱया चुका टाळल्या तर पाण्याचा अपव्यव टाळता येऊ शकतो.