दीर्घायु भव – पाणी अमृत की…?

>> वैद्य सत्यव्रत नानल

आयुर्वेद प्रत्येक गोष्टीबद्दल निःष्पक्षपणे विचार करतो. आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवणे सर्वात जास्त महत्त्वाचे सांगितले आहे. कारण रोगच नाही झाले तर आयुष्यभर आनंदी जीवन जगता येते. स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि रोग होऊ न देण्यासाठी पाणी पिण्याचे नियम काय ते आज आपण पाहूयात.

पाणी म्हणजे जीवन, अमृत. पण हेच पाणी कुणी, का, कसे, कधी? आणि किती प्यावे याबद्दलचे नियम समजून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.

पाणी कुणी प्यावे/कुणी पिऊ नये?

 पाणी सर्वांनी प्यावे. आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ हे लोकांना फक्त ऐकून माहीत आहेत. आता या पाण्याचे आणि वात, पित्त, कफापैकी कुणाचे कसे संबंध आहेत याबद्दल माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल. कोणत्याही जलप्रधान पदार्थाने सर्वात लवकर आणि सहजपणे जो पदार्थ शरीरात तयार होतो तो म्हणजे कफ असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय, तर पाण्यापासून पटकन कफच बनतो. म्हणजे पहिला नियम असा की, ज्यांना कफाचे आजार वारंवार होतात किंवा असतात त्यांनी भरमसाट पाणी पिऊ नये.

 • कफप्रकृती व्यक्तींनी किंवा कफाचे रोग होणाऱया व्यक्तींनी पाणी कमी प्यावे.
 • वातप्रकृती व्यक्तींनी किंवा वाताचे रोग होणाऱया व्यक्तींनी पाणी मध्यम प्रमाणात प्यावे.
 • पित्तप्रकृती व्यक्तींनी किंवा पित्ताचे रोग होणाऱया व्यक्तींनी इतरांपेक्षा थोडे जास्त प्रमाणात प्यावे, असा सामान्य नियम होऊ शकतो.

पाणी का प्यावे/का पिऊ नये?

 •   प्रत्येकाने आपापली गरज किती ते पाहून पाणी प्यावे. गरज कशी ओळखावी तर,
 •  तहान लागली की पाणी प्यावे.
 • लघवीला पिवळसर होत असेल तर पाणी प्यावे. शरीर त्याला आवश्यक गोष्ट हवी असेल तर त्याची मागणी करण्यासाठी इच्छा प्रकट करते. त्यामुळे गरजेपोटी इच्छा उत्पन्न झाली असेल तेव्हाच पाणी प्यावे. (खोटी भूक लागते तशीच अनेक रोगांमधे खोटी तहानही लागते, जसे मधुमेह, वर्षानुवर्षे सर्दीची सवय असणे इत्यादी. त्यामुळे गरज योग्य आहे की नाही ते आधी ठरवावे आणि मगच पाणी प्यावे.)
 • आधी सांगितल्याप्रमाणे, पाण्यापासून कफ पटकन बनतो. जास्त पाणी प्यायले तर कफाचे रोग होतात. तसेच अधिक कफ बनल्याने शरीरात रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो आणि अनेक रोगनिर्मितींना चालना मिळते. रक्ताभिसरण नीट झाले नाही तर अन्नाचे पोषण जे रक्ताद्वारे सर्व अवयवांपर्यंत पोहोचणे अवघड होते. अवयवांचे पोषण कमी झाले तर त्यांची कार्यशक्ती मंदावते.

पाणी कधी प्यावे? कधी पिऊ नये?

आयुर्वेदाप्रमाणे औषध देण्याच्या सुद्धा एकूण 13 वेळा आहेत. म्हणजे एकच पदार्थ वेगवेगळ्या वेळेस घेतला तर तोच पदार्थ शरीरावर वेगवेगळे परिणाम करतो. पाणी वेगवेगळ्या वेळी पिऊन वेगवेगळे चांगले-वाईट परिणाम होतात. त्यामुळे स्वस्थ व्यक्तींनी पाणी पिण्याचे सामान्य नियम सांभाळावेत.

सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी, दोन्ही जेवणानंतर दोन तास, रात्री झोपण्यापूर्वी, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर भरपूर पाणी पिऊ नये. याच वेळात पाणीदार ताजी फळे खाऊ नयेत. याने डोकेदुखीची सवय निर्माण होते.  अशा अनेक नियमांचे ज्ञान फक्त आयुर्वेदातच सांगितलेले आहे. आयुर्वेदाची अशी अनेक बलस्थाने आहेत.

गेली काही वर्षं ‘भरपूर पाणी प्या’, अशी री ओढली जाते. लिटर लिटर पाणी रिचवणारे अनेक महाभाग या जगात आहेत आणि इतरांना ते कसे योग्य आहे हे कायम पटवून देण्याचे काम या व्यक्ती इमानेइतबारे करतही असतात.  पाणी प्यायल्यावर ते पचवावे लागते आणि न पचलेले शरीराबाहेर टाकावे लागते. पचवावे लागते म्हणजे त्यापासून काहीतरी बनणार, सर्वात सहज बनतो कफ हे आपण आधीच पाहिले. प्यायलेले पाणी नाही पचले आणि शरीरात साठले तर? त्याने अंगावर सूज येते. बरे न पचलेले पाणी बाहेर पडले तर उत्तम. पण हे सतत करत राहिल्याने किडण्या लवकर थकू शकतात.  जगभरात गेल्या तिनेक दशकात युरीनरी स्टोन होण्याचे प्रमाण वाढल्यावर भरपूर पाणी प्या, असा सल्ला तज्ञांकडून देणे सुरू झाले. पण त्याचसोबत डोकेदुखी, मायग्रेनचे रुग्णही वाढू लागले. दिवसभर जमत नाही म्हणून सकाळी उठून आणि रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घेतल्याने डोकेदुखी निर्माण होऊ लागली का, याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यांना डोकेदुखी आहे त्यांनी या वेळेत पाण्याचे नियम सांभाळावे. उपाय सोपा आहे. या वेळी पाणी पिणे बंद करा आणि फायदा होतो की नाही ते बघा. लगेच समजेल. नियम सांभाळून प्यायलेले पाणी हे अमृत ठरते, अन्यथा विष.

आयुर्वेद हे एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचे स्वतःचे नियम आहेत. रोगी व्यक्तींनी आपापल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच वागावे हे उत्तम.

पाणी कसे प्यावे?  कसे पिऊ नये?

 • घोटघोट पाणी प्यावे. एका वेळी गटागटा भरपूर पाणी पिऊ नये.
 • तीन-चार घोट प्यायल्यावर तहान भागते. त्यामुळे ग्लास किंवा लोटाभर पाणी एकाच वेळी पिऊ नये. थोडय़ा थोडय़ा वेळाने पुन्हा पुनः तहान लागल्यास, थोडे थोडे पाणी सावकाश प्यावे.
 • पाऊस आणि थंडीमध्ये गरम किंवा कोमट पाणी प्यावे. उन्हाळ्यात साधे किंवा माठातील थंड पाणी प्यावे.
 • फ्रीजमधील थंड पाणी तसेच काढून पिऊ नये. त्यात थोडे साधे पाणी मिसळून मग प्यावे.
 • पावसात खराब पाणी पिऊन अनेक रोग होऊ शकतात. त्यामुळे पाणी उकळून-गाळून प्यावे. कोमट पाण्यात सुंठ घालून प्यावे.

आपण अन्न बसून खातो त्याचप्रमाणे पाणीही शांतपणे बसून लक्ष देऊन प्यावे. (आपण जे काही करतो ते करताना लक्ष देऊन ते काम करावे तरच ते उत्तम होते. लक्ष न देता पाणी पिताना थोडासा ठसका जरी लागला तरी जीव घाबराघुबरा होण्यापासून ते पाणी फुप्फुसात जाऊन न्युमोनिया होण्यापर्यंतचे जीवघेणे अपघात होणे शक्य असते.)