
>> तरंग वैद्य
‘ब्रीद’ या नावाने 2018 मध्ये आलेली वेब सीरिज लोकांना खूप आवडली. माधवन या गुणी अभिनेत्यावर या मालिकेची भिस्त होती. एखाद्या ’सेंटर फॉरवर्ड’ खेळाडूप्रमाणे त्याने न डगमगता ही कथा पुढे नेली आहे आणि विजयी गोल केला. आठ भागांची ही मालिका आपल्याला अवयवदानाचा संदेश देऊन जाते. नातेसंबंधांचा ओलावा जाणवून देते.
‘ब्रीद’ या नावाने 2018 मध्ये एक वेब सीरिज आली आणि लोकांना खूप आवडली. माधवन या गुणी अभिनेत्याच्या खांद्यावर ही मालिका आहे. एखाद्या ’सेंटर फॉरवर्ड’ खेळाडूप्रमाणे त्याने न डगमगता ही कथा पुढे नेली आहे आणि विजयी गोल केला आहे. खरं तर या मालिकेची कथा पूर्ण झाली आहे (त्या काळात सीजन 2, 3 अशी संकल्पना अस्तित्वात आली नव्हती), पण या वेब सीरिजची लोकप्रियता लक्षात घेऊन हेच नाव जपत निर्मात्यांनी ‘ब्रीद – इन टू द शॅडो’ या नावाने 2020 आणि 2022 मध्ये आणखीन दोन सीजन प्रसारित केले. आधी आपण ‘ब्रीद’च्या विषयी बोलूया…
गोष्ट किंवा कथा ही कुठल्याही सिनेमा, मालिकेचा मुख्य स्तंभ. तो जर मजबूत असला तर डोलारा व्यवस्थित सांभाळला जातो. त्यामुळे कथेवर सर्वात जास्त मेहनत घेणे आवश्यक असतं. प्रेक्षक कथेशी एकरूप झाला की रिमोटचे अस्तित्व धोक्यात येतं . ब्रीदचे कथानक एवढं मजबूत आहे की, आपण एकामागून एक भाग बघत जातो अगदी शेवटपर्यंत, जसे फ़ुटबॉलची नव्वद मिनिटे उत्कंठावर्धक असतात तशीच ही मालिकाही आहे.
तर ब्रीदचा मुख्य पात्र डॅनी म्हणजेच आर. माधवन फुटबॉल कोच आहे. बायकोचा काही वर्षांपूर्वी असमयी मृत्यू झाला आहे. त्यामुळे
डॅनी आपल्या मुलाचा जोशचा आई-वडील या दोन्ही नात्याने संगोपन करीत आहे. जोशला फुप्फुसाचा दुर्धर आजार आहे. ज्यामुळे त्याला शाळेतही जाता येत नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार जोशचे आयुष्य आणखीन पाच-सहा महिनेच शिल्लक आहे. त्याचा मृत्यू टाळता येईल जर का त्याच्या फुप्फुसांचे प्रत्यारोपण झाले तर.
डॅनी आपल्या मुलासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतो, पण म्हणतात ना, सर्व ठिकाणी पैसा कामी येतोच असे नाही. जोशच्या आधी आणखीन काही रुग्ण असतात म्हणजेच या रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण झाल्यावरच जोशचा नंबर येणार आणि हा ाढमांक लवकर येण्यासाठी अवयवदाताचा मृत्यूही आवश्यक आहे. डॅनीला अंदाज येतो की, हे सगळं सहा महिन्यांच्या आत होणार नाही आणि मग तो एक वेगळाच मार्ग निवडतो. वेळेची वाट बघत राहण्यापेक्षा आपणच वेळ आणायची असा निर्धार घेऊन तो काळाशी लढा देण्यास सज्ज होतो. डॅनी रुग्णालयातून अवयवदात्यांची म्हणजेच डोनर्सची लिस्ट चोरतो आणि एक एक करीत त्यांचा मृत्यू घडवून आणतो. प्रत्येक मृत्यू नैसर्गिक वाटला पाहिजे यासाठी तो डोकं लावून नवनवीन युक्त्यांचा वापर करतो.
अपराध झाला की तपासही होणारच. सुरुवातीचे मृत्यू नैसर्गिक भासले तरी पोलिसांच्या मनात काहीतरी गडबड आहे हा संशय येतो आणि मग अपराध आणि तपासाचा रोमांच सुरू होतो, अपराधी आणि पोलीस असा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो आणि आपण यात गुंतत जातो. खून करणे आपल्याला पटत नसले तरी डॅनीची हतबलता, त्याचे मुलासोबतचे भावनिक संबंध बघून आपणही भावुक होऊन जातो. तो चुकीचे करीत आहे हे जाणूनही तो वाचावा जेणेकरून त्याचा मुलगा वाचेल अशी मनोमनी प्रार्थना करतो. इथे तपास अधिकाऱयाची कथाही बरोबरीने चालत असते. ज्यामुळे मुख्य कथा एकसुरी वाटत नाही.
प्रेक्षक गुंतले तर मालिका जिंकली असे साधे गणित आहे, पण ते सोप्प काम नाही. म्हणूनच एखादी मालिका किंवा फिल्म तयार करताना लेखन, दिग्दर्शन, कलाकारांची निवड, संकलन, पार्श्वसंगीत सर्व सर्व बाबींवर मेहनत घेतली जाते. डॅनीचे प्रत्येक अवयवदात्याला मारण्याआधी त्याच्याबद्दल सर्व माहिती काढणे, त्याचा पाठपुरावा करणे, मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून प्रयत्न करणे कथेला रंजक बनवतात. ही कथा जरी ‘मर्डर मिस्टरी’ श्रेणीतली असली तरी भावनाप्रधान आहे. वडील-मुलाच्या नात्यातील ओलावा दाखवणारी दृश्यं आहेत. डॅनीचा हेतू खूप प्रामाणिक असल्यामुळे आपण नकळतच त्याला साथ देतो.
माधवनचा डॅनी मनाला भिडतो. मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याची धडपड अगदी खरी वाटते. आधी तो हुशारीने आपले काम करीत असतो, पण पोलिसांना संशय आलाय हे कळल्यावर स्वतला वाचवण्यासाठी त्याच्या प्रयत्नांत आपण पण त्याची साथ देतो. कारण तो वाचला तरच जोश वाचेल हे समीकरण प्रेक्षकांना कळलेलं असतं. इन्स्पेक्टर झालेला अमित साद हा एक गुणी अभिनेता आहे. वेब सीरिजचा स्टार… ‘अवरोध’, ‘जीत की ज़िद’सारख्या वेब सीरिज त्याच्या अभिनयाच्या जोरावर चालत आहेत. प्रामाणिक आणि समर्पित पोलीस अधिकारी आणि मुलीच्या मृत्यूचे ‘गिल्ट’ घेऊन जगणारा पिता असे दोन वेगवेगळे मूड त्याने आपल्या अभिनय समृद्धीने उत्तमरीत्या सांभाळले आहेत. जोश झालेला अथर्व विश्वकर्मा खूपच निरागस दिसतो. त्याची लाचारी, समंजसपणा, शाळेत न जाऊ शकल्याची खंत त्याने आपल्या अभिनयातून सहजपणे दाखवली आहे. नीना कुलकर्णी आजीच्या भूमिकेत आहेत. वरून आनंदी पण आतून करुण हे त्यांचे भाव अप्रतिम. या आजीचे डोळे पाणावतात तेव्हा आपल्या डोळय़ाच्या कडाही ओल्या होतात.
अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आठ भागांची ही मालिका आपल्याला अवयवदानाचा संदेश देऊन जाते. नाते संबंधांचा ओलावा जाणवून देते आणि मुख्य म्हणजे प्रत्येक भागात आता पुढे काय ही उत्कंठा वाढवणारे मनोरंजन देते. आठ भाग आणि प्रत्येक भाग अंदाजे चाळीस मिनिटे. चुकवू नका, अवश्य पाहा.
z [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)





























































