
>> नम्रता पवार,[email protected]
स्व सुरक्षा शिकवावी लागते का… आजची स्त्री कणखर आहे, खंबीर आहे. मग हिंगणघाट, हैदराबादसारख्या घटनांना आपण स्त्रिया मात का देऊ शकत नाही. काही गोष्टी सक्तीने अमलात आणूया…
रिंकू पाटील जळीत हत्याकांड हे 90 च्या दशकातील संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणारं पहिलं हत्याकांड. तेव्हा मीदेखील साधारण त्याच वयाच्या आसपास असेन. त्यानंतर राज्यात अनेक घटना घडल्या अनेक रिंकू पाटील. विद्या प्रभुदेसाई, अमृता देशपांडे जाळल्या गेल्या आणि… आज माझी मुलगी दहावीच्या उंबरठय़ावर आहे… हिंगणघाटसारखं एकतर्फी प्रेमातून जळीत हत्याकांड घडलंय… यादरम्यान काहीच बदल झालेला नाहीये… पुरुष मानसिकता अजूनही तशीच आहे… कुठवर सुरू राहणार आहे हे सर्व… अन्याय… अत्याचार… विकृती नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यांचं सावज मात्र फक्त आणि फक्त एकच स्त्री हिच आहे. हा अत्याचार जेव्हा एखाद्या स्त्रीवर होतो तेव्हा तो समाजातील प्रत्येक स्त्रीच्या शरीर आणि मनाचे लचके तोडणारा असतो आणि खोलवर जखम देणारा असतो. या सर्वांचा गुन्हा एकच ते म्हणजे त्यांचं स्त्रीत्व. कधी शाळकरी मुलगी तर कधी मित्रासोबत सिनेमा पाहून उशिराने घरी परतणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तर कधी कार्यालयातून उशिराने परतणारी वा कामानिमित्ताने निर्जन ठिकाणी गेलेली पत्रकार, कधी एखादी पोलीस अधिकारी, तर कधी एखाद्या गरीबाची कोवळी पोर, कधी उशिराने दवाखाना बंद करून परतणारी डॉक्टर प्रियांका, तर कधी एकतर्फी प्रेमातून जाळली गेलेली प्राध्यापिका अंकिता ही अशी असंख्य नावं असतील ज्यांचे हुंदके, अश्रू आतल्या आत घुसमटले असतील. मात्र नराधमांनी केलेल्या अन्यायाने जगापुढे ही नावं येतात तेव्हा आपल्या घराच्या उंबरठय़ापर्यंत आलेलं हे संकट आपल्या घरातदेखील येईल की काय अशी दहशत प्रत्येक पालकांच्या मनात बसू लागलीय. आज हिंगणघाटची तरुणी जाळलीय, उद्या कदाचित तुमचा-आमचा नंबरही असू शकतो. आज असे अनेक माथेफिरू आपल्या अवतीभवती दबा धरून बसले आहेत.
आता फक्त लढायचं
- मुलींना शालेय जीवनापासून स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत. संकटात दरवेळी कोणीतरी मदतीसाठी येईल यापेक्षा स्त्रीयांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करायला हवे.
- शारीरिक शिक्षणाचा तास मुलींना बंधनकारक करावा. एनएसएस, एनसीसीसारख्या उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो व बाह्य जगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळतो.
- मुलींना पहिल्यापासून समाजात कसं वागावं यापेक्षा परिस्थितीला कसं समोरं जायचं हे शिकवायला हवं.
- अनेकदा एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा तिच्या जिवलगांनी सर्वप्रथम तिच्या पाठीशी उभं राहून तिला तक्रार करायला प्रवृत्त करावं. कारण हा अधिकार तिला व्यवस्थेने दिलाय.
- आत्मरक्षा म्हणजे केवळ लढणं नाही तर आत्मविश्वास बाळगणे.
- अनेकदा गावखेडय़ात मुली तक्रार करायला वा घरी सांगायला घाबरतात. कारण घरी सांगितलं तर शिक्षण बंद होईल आणि घरी कायमचं बसावं लागेल. यामुळे गावगुंडांचं अधिक फावतं आणि मुली त्रास सहन करत राहतात. शारीरिक हिंसेबरोबरच मानसिक लैंगिक अत्याचारदेखील तेवढाच हिंस्र आहे. तेव्हा मुलींनो याविरोधात तक्रार करायला पुढे या.
- हेल्पलाइन, पोलीस या सर्वांची मदत घ्या.
- जे चुकीचं वाटतंय त्यावर बोलायला शिका.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाही बोलायला शिका. तुमचा नकार म्हणजे त्याला जर होकार वाटतं असेल तर तुमच्या देहबोलीतून त्याला त्याची जाणीव करून द्या. तुम्ही जेवढय़ा स्ट्राँग रहाल तेवढं तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
- प्रत्येक वेळी शासन, सरकार, कायदा-व्यवस्था यांना दोषी नका ठरवू. कधी खानदान की इज्जत तर कधी लोकलज्जेपायी मुलीचा आवाज घरातच दाबला जातो.
- अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या महिलांना ट्रोल केल जातं तेव्हा एक स्त्री म्हणून आपण सर्वप्रथम तिच्या पाठीशी उभं राहायला हवं.
- समाजव्यवस्थेला दोष देण्यापेक्षा माझ्या घरातील मुलगा कसा वाढवायला हवा हे प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे.
- आपल्या मुलाला समजावा की, कोणत्याही मुलीला छेडण्याचा हक्क तुला नाहीये. त्याला अत्याचार असं म्हणतात हे सांगा.
- निकोप समाज ही केवळ स्त्रीची जबाबदारी नाहीये तर ती पुरुषाचीदेखील आहे.
आजपर्यंत आपण स्त्रीयांनी स्वतःवरील अन्याय स्वतःच निपटून काढला आहे. प्रत्येक प्रतिकूलतेवर मात देत स्वतःचा मार्ग स्वतः शोधला आहे. त्यामुळे आता एकच म्हणावंसं वाटतं सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे…
























































