
गेल्या एका वर्षात कोविडच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून आले. हे बदल आत्मसात करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. त्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना कोविडचे संक्रमण टाळण्यासाठी लोकांना घरातूनच जितकी कामे करता येतील तितकी होऊन लागली आणि नवीन नवीन पर्याय निघू लागले. उदा. वेबिनारस्, झूम, मिटिंग्ज इत्यादी.
तसं पाहिलं तर पाश्चात्य देशात फार आधीपासून ही संकल्पना अस्तित्वात होती आणि हिंदुस्थानमध्येही आयटी कंपन्यामध्ये गेले काही वर्षांपासून ही सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध होती.
मग याला बरीच कारणे होती जसे घर सांभाळणे आणि नोकरी करणे हे जर एकच व्यक्ती करत असेल तर त्यांच्यासाठी ते सोयीचे ठरते किंवा घरात जर लहान बाळ असेल तर त्याचे बाबा घरूनच काम करत आईला आणि बाळाला सांभाळण्यात पूर्ण सहभाग देऊ शकतात.
त्यामध्ये कंपन्यांची सोय म्हणजे वाचलेला खर्च, कर्मचारी जर ऑफिसला येत नाही. त्यामुळे रोजचा ऑफिस व्यवस्थापनाचा खर्च वाचतो. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च वाचतो. वीज, भाडे इ. खर्च वाचतात आणि अशा सुविधामध्ये जर कर्मचारी वेळेत काम (त्यांच्या सोयीनुसार) पूर्ण करत असेल तर दोन्हीकडे हे फायद्याचं ठरतं.
अगोदर हे काही प्रमाणातच दिसून यायचं. तेदेखील आयटी कंपन्यांमध्ये, पण कोविडनंतर जवळ जवळ 80 टक्के कामे घरबसल्या होऊ लागली. मोठमोठय़ा कंपन्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्व कामे घरातूनच होत होती.
मग याचे फायदेच आहेत का? काही तोटेपण आहेत? ऑफिसचा वाचलेला खर्च, कर्मचाऱ्यांना मिळालेली वेळेची मुभा, अर्थातच उपलब्ध संसाधनांचा इष्टमत उपयोग हा सर्वात महत्त्वाचा पैलू!
परंतु आपण याची दुसरी बाजू पाहिली तर लक्षात येते. कर्मचारी नेहमीपेक्षा जास्त तणावाखाली आले. घरातूनच सगळी कामे होत असल्यामुळे वेळेची बंधने राहिली नाहीत आणि कर्मचाऱ्यांवर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा दुष्परिणाम दिसून आला.
माझ्या ओळखीच्या बऱ्याच मध्यमस्तरीय व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असा अभिप्राय आला की आम्ही ऑफिसला जाणे जास्त पसंत करू, कारण सुरुवातीला हे सर्व फार सुविधेचे वाटले; पण हळूहळू कामाचा तणाव वाढत गेला आणि कौटुंबिक सुख आणि मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागले. ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये वेळेच्या मर्यादा नाही पाळल्या तर हे फार तणावग्रस्त होऊन जाते.
अर्थात ज्या व्यक्ती हे उत्तमरीत्या हाताळू शकतात त्यांच्यासाठी हे फार सोयीचं ठरते म्हणजेच ‘वर्क फ्रॉम बॅलन्स’ सांभाळता येत असेल तरच ही संकल्पना कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची आहे.
या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर बरेच काही बोलले आणि लिहिले गेले ते म्हणजे ‘घरात बसून काम करते?’ या प्रश्नाचे उत्तर सर्व कर्मचारी पुरुष व महिलांना मिळाले. आपल्या कुटुंबासाठी चोवीस तास विनातक्रार उपलब्ध असणं आणि सर्व जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडणं या गृहिणीच्या सर्वात महत्त्वाच्या गुणांची दखल घेतली गेली आणि प्रशंसाही झाली.
कुठल्याही कामाला काही काळवेळ नसणं किंवा वेळेची बंधनं नसणं हे किती गैरसोयीचं आणि तणावग्रस्त आहे हे लक्षात आले. मग ते ऑफिसचे काम असो वा गृहिणीचे काम असो.
पर्णिता शेडगे–तांदुळवाडकर ([email protected])
(लेखिका सॉफ्ट सिल्क ट्रेनर आहेत)





























































