
>> आसावरी जोशी
सध्या विश्वचषकाचे सुखद वारे इंग्लंडहून संपूर्ण हिंदुस्थानात वाहत आहेत. क्रिकेटचा खऱया अर्थाने महोत्सव भरला आहे. आपल्या संघाचा खेळ डोळय़ाचे पारणे फेडणारा आहे. आजच्या क्रिकेटइतकेच ग्लॅमरस झालेले क्रिकेट समालोचन अर्थात कॉमेण्ट्री… पाहू या कॉमेण्ट्री बॉक्समधील धम्माल… मस्ती.
क्रिकेट… हिंदुस्थानी, मराठी मातीत नखशिखान्त रंगलेला इंग्रजांचा खेळ… क्रिकेट आणि इंग्रजी भाषा या दोन गोष्टी ओलांडून आपण मराठी माणसं पुढे जाऊच शकत नाही. इंग्रजी ही बऱयाचदा सक्तीची होत असली तरी क्रिकेट न आवडणारा हिंदुस्थानी, मराठी माणूस विरळाच. क्रिकेट या खेळाने आपल्यातील अनेक छोटय़ा छोटय़ा पण खूप महत्त्वाच्या गोष्टी समोर आणल्या. आपल्यातील एकी…क्रिकेटचा थरार अनुभवायला प्रत्यक्ष स्टेडियमवर जाण्याची अजिबातच जरूर नाही. टीव्ही असणाऱया एखाद्या दुकानासमोर किंवा इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर अजूनही सामना पाहण्यासाठी गर्दी होते. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी रस्त्यांवर अजूनही तुलनेने गर्दी कमीच असते. आताच्या आधुनिक युगानुसार हायफाय ऍण्ड्रॉइड मोबाईलपुढे क्रिकेटप्रेमींची गर्दी जमलेली असते किंवा स्वतःच्या मोबाईलवर सामन्याची मजा खाजगीरित्या सहज अनुभवू शकतो. तर पूर्वी एक छोटासा ट्रान्झिस्टर जगाच्या पाठीवर कुठेही सुरू असलेला क्रिकेटचा सामना तंतोतंत डोळ्यासमोर उभा करायचा. रस्त्याने ट्रान्झिस्टर कानाला लावून चालणारे अनेक क्रिकेटप्रेमी नजरेस पडायचे. जेव्हा घराघरांतून टीव्ही सर्रास नव्हता तेव्हाही घरातील एकला एकमेव रेडिओ संपूर्ण क्रिकेट सामना श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा करायचा. ही किमया साध्य व्हायची कॉमेंट्रेटर अर्थात समालोचकांच्या ओघवत्या वाणीतून.
समालोचक. संपूर्ण क्रिकेट सामना आपल्या धावत्या निवेदनातून श्रोत्यांसमोर उभा करणारा शब्दांचा किमयागार. विजय मर्चंट, सुरेश सरैया, रवी चतुर्वेदी यासारख्या अनेक इंग्रजी-हिंदी समालोचकांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि शैलीदार वर्णनाने क्रिकेटप्रेमींवर मोहिनी घातली, पण परदेशात सुरू असलेले क्रिकेटचे सामने अक्षरशः घरोघरी पोहोचविण्याचे श्रेय जाते आकाशवाणीवरील मराठी समालोचकांना. प्रा. दि. ब. देवधर, बाळ पंडीत, वि. वि. करमरकर यांच्या समालोचनाने आकाशवाणीवर क्रिकेटचा सामना सजीव होत असे. अजूनही मला आकाशवाणीवरील रनिंग कॉमेंट्रीचा बाज आणि स्वर चांगलाच लक्षात आहे. ही झाली रेडिओची बात. टीव्हीवर क्रिकेटचा सामना सुरू असताना डोळ्यांना दिसत असतानाही पाठीमागे सुरू असणारी कॉमेंट्री खेळावर अर्थपूर्ण भाष्य करणारी असायची, पण बऱयाचदा ती निरस आणि कंटाळवाणी वाटायची. समजण्यास अवघड जायची, पण तरीही ही कॉमेंट्री नेहमीच क्रिकेटचा एक अविभाज्य भाग राहिली आहे.
आज काळ बदललाय. क्रिकेटलाही काळानुरूप ग्लॅमरस रूप नव्याने प्राप्त नव्याने झाले आहे. मग क्रिकेटची कॉमेंट्री तरी मागे कशी राहील ? आजच्या क्रिकेट कॉमेंट्रीनेही ग्लॅमरस आधुनिकता परिधान केली आहे. सध्या विश्वचषकाचे वारे इंग्लंडहून संपूर्ण देशभर वाहत आहेत. विविध नॉस्टॅल्जिक साधनं आधुनिक होऊन विश्वचषकातील मौजमज्जा आपल्यामध्ये आणत आहेत. यात आपले क्रिकेट समालोचकही अत्यंत आधुनिक आणि गमतीशीर झाले आहेत. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली मधूनच डोकावणारा रणवीर सिंह यांच्या ग्लॅमरस उपस्थितीने इंग्लंडच्या स्टेडियममधील समालोचन कक्ष अर्थात कॉमेंट्री बॉक्स गजबजून जात आहेत. गमतीजमतींना, क्रिकेटच्या धम्माल किश्श्यांना, हास्यविनोदांना तेथे अक्षरशः उधाण आले आहे. पूर्वी क्रिकेटची कॉमेंट्री ही केवळ सुरू असलेल्या सामन्याची माहिती व्हायची किंवा त्यावर थोडेफार भाष्य करायची, पण आता हा सारा गंभीर मामला मौजमजेत बदलला आहे. अर्थात क्रिकेटचा आब राखून…त्याचे गांभीर्य समजून…
खरे पाहता मी क्रिकेट खेळत जरी नसले तरी आत्यंतिक क्रीडाप्रेमी. हे क्रिकेटचे सामने पाहत, ऐकत लहानाची मोठी झाले. तेव्हाची कॉमेंट्री बऱयाचदा डोक्यावरून जायची. समालोचकांचे भाष्य फारच गंभीर आणि निरस वाटायचे. या पार्श्वभूमीवर आजचे ग्लॅमरस समालोचन खरेच मनास सुखावणारे… क्रिकेटचे गांभीर्य जपत खेळ सोपा, सुलभ करणारे.
सुनील गावस्कर… हिंदुस्थानी क्रिकेटचा लिटल मास्टर. अत्यंत अधिकारवाणीने केले जाणारे क्रिकेट या खेळावरील भाष्य…प्रसंगी क्रिकेटपटूंना परखड शब्दांत सुनावले जाणारे खडे बोल यातून त्यांचे जाज्वल्य क्रिकेट प्रेम वेळोवेळी दिसून येते. या त्यांच्या क्रिकेटप्रेमाचा आणि सडेतोड स्वभावाचा प्रत्यय सध्या आपण विश्वचषकाच्या निमित्ताने घेत आहोत. सुरू असलेल्या खेळावर अत्यंत उमदे भाष्य, सकारात्मक टिप्पणी खेळाडूंचे आणि आपलेही मनोबल उंचावणारीच असते. इंग्रजी, हिंदी दोन्ही भाषांवर सहज प्रभुत्व असणारे गावसकर जेव्हा अधूनमधून मराठी शब्दांची, मराठी वाक्यांची छानशी साखरपेरणी करतात तेव्हा तेथे पाहत असेलेले मराठी मन सुखावून तर जातेच, पण भाषेच्या त्या गमतीदार सरमिसळीची मजाही वाटते. आता परवाच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गावसकरांच्या हमारे मराठी में इसे ‘खडे खडे खेलकर वापस जाना ऐसे कहते है’ या टिप्पणीने रसिकांमध्ये कौतुकाची खसखस पिकली. श्रोत्यांना क्रिकेटविषयी माहिती, खेळाडूंवर मार्मिक भाष्य आणि या साऱयांवर नर्म विनोदाची पखरण हे सुनील गावसकरांच्या समालोचनाचे वैशिष्टय़. मध्यंतरी टी-ट्वेंटी मालिकेत कॉमेंट्री बॉक्समध्ये गावसकरांनी केलेला नागीन डान्स कोण विसरेल?
सचिन तेंडुलकर… समस्त क्रिकेटप्रेमींचे श्रद्धास्थान. क्रिकेटरसिकांचे सचिनप्रेम आजही तसूभरही कमी झालेले नाही. एरव्ही खूप भिडस्त आणि मितभाषी वाटणारा सचिन सध्या कॉमेंट्री बॉक्समधून विश्वचषकाचा आस्वाद अगदी मनमुराद घेतो आहे. आपल्या कारकीर्दीतील किस्से…मधून मधून ‘वाट लावली’ अशा उत्स्फूर्त मराठी शब्दांची पखरण यामुळे सचिनचे समालोचन खूपच प्रवाही आणि उत्स्फूर्त वाटते. नुकताच त्याने सांगितलेला किस्सा-2003 च्या विश्वचषकाच्या सामन्यात सचिनचे पोट बिघडले आणि संपूर्ण सामना तो अंडरवेअरमध्ये नॅपकीन लावून खेळला, पण तरीही त्याने 97 धावांची खेळी केली होती. या विश्वचषकापासून सचिनची समालोचक म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे आणि तीही मस्त गाजतेय.
वीरेंद्र सेहवाग – अत्यंत मस्तमौला, गमतीशीर प्राणी. विविध ट्विट करत तो सद्य परिस्थितीवर खास स्वतःचे भाष्य करीतच असतो. आता या विश्वचषकातही तो कॉमेंट्री बॉक्स गाजवतो आहे. सौरभ गांगुली, सचिनचे किस्से हे त्यांच्याकडचे भांडार आहे. सचिनचे किस्से सांगणं हे त्याच्या विशेष आवडीचे काम. हल्लीच सेहवागने सांगितलेला सचिनचा किस्सा-1999 मध्ये सचिन कर्णधार असताना सामना सुरू होता. हिंदुस्थान क्षेत्ररक्षण करीत होता. हरभजन सिंग सीमारेषेजवळ उभा होत, काही उत्साही प्रेक्षकांना सह्या देत होता. तेव्हा सचिनने त्याची कानउघाडणी करीत असे केल्यास संघातून बाहेर पडावे लागेल असे स्पष्ट शब्दांत सुनावले होते.






























































