
>> दिलीप देशपांडे
कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. कारण ग्राहक शक्ती, न्याय शक्ति आणि दंड शक्ती यांची गोळाबेरीज म्हणजे शोषण मुक्ती. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी. ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून, आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणे अपेक्षित आहे, जेणेकरून तो फसवणुकीतून वाचू शकेल. ग्राहकांनी सुजाण ग्राहक व्हायला हवे.
सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे, तसा जाहिरातीचाही आहे. जो तो आपला उत्पादित माल बाजारपेठेत कसा जास्त विक्री होईल या प्रयत्नात असतो. कस्टमर ईज किंग (ग्राहक राजा आहे.) किंवा कस्टमर ईज गॉड (ग्राहक देव आहे) अशी विशेषण ग्राहकाला लावली जातात आणि दुसरीकडे अनेक प्रलोभने दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते. अशा प्रलोभनांना ग्राहक बऱयाचदा बळी पडतो. त्याची फसवणूक केली जाते.
ग्राहक दिन साजरा करण्यामागचा उद्देश बघितला तर ग्राहकाची फसवणूक होऊ नये, सेवा पुरवताना हलगर्जीपणा होऊ नये म्हणून ग्राहकाला ग्राहक कायद्याची माहिती करून द्यावी हाच मूळ उद्देश आहे. आपल्या देशात 24 डिसेंबर 1986 मध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली. तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला व 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास सहा प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत. प्रत्येक ग्राहकास आपले हक्क माहीत असतील तर त्याची फसवणूक होणार नाही.
ग्राहकांचे हक्क
- सुरक्षेचा हक्क – एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे आवश्यक असते. जसे फ्रीज, टी.व्ही., वाँशिंग मशीन, मोटरबाईक, कार, फ्लॅट, कुठल्याही वस्तू.
- माहितीचा हक्क – आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल माहिती विक्रेत्याने ग्रहकांना देणे बंधनकारक आहे. त्यात फसवणूक करू नये.
- निवड करण्याचा हक्क – विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन वा ब्रँडचा आग्रह करू शकत नाही. निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
- म्हणणं मांडण्याचा हक्क – ग्राहकाला आपली फसवणूक झाली वाटत असेल तर आपले म्हणणे, योग्य न्यायासाठी मांडण्याचा हक्क आहे.
- तक्रार करण्याचा, तसेच तिचे निवारण्यासाठीचा हक्क – फसवणूक झाली असेल तर, न्यायासाठी तक्रार निवारण करून घेण्यासाठी ग्राहक मंच, राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क आहे.
- ग्राहकांचे हक्काविषयी शिक्षणाचा अधिकार हक्क – ग्राहकांना हक्क कर्तव्ये माहिती नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते, ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शासनाकडून ‘जागो ग्राहक जागो’सारखे उपक्रमाद्वारे प्रबोधन केले जाते. ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच, पण आपल्या हक्कासोबतच काही कर्तव्ये आहेत याची जाणीवसुद्धा ग्राहकांनी ठेवायला हवी.
कर्तव्ये आणि जबाबदाऱया?
- बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक उत्पादक असतात. त्यात स्पर्धा ही असणारच. फसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये.
- बऱयाचदा धमाका सेल ऑनलाईन खरेदीवर असतात, सणवारालाही डिस्काऊंट सेल असतात, अशा वेळी न खपलेला किंवा काही दोष असलेला माल असू शकतो. सावधपणे खरेदी करावी.
- खरेदी करताना मालाचे बिल आवश्यक आहे. बिलाचा आग्रह धरावा. न दिल्यास विक्रेत्याची तक्रार करावी. कारण माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
- एम.आर.पी. (मॅक्झिमम रिटेल प्राईज) पेक्षा जास्त किंमत देऊ नका. खरेदी करताना ती बघा.
- वस्तूंची मुदत तपासा. (एक्सपायरी डेट) ती संपली असेल तर वस्तू नाकारावी. अशा वस्तूचा वापर हानीकारक ठरू शकतो.
- पेट्रोल भरताना मीटरवर शून्याकडे लक्ष द्या. शुध्दतेविषयी शंका असल्यास पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांचेकडे तक्रार करा.
- सोने खरेदी वेळी हॉलमार्ककडे लक्ष द्या.
- ऑनलाइन खाद्य पदार्थ मागवताना योग्य काळजी घ्या.
ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंच (आयोग) व राज्य पातळीवर राज्य ग्राहक आयोग कार्यरत आहेत. विनाशुल्क आपण तक्रार दाखल करू शकतो. राज्यपातळीवर राज्य ग्राहक संरक्षण परिषद आहे, जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तर केंद्रात राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद आहे व राष्ट्रीय ग्राहक आयोग आहे. तर राज्यातील दुर्गम भागात ग्राहक उपाययोजनांसाठी ग्राहक कल्याण सल्लागार समिती आहे. याव्यतिरिक्त जागो ग्राहक जागो व कंझ्युमर क्लब आहेत.
ग्राहकांच्या वाढत्या फसवणुकीचे प्रकाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने ‘जागो ग्राहक जागो’अभियान सुरू केले आहे. बँका, सार्वजनिक वितरण, वीज, बांधकाम, अन्नौषधे, पर्यटन, पोस्ट अशा विविध प्रकारच्या खात्याच्या तक्रारी या अभियानाच्या हेल्पलाइन (मदत सेवा प्रणाली) वर ग्राहक करू शकतो.
शेवटी एकच म्हणावे लागेल. कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. कारण ग्राहक शक्ती, न्याय शक्ति आणि दंड शक्ती यांची गोळाबेरीज म्हणजे शोषण मुक्ती. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी.
ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून, आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे, जेणेकरून तो फसवणुकीतून वाचू शकेल.





























































