साडेचार अब्ज वर्षांतला विक्रम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

पृथ्वीचं वय सुमारे साडेचार अब्ज वर्षांचं. अनेक अवकाशीय घडामोडी होत होत हा पाणीदार नीलग्रह एकदाचा सूर्याच्या विशिष्ट कक्षेत स्थिरावला. त्याला त्याचा उपग्रह, चंद्राची साथ मिळाली आणि अनेक वैश्विक योगायोगांमधून आज आपण पाहतो, अनुभवतो ती पृथ्वी साकारली. त्यावरचं सजीवांचं अस्तित्व फार उशिरा आलं. त्यातही माणूस नावाचा प्राणी तर पृथ्वीच्या वयाच्या तुलनेत पृथ्वीचं सर्वात छोटं शेंडेफेळच म्हणायला हवं. सूक्ष्म जिवांच्या बाबतीत उक्रांतीचं चक्र अव्याहत सुरूच असतं, पण ‘होमोसेपियन’ या मानवी प्रजातीचं स्थिरावणं, वाढणं आणि बुद्धीचा वापर करत पृथ्वीवर राज्य करणं ही गेल्या काही हजार वर्षांतली गोष्ट. तोपर्यंत या प्रजातींचाही हळूहळू विकास होत होता, परंतु त्या विकासाला गुणाकारी पद्धतीची गती मिळत गेली आणि माणूस पृथ्वीचा ‘स्वामी’ ठरल्यासारखा वागू लागला. एक प्रजाती म्हणून माणसाचं वर्तन बरं की वाईट हे केवळ काळच ठरवेल. कारण पृथ्वीवर मनाप्रमाणे असंख्य बदल घडविणाऱ्या माणसाने म्हटलं तर प्रगती केली आहे आणि कदाचित संभाव्य कृत्रिम उत्पातला आवतण देऊन ठेवलं आहे किंवा दोन्हीही गोष्टी एकाच वेळी घडत आहेत.

अशा या पृथ्वीवर ‘राज्य’ करण्याचा, हा ग्रह अंकित करण्याचा प्रयत्न माणसाने सतत चालविला आहे. त्याच वेळी पृथ्वीवरच्याच मानवी समूहातल्या चिमूटभर संशोधकांनी या ग्रहाचा सखोल अभ्यास, त्याचं अंतराळातलं स्थान याचीही पक्की गणितं मांडली आहेत आणि त्यातूनच काही विस्मयकारी गोष्टी घडल्या. एरवी ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ हा तसा भूतलावरचाच शब्द म्हणजे सर्व समुदांमधून बोटीने प्रवास करून किंवा भूभागावरून चालत अथवा वाहन वापरून ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ करणारे साहसवीर आहेत आणि त्यांचे हे धीरोदात्त प्रयत्न कौतुकास्पदही आहेत.

परंतु पृथ्वीच्या बाहेर ‘उंच’ अंतराळात जाऊन या निळय़ा ग्रहांचं खऱ्या अर्थाने ‘दूर’दर्शन घेण्याचा विक्रम ज्याच्या नावावर प्रथमतः नोंदला गेला तो एकमेव युरी गागारिन पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या वयात, या ग्रहाचं अंतराळातून दर्शन घेऊ शकणारा पहिला भाग्यवान. यापुढे कोणी पर्यटकही मंगळावर वगैरे जातील, पण युरीचं महत्त्व कधीच कमी होणार नाही.

अवघं चौतीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या युरीच्या जीवनात मार्च महिन्याचा योगायोग मोठा. त्याचा जन्म रशियाच्या नॉर्वेलगतच्या क्लुशिनो या खेडय़ात 9 मार्च 1934 रोजी झाला. युरीचं बालपण काही फारसं सुखात गेलं नाही. या चटपटीत, हुशार मुलाला (त्याच्या कुटुंबासह) वयाच्या सातव्याच वर्षी नाझींच्या छळाला सामोरं जावं लागलं. हिटलरच्या जर्मन फौजांनी दुसऱ्या महायुद्धात 18 ऑक्टोबर 1941 रोजी रशियाचं क्लुशिनो गाव जिंकलं. नाझींनी गावातली रशियन शाळा आणि गावकऱयांची घरंही जमीनदोस्त केली आणि त्यांना वयाचा मुलाहिजा न ठेवता वेठबिगार बनवलं. जर्मन सैनिक सांगतील ती कामं आणि वर अमानुष मारहाण. युरीच्या गावाचं छळछावणीत रूपांतर झालं होतं. युरीची दोन मोठी भावंडं व्हलेन्टिन आणि झोया ही तर युद्धसमाप्तीनंतरच ‘सापडली’!

किशोरवयीन युरी आणि त्याचे मित्र जर्मन सैनिकांना त्रास देऊन त्यांच्या रणगाडय़ांच्या बॅटरीत माती भरण्याचे उद्योग करत. नाझीनी या कुटुंबाला दहा बाय दहाची एक मातीची खोली राहायला दिली होती. तिथे गागरिन कुटुंबाने महप्रयासाने आपलं अस्तित्व टिकवलं. 9 मार्च 1944 रोजी रशियन फौजांनी त्यांची मुक्तता केली आणि युरीचं शिक्षण सुरू झालं.

पुढे तरुण युरी 1950 मध्ये फाऊंड्रीमॅन’ म्हणून काम करू लागला. त्यानंतर एकदा त्याने रशियन एअर फोर्सकडे अर्ज भरला आणि याक-18 विमानावर त्याचं ट्रेनिंग सुरू झालं. 5 नोव्हें. 1955 रोजी त्याची हवाईदलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. 166 तासांचा ‘सोलो’ उड्डाणाचा अनुभव घेतल्यानंतर ‘वोस्टॉक’ या अंतराळ यानावरील प्रशिक्षणासाठी या पाच फूट दोन इंच उंचीच्या तरुणाची निवड झाली. मानवी इतिहासात तो ‘सर्वाधिक उंची’ गाठणार आहे हे तेव्हा त्याच्या स्वप्नातही नव्हतं, कारण अनेक सहकारी स्पर्धेत होते. त्यांच्यात तो कमालीचा प्रिय होता. सालस, कष्टाळू, बुद्धिमान, नेतृत्वगुण असलेल्या युरीचं कौतुक त्याच्या सर्व सहकाऱयांना होतं. 7 मार्च 1960 रोजी 40 ते 50 फुटांचं ‘जंपिंग’ करून त्याने शारीरिक क्षमताही सिद्ध केली होती. त्याची स्मरणशक्ती तीक्र होती.

अखेर 12 एप्रिल 1961 रोजी तो ‘क्षण’ आला. युरीचं वोस्टॉक-1 अवकाशात उडताना कंट्रोल रूममधून त्याचा मित्र कोरोवेव बोलत होता, ‘पहिला टप्पा… त्वरित… उड्डाण… गुडबाय गागरिन आमच्या शुभेच्छा!’ त्यावर युरी उत्तरला- ‘मित्रांनो गुडबाय… पुन्हा भेटेपर्यंत.’

ही एक अचाट, अफाट साहसयात्रा होती. युरीने अवकाशातून पृथ्वीची खरीखुरी परिक्रमा केली. तो परतला तेव्हा त्याचं अभूतपूर्व स्वागत झालं. अमेरिकेचा खडूसपणा वगळता अनेक देशांनी युरीचा सन्मान अभिमानाने केला आणि अंतराळ गाजवून आलेला युरीचा दुर्दैवी अंत 28 मार्च 1968 रोजी मिग विमानाच्या अपघातात झाला. युरी ‘अल्पायुषी अमर’ ठरला! मानवी इतिहासातला चिरंजीव ठरला.

[email protected]