शून्य रुपयाची नोट

‘काम होईल, लगेच होईल पण पाचशे रुपये द्यावे लागतील!’ समोरचा साहेब हळू आवाजात कुजबुजतो. त्याचे बोलणे ऐकून रामराव मान डोलवतात आणि खिशातून एक नोट काढून साहेबाच्या हातावर टेकवतात. साहेब नोट पाहतो आणि एकदम चपापतो, त्याची मान खाली जाते. साहेब बिनबोभाट फाईलवर सही करतो आणि रामरावांच्या हातात सोपवतो. काय जादू तरी काय होती त्या नोटेमध्ये? नाही, ती पाचशेची नोट नव्हती तर ती होती चक्क शून्य रुपयांची नोट. आश्चर्यचकित झालात ना? पण आपल्या हिंदुस्थानात शून्य रुपयाची नोट अस्तित्वात आहे आणि तिच्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे.

या नोटेबद्दल फार लोकांना माहिती नाही, कारण ही नोट आपल्या चलनात नाही. अर्थात ही नोट काही रिझर्व्ह बँकेने छापलेली नाही, तर एका खाजगी समाजसेवी संस्थेने छापलेली आहे. ‘भ्रष्टाचार मुक्ती’ अभियानाचा एक भाग म्हणून ही नोट छापण्यात आली होती. लाच मागणाऱया लोकांना सामान्य लोकांनी ही नोट द्यावी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असा यामागचा मुख्य उद्देश होता. तामीळनाडूमध्ये कार्यरत असलेल्या `5th Pillar’ नावाच्या एका NGOने ही नोट छापल्याचे बोलले जाते. हिंदी, तेलगू, मल्ल्याळम, कन्नड अशा विविध भाषांमध्ये लाखापेक्षा जास्ती शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.

महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या या नोटेवर ‘भ्रष्टाचार खत्म करो’, ‘अगर कोई रिश्वत मांगे तो इस नोट को दें और मामले को हमें बताएं’, ‘ना लेने की ना देने की कसम खाते हैं’ अशी वाक्ये छापण्यात आलेली आहेत. या नोटा समाजसेवी संस्थेतर्फे मार्पेट, रेल्वे स्टेशन, लग्नाची कार्यालये, बस स्टेशन अशा विविध ठिकाणी वितरित करण्यात आल्या होत्या. शाळा, कॉलेजेसमध्येदेखील त्या वाटण्यात आल्या होत्या आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या या नोटा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आल्या आहेत.

स्पायडरमॅन