
>> पराग पोतदार
एक शिक्षक किती महत्त्वाचा बदल घडवू शकतात, मूर्तिमंत उदाहरण दत्तात्रय वारे गुरुजी. वाबळेवाडीची झिरो एनर्जी शाळा आणि आता जालिंदरनगरची जागतिक स्तरावर ओळख मिळवणारी शाळा, त्यांचे झपाटलेपण सिद्ध करतात.
पुणे जिह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर नेले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या नेतृत्वात शाळेने आगळे यश साध्य केले. ‘टी फोर एज्युकेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’ स्पर्धेत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात भारतातून निवडली गेलेली ही एकमेव शाळा आहे.
?या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातील लाखो शाळांमधून विविध टप्प्यांवर जालिंदरनगर शाळेने यश मिळवत ‘जागतिक स्तरावरील सर्वोत्तम 10’ शाळांच्या यादीत स्थान मिळवले आहे. उजाड माळरानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी करून, सरकारी शाळेतूनही उत्कृष्ट शिक्षण मुलांना मिळू शकते हे या पुरस्काराने दाखवून दिले आहे. एक शिक्षक किती बदल घडवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुरूजी दत्तात्रय वारे. याआधी शिरूर तालुक्यात वाबळेवाडी येथे त्यांनी झिरो एनर्जी शाळा घडवली होती आणि आता जालिंदरनगर शाळेला त्यांनी थेट जागतिक दर्जाची ओळख मिळवून दिली आहे.
?कधी काळी केवळ मोजक्या विद्यार्थ्यांसह बंद होण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आज जागतिक शैक्षणिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. याचे सर्व श्रेय वारे गुरूजी यांना जाते. त्यांनी शाळेची जी पुनर्बांधणीची जबाबदारी घेतली आणि काही महिन्यांतच या शाळेचा चेहरामोहराच बदलला.
?सध्या शाळेमध्ये 7 वी पर्यंतचे वर्ग असून 120 विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत तर अजून दोन शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. लोकसहभागातून काय चमत्कार होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अतिशय दुर्गम भागातही शून्यातून झेप घेऊन केवळ सहा ते सात महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहू शकते हे दाखवून दिले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिह्यातील शिक्षकांनी जालिंदरनगर येथील शाळेला भेट दिली आहे. याविषयी दत्तात्रय वारे गुरुजी म्हणतात, शाळेला नंबर एक बनविण्याचे शाळेचे ध्येय आहे. स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश बक्षीस नसून, सरकारी शाळांमध्येही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठीची ही चळवळ आहे. ‘लोकसहभागातून शाळेचे नंदनवन झाले आहे.
‘जागतिक स्तरावरील सर्वोत्तम 10’ शाळांमध्ये सरकारी शाळा स्थान निर्माण करते हे यश सुखावणारे आहे. आपल्या मातीत चांगलं काही घडलं नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. सरकारी शाळा टिकवायच्या असतील तर लोकसहभाग गरजेचा आहे. समाजाचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या निमित्ताने नक्कीच बदलेल व सकारात्मकता निर्माण होईल, अशी खात्री वाटते. यानिमित्ताने सरकारी शाळांमधील शिक्षकांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल व आपल्या सरकारी शाळा जागतिक दर्जाच्या होण्याच्या प्रािढयेस अधिक गती मिळेल.
?याविषयी जालिंदरनगरचे ग्रामस्थ चांगदेव जोडगे म्हणाले, शाळेसाठी जमीन दान केली. तिथे सरकारने शाळा बांधली, वारे गुरुजींच्या माध्यमातून शाळेला एक उत्तम गुरू लाभला. माळरानाचे रूपांतर नंदनवनात झाले. आम्हाला अभिमान वाटतो की आमचं गाव जगभर ओळखलं जातंय. आज मोडकळीस आलेल्या या शाळेच्या खोल्यांमधून जर्मनसारख्या परकीय भाषा शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मितीचे धडेदेखील दिले जातात. इतकेच नव्हे तर ‘इस्रो’सोबत शैक्षणिक करारदेखील या शाळेने केला आहे.
एक कोटीचे बक्षीस ?आता ही शाळा ‘सर्वोत्तम दहा’ शाळांमध्ये असून, पुढील टप्प्यात या शाळांमधून ‘सर्वोच्च शाळा’ निवडली जाणार आहे. यात सर्वोच्च शाळा म्हणून निवड झालेल्या शाळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचे ऑनलाइन मतदान घेतले जाणार आहे.