
>> आशुतोष बापट
हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे. कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?
निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची मंदिरे यांचीसुद्धा विपुलता मोठय़ा प्रमाणावर आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. इथल्या देवता संप्रदायांवर आणि त्यांच्या उपासना पद्धतींवर आदिवासी परंपरेची मोठी छाप पडलेली दिसते हेसुद्धा इथले एक वेगळेपण आहे. बऱ्याच आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासना पद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात. हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे. कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?
योगिनी या शाक्त संप्रदायाच्या गौण देवता आहेत. त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनींची संख्या कोटय़वधी असल्याचे सांगितले असले तरीसुद्धा 64 योगिनी प्रसिद्ध आहेत. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेनी 64 रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले व त्यात त्या दैत्याचा पराभव केला. या युद्धानंतर त्या योगिनींनी दुर्गेकडे याचना केली की, स्मारक रूपाने त्यांना तिच्या जवळच स्थान मिळावे. दुर्गेने ते मान्य केले आणि त्या योगिनी दुर्गेच्या सर्व बाजूने स्मारक रूपाने वास्तव्य करून असतात अशी समजूत आहे. दुसऱ्या एका कथेनुसार घोर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेने त्याच्याशी युद्ध मांडले, परंतु तिचा युद्धात विजय होईना म्हणून शंकराने सूक्ष्म रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिची शक्ती शतगुणित केली. त्या वेळी दुर्गेचे रूप पाहता पाहता भयानक रौद्र झाले आणि त्यातून तेजस्वी, युयुत्सु, भयंकर गर्जना करणाऱ्या अशा योगिनी बाहेर पडल्या.
भारतात 64 योगिनींची फक्त चार-पाच मंदिरेच आहेत आणि विशेष म्हणजे त्यातली दोन ओडिशामध्ये आहेत. एक हिरापूरला आणि दुसरे रानीपूर-झरीयाल या ठिकाणी. मध्य प्रदेशात भेडाघाटला एक आणि खजुराहोला एक अशी 64 योगिनींची मंदिरे आढळतात. त्याचबरोबर ग्वाल्हेरजवळ मितावली इथे एक चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. हिरापूर इथले 64 योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स. च्या 9 व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा आकाशाखाली 64 कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते. अशा 56 मूर्ती या वर्तुळाकृती भिंतीच्या आत असलेल्या कोनाडय़ात आहेत. मंदिराच्या मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीचा मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. या चंडी मंडपाच्या चारही बाजूंनी एकूण 8 योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. पूर्वी या चंडी मंडपावर महाभैरवाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. वर्तुळाकार भिंतीच्या आतील कोनाडय़ात असलेल्या 56 आणि चंडीमंडपावरील 8 अशा 64 योगिनी इथे दिसतात. इथे अजून एक वेगळी मूर्ती दिसते ती आहे एकपाद भैरवाची. 64 योगिनींची पूजा ही तांत्रिक पूजा समजली जाते. योगिनी शक्यतो प्राणी, राक्षस किंवा माणसाचे मुंडके यावर उभ्या असलेल्या दाखवतात.
रानीपूर–झरीयाल
बोलांगीर जिह्यात असलेले रानीपूर-झरीयाल हे ठिकाणसुद्धा 64 योगिनींच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूला राष्ट्रीय महत्त्व असलेले ठिकाण असा दर्जा राज्य सरकारने दिलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी शिव पार्वती आलिंगन मुद्रेत असून त्यांच्या सर्व बाजूंनी 64 योगिनींच्या मूर्ती दिसतात. या सर्व योगिनी विविध नृत्यमुद्रेत दाखवलेल्या आहेत. हे या ठिकाणचे अगदी सुंदर आणि अत्यंत वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. यातल्या 13 मूर्ती आता दिसत नाहीत तर इतर काही भग्न झालेल्या आहेत, परंतु तरीही त्यांचे सौंदर्य मात्र अजिबात कमी होत नाही. इथे जवळच 20 मीटर उंचीचे ‘इंद्रलथ’ नावाचे एक विटांचे मंदिर असून ते तत्कालीन ओडिशामधील सर्वात उंच विटांचे मंदिर समजले जाते. ओडिशाच्या भटकंतीमध्ये या आगळ्यावेगळ्या मंदिरांना मुद्दाम भेट द्यावी व भटकंती समृद्ध करावी.
(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)