
>> प्रभाकर पवार, [email protected]
जादूची कला शिकून, पुस्तके वाचून ‘बाबा’ झालेल्या नाशिकच्या अशोक एकनाथ खरातने दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ हे आपल्या कृष्णकृत्यांनी साऱ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. १९९४ च्या जळगाव वासनाकांडानंतर नाशिकमधील महिलांवरील लैंगिक शोषणाचे संतापजनक प्रकरण नुकतेच उघडकीस आले. पतीला ठार मारण्याची भीती दाखवून अशोक खरात ऊर्फ कॅप्टन या भोंदूबाबाने आपल्याच भक्तगण महिलांवर बलात्कार केले. पुरुष भक्तगणांनाही त्याने सोडले नाही. मर्सिडीजसारख्या आलिशान गाड्यांसाठी, परदेश दौरा करण्यासाठी हा भोंदू माफिया जिवे ठार मारण्याची व्यावसायिकांना धमकी द्यायचा.
गेल्याच आठवड्यात एका पुण्याच्या व्यावसायिकाने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेला जबाब थक्क करणारा आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले पुण्याचे (हडपसर) ५१ वर्षीय राजेंद्र अशोक जासूद आपल्या तक्रारीत म्हणतात, “मी जरी बांधकाम व्यावसायिक असलो तरी लॉजिस्टिकच्या व्यवसायात मला रस आहे. त्यासाठी मी अमेरिकेतही चार-पाच वेळा जाऊन आलो आहे. लॉजिस्टिकचा व्यवसाय मला सुरू करायचा होता. त्या वेळी माझा मुंबईचा मित्र दिनेश परब (राहणार भायखळा) मला म्हणाला, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचे बाबा अशोक एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन यांना तू भेटलास, त्यांचा आशीर्वाद घेतलास तर तुझ्या व्यवसायात बरकत येईल. त्यांच्या तंत्रमंत्राने बरेच लोक आर्थिकदृष्ट्या सबळ व मोठे झाले आहेत. त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ समजतो.”
कॅप्टन बाबाला भेटल्यानंतर भेटणारा मोठा होतो हे ऐकल्यावर राजेंद्र जासूद हे कॅप्टन बाबाला भेटण्यासाठी आतुर होते. “राजेंद्र जासूद हे आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत. आपण त्यांना तुमची वेळ द्यावी,” अशी विनंती कॅप्टन बाबाला दिनेश परब यांनी केली. यादरम्यान जादूगार जो तंत्रमंत्र वापरतात त्या हॉट व कोल्ड रीडिंगचा
वापर करून राजेंद्र जासूदची माहिती कॅप्टन बाबाने गोळा केली. जेव्हा राजेंद्र जासूद यांची बाबाबरोबर भेट झाली तेव्हा आपला खराखुरा भूतकाळ कॅप्टन बाबाकडून ऐकून राजेंद्र जासूद आश्चर्यचकित झाले. अशोक बाबामध्ये खरोखर तो म्हणतो त्याप्रमाणे दैवी शक्ती असल्याची राजेंद्र जासूद यांना खात्री पटली. ते कॅप्टन बाबाच्या प्रेमात पडले. जेव्हा बाबाचे खरे ढोंग, लबाडी उघड झाली त्यानंतर राजेंद्र जासूद हे ‘कोमात’ गेले.
बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद आपल्या तक्रारीमध्ये पुढे म्हणतात, कॅप्टन बाबाकडे मी व दिनेश परब गेलो. मला लॉजिस्टिकचा परदेशात व्यवसाय सुरू करायचा आहे असे मी त्यांना सांगितले तेव्हा बाबा म्हणाले, तुला परदेशात जायचे असेल तर तुझी अवतार पूजा करावी लागेल. तुला माझ्याकडील पॉवर, ऊर्जा द्यावी लागेल. पूजेकरिता लागणारी ऊर्जा व दैवी शक्ती जी जगातील तीन वेगवेगळ्या देशांत फिरल्यानंतरच मला प्राप्त होईल. ती ऊर्जा मी तुला दिल्यानंतर, परीस स्पर्श झाल्यावर तुझा जगभरात व्यवसाय वाढेल, असे कॅप्टन बाबाने मला खात्रीपूर्वक सांगितले.
अवतार पूजेसाठी दिनेश परब कॅप्टन बाबाच्या मागे लागले, परंतु राजेंद्र जासूदने मर्सिडीज कार (गुरूची सेवा म्हणून) भेट दिल्याशिवाय मी अवतार पूजा करणार नाही असे कॅप्टन बाबाने ठामपणे सांगितले. मर्सिडीज कारचे वचन दिल्याशिवाय अवतार पूजा होणार नाही. वचन मोडले तर तत्काळ मृत्यू आहे असे दिनेशला कॅप्टन बाबाने सांगितले. राजेंद्र जासूद आपल्या तक्रारीत पुढे म्हणतात, मी कॅप्टन बाबाची मर्सिडीज गाडीची मागणी मान्य केल्यावर त्याने परदेशवारीसाठी माझ्याकडे आग्रह धरला. नाहीतर मी दैवी शक्तीने तुझा मृत्यू घडवून आणीन अशी धमकी दिली. मी घाबरून २१ देशांमध्ये कॅप्टन बाबाला फिरवून आणले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले. कॅप्टन बाबाने माझ्याकडून गेल्या पाच-सहा वर्षात पाच कोटी रुपये उकळले आहेत. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात रात्रीच्या वेळेस अंधारात प्लॅस्टिकचा नकली साप खरा असल्याचे भासवून माझ्यामध्ये भीती निर्माण केली. अशोक खरात हा भोंदू, दुष्ट, कपटी बाबा आहे. पैशांसाठी तो आपल्याला जिवे मारण्याची धमकी देत आहे, अशी खात्री पटल्यावर आपण कॅप्टन बाबाकडे दिलेले पैसे परत मागितले. तेव्हा कॅप्टन बाबाने आपल्या विरोधात राजकीय दबाव आणून पोलिसांत गुन्हा दाखल केला, असाही राजेंद्र जासूद यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदविला आहे.
कुणीतरी भोंदूबाबा पैशांसाठी, विधीसाठी जिवे ठार मारण्याची धमकी देतो. राजेंद्र जासूदसारखे व्यावसायिक त्याच्या धमक्यांना, जिवाला घाबरून त्याच्यावर चार-पाच कोटी खर्च करतात हे अनाकलनीय वाटते. बहुसंख्य भोंदूबाबा हे मेंटली रिटार्डेड, बुद्धीची पूर्ण वाढ न झालेले विकृत असतात. अशा बाबाच्या धमक्यांना घाबरून कुणीही स्त्री-पुरुष त्याच्या स्वाधीन होत असतील, तो सांगेल तसे वागत असतील तर अशा मेंढरांना कुणीच वाचवू शकणार नाही.
२०१३ साली महाराष्ट्रात अनिष्ट, अघोरी व जादूटोणा प्रतिबंध कायदा अमलात आला. त्याच वर्षी गुजरातच्या आसाराम बापू व पंजाबच्या रामरहिम सिंग या भोंदूबाबांचे लहान मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण उघडकीस आले. सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असलेल्या रामरहिमने बलात्कार केलेल्या दोन बहिणींच्या शूर पत्रकार भावाची हत्या केली तरीही त्या बहाद्दर मुलींनी कोर्टात जिवाची पर्वा न करता रामरहिमविरुद्ध साक्ष दिली. आसाराम बापूविरुद्धही जोधपूरच्या मुली मागे हटल्या नाहीत. त्यांनीही कोर्टात आसाराम बापू व त्याच्या कामुक मुलाचा बुरखा फाडला. त्यामुळेच आसाराम बापू व रामरहिम यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अशोक खरात या स्त्रीलंपट बाबाविरुद्ध कुणी महिला ठामपणे उभी राहिली, त्याच्या विरुद्ध साक्ष दिली तर अशोक खरात कधी जेलबाहेर येणार नाही.
जळगाव वासनाकांडातील एका पीडित कॉलेज युवतीला साक्ष देण्यासाठी बोलविले असता ती पोलिसांना म्हणाली, मी साक्ष देण्यास येणार नाही. कारण आता माझे लग्न झाले आहे. मला तुम्ही चौकशीसाठी बोलविले तर मी आत्महत्या करीन. कॅप्टन बाबा प्रकरणात असे प्रकार होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कॅप्टन बाबाविरुद्ध आतापर्यंत एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्यातील आठ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात आहेत, तर तीन गुन्हे फसवणुकीचे आहेत. कॅप्टन खरातविरुद्धचा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) व महिला न्यायाधीशांच्या कोर्टात सुरू केल्यास, विशेष सरकारी वकील (स्पेशल पीपी) नेमल्यास कॅप्टन बाबाचा जेलमध्येच अंत होईल, एवढे लक्षात ठेवा. आज रोज महिला व ज्येष्ठ नागरिक (विशेषतः निवृत्त) यांना उद्ध्वस्त केले जात आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली पेन्शनरांना रस्त्यावर आणले जात आहे. त्यांच्या आयुष्याची पुंजी, आर्थिक स्रोत संपविला जात आहे. महिलांवरील अत्याचारांइतकाच हा भयावह प्रकार आहे. हे भीषण सामाजिक संकट म्हणावे लागेल, परंतु या देशात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कुणी वालीच राहिला नाही.




























































