
>> शुभांगी बागडे, [email protected]
भारताच्या साहित्य–संस्कृती पटलावर वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल’ला नुकतीच सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्य व टीमवर्क आर्टस् प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय यांच्याशी साधलेला संवाद.
लोकप्रिय अशा जयपूर लिटरेचर फेस्टिवलबद्दल काय सांगाल?
– जयपूर साहित्य महोत्सव गेल्या काही वर्षांत जगभरातील साहित्य वर्तुळात लोकप्रिय ठरत आहे. साहित्य, विचारधारा, जिज्ञासू वृत्ती या साऱ्याचं प्रतिबिंब या संमेलनात दिसते. जिथे वाचक त्यांच्या आवडत्या लेखकांना भेटू शकतील आणि भारताच्या कलात्मक आणि बौद्धिक परंपरांच्या समृद्धतेत स्वतला आजमावू पाहतील असा हा महोत्सव. जो अधिकाधिक व्यापक व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहील.
महोत्सवासोबत तुमचा प्रवास, आव्हाने आणि उत्साह कसा आहे?
– साहित्य सर्वांसाठी उपलब्ध होतानाच वादविवाद, चर्चा आणि मतभेदांसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ असायला हवे व ते आताच्या प्रवाहाला सुसंगतही असायला हवे या विचारांतून माझा जयपूर साहित्य महोत्सवासह प्रवास सुरू झाला. सुरुवातीला लेखक, प्रकाशक आणि प्रेक्षक यांचा विश्वास संपादन करण्याचे मुख्य आव्हान होते तरीही वाचकांचे प्रेम व उत्साह आम्हाला पुढे नेत राहिला. हा उत्साह 2026 च्या महोत्सवापर्यंत तितकाच अबाधित आहे. प्रत्येक महोत्सवात नवीन लेखन, संकल्पना, उपक्रम आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. महोत्सव चारी दिशांपर्यंत पोहोचतो आणि मी आणखी एका उत्साही वर्षाची वाट पाहायला सज्ज होतो.
महोत्सवाचे यंदाचे मुख्य आकर्षण
– जयपूर साहित्य महोत्सव 2026 मध्ये जागतिक साहित्यिकांसह भारतीय लेखकांचे प्रादेशिक साहित्य व सांगितीक आणि सांस्कृतिक उपक्रम यंदाचे आकर्षण आहेत. महोत्सवात प्रेक्षकांच्या अभिरुचीला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे तो अधिक वैविध्यपूर्ण, अर्थपूर्ण आणि गुंतवून ठेवणारा ठरावा हेच आमचे उद्दिष्ट असते.
महोत्सवात यंदा कोणती संकल्पना विशेष आकार घेत आहे?
– फार कमी वेळा संकल्पनेवर आधारित महोत्सव असतो. कारण जगभरातील वैविध्यपूर्ण साहित्याचा अवकाश वाचकांपर्यंत पोहोचवायचा असतो. मात्र यात नेमकेपणा यावा यासाठी इतिहास, राजकारण, हवामान बदल, ललित, कविता, अनुवाद, तंत्रज्ञान, कला, संघर्ष, न्याय आणि अशा विविध विषयांवर लेखक, विचारवंत तज्ञ, कलाकार, वक्ते यांची सत्रे आयोजित केली जातात. यंदा आमच्या विशेष कार्यक्रमांमध्ये सिग्नेचर संगीत सत्र, वारसा विषयावर आधारित सत्रे, जगातील आघाडीचे विचारवंत, लेखक यांचे संभाषण यांचा समावेश आहे. हा उत्सव भारताच्या विशाल साहित्यिक आणि सांस्कृतिक पटलाचा उत्सव साजरा ठरावा या पद्धतीने या महोत्सवाचे नियोजन केलेले आहे.
हा महोत्सव भारताच्या प्रादेशिक साहित्याचे सार दर्शवतो, याबद्दल…
– भारताच्या प्रादेशिक भाषा महोत्सवाच्या केंद्रस्थानी असतात. हिंदी, मराठी, तामीळ, मल्याळम, आसामी, कन्नड, बंगाली, ओडिया, उर्दू, पंजाबी आणि इतर अनेक भाषा परंपरा सादर केल्या जातात. अनुवादक, लेखक आणि प्रकाशक यांना सामावून घेतले जाते. जेणेकरून प्रादेशिक आवाज व्यापक होत सर्वदूरपर्यंत पोहोचू शकेल. जयपूर महोत्सव म्हणजे वाचकांना नवीन भाषा, नवीन लेखक आणि जग समजून घेण्याचा मार्ग आहे.
सामाजिक विकासासाठी साहित्य महोत्सवांचे महत्त्व किती आहे?
साहित्य महोत्सव म्हणजे विचारांवर खुलेपणाने अन् आदराने चर्चा करता यावी अशी जागा. सध्या जगभरात विचारांचे जे विभाजन होत आहे त्यावर चिंतन करणारे, वेगवेगळ्या विचारांना, मतांना ऐकता यावे यासाठी अशी संमेलनं आपल्याला मदत करतात. सांस्कृतिक प्रवाह जपत टीकात्मक विचारसरणी वाढवतानाच तरुण पिढय़ांना वाचण्यास आणि प्रश्न विचारण्यास संमेलनं प्रेरित करतात. प्रत्येक प्रदेशाची, भाषेची, जगाची स्वतंत्र कथा असते. संमेलनं आपल्याला याची जाण करून देतात की, अशा कथांमध्ये समाज घडवण्याची शक्ती असते.
साहित्य महोत्सवांचे रूपांतर आणि भारताचा साहित्यिक गाभा याबाबत…
– जयपूर साहित्य महोत्सवाला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा असा साहित्य महोत्सव भारतासाठी नवीन होता. कालांतराने वाचक, लेखक, कलाकार आणि विचारवंत अशा साऱ्यांना एकत्र आणणारी अनेक सांस्कृतिक व्यासपीठे निर्माण झाली. त्यात मुख्य साहित्यासोबत प्रादेशिक साहित्य महोत्सवांचा उदय हे वैशिष्टय़पूर्ण आहे. शिवाय जगभरातील साहित्याचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद, तरुण वाचकांमध्ये वाढ, इंग्रजी साहित्याचा चढता आलेख यामुळे आजचे साहित्यिक चित्र बदलले आहे. साहित्य महोत्सव, संमेलनं यांच्यामुळे भारताचा साहित्यिक गाभा कायम व्यापक राहिला आहे.
तुमचा वाचन प्रवास आणि पुस्तकं याबद्दल काय सांगाल?
– माझं एकावेळी साधारण 6 ते 7 पुस्तकांचं वाचन सुरू असतं. वास्तववादी विषयांवर आधारित पुस्तकांसह इतिहास, कादंबरी असे सर्वच विषय आवडतात. गेल्या काही वर्षांत मला जाणवले आहे की, वाचनाचा आनंद केवळ शब्दांमध्येच नाही तर त्यातून होणाऱ्या संवादांमध्येही असतो. या संवादातून अनेक कथा उलगडतात ज्या स्वतला समजून घेण्यास आणि जगाला अधिक खोलवर जाणून घेण्यास मदत करतात. जयपूर साहित्य महोत्सवही याच अमिट विश्वासावर आधारलेला आहे.
























































