
>> शिरीष कणेकर
माझ्या दारात माणसं सुपारी घेऊन उभी होती. त्यांना मला सुपारी द्यायची होती – ‘सोडू नका. अन्य मालिकांवरही लिहा. आमच्या मनस्तापाला व संतापाला वाट मोकळी करून द्या…’
या सगळ्या उपद्वव्यापात माझ्या डोक्याचा गोविंदा (अहुजा नव्हे) होईल याची त्यांना जाणीव किंवा पर्वा दिसत नव्हती. वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या मराठी मालिका बघणं म्हणजे किमान मेंदूचा विमा काढून ठेवायला हवा. महिला काय करतील?
‘भाग्य दिले तू मला’ हा पाठीत खुपसलेला ताजा धारदार सुरा. निदान मालिकेचं नाव ‘डोकेदुखी दिली तू मला’ असं अर्ध्यावर बदलून घ्यायचं. ‘माहेरचा चहा’ कोणाच्या मालकीचा? या ज्वलंत, जीवन-मरणाच्या प्रश्नाचा निकाल कोर्ट जाहीर करीत असताना रत्नमालाबाई मोहिते व त्यांचे निकटवर्ती कुटुंबीय यांच्यातलं कोणीही कोर्टाकडे फिरकतही नाही. का? कारण ती मराठी मालिका आहे. ते काहीही दाखवू शकतात. ते कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीत. एवढं करून प्रेक्षकांना मालिकेने खिळवून ठेवायला हवं तर असंही नाही. तसं त्यांच्यावर बंधन नसतं. बच्चूमामा व शेवंतामावशी या अविवाहित पात्रांची सतत चालणारी कुत्र्या-मांजरांसारखी भांडणं प्रेक्षकांना विलक्षण भावतात हे मालिकावाल्यांनी परस्पर ठरवलंय. निर्मात्या काश्मिरा माडम यांना त्यांच्या घरची आठवण करून देणारी ही भांडणं आवडतात का? की माडमने बच्चूमामाकडून कसं भांडायचं ते शिकून घ्यावं अशी त्यांची सुप्त इच्छा आहे?
या मालिकेतील संवाद या धर्तीवर असतात – रत्नमालाबाई – ‘कावेरी, तू घरी जाऊन विश्रांती घे कशी.’
कावेरी – ‘आई, तुम्हीच जा व आराम करा.’
रत्नमालाबाई – ‘सकाळपासून तू राबत्येयस, घरीही तूच सगळं करतेस. जा आराम कर.’
कावेरी – ‘आई, तू काय कमी धावपळ करत्येयस? थोडा वेळ उशीला डोकं टेक.’
रत्नमालाबाई – ‘कावेरी, माझं ऐक.’
कावेरी – आई, माझं ऐका.’
या अर्थहीन संवादांतून काय साधतं? अशी कशी, वेळ काढून मालिका लांबवता येते? अनेकदा मला (आणि तुम्हालाही) वाटत आलंय की काच फोडून टीव्हीत घुसावं व रत्नमालाबाई व कावेरी (राजवर्धनची ‘काकू’) यातल्या कोणी एकीने घरी जाऊन आराम करावा याचा फैसला सुनवावा. नाहीतर दोघींनाही अविरत काम करायला लावून आपण टीव्ही बंद करून झोपावं. मालिका कशीही असली तरी टीव्ही बंद होण्यावर तिच्याकडे उतारा नसतो.
कावेरीकडे आयांचा सुकाळ असतो. तिची सख्खी आई तिच्यासाठी गावचं गुहागरचं घर व अनेक आठवणी मागे ठेवून गेलेली असते. सावत्र आईत सावत्रपणाचा लवलेशही नसतो. एवढं कमी झालं म्हणून की काय, कावेरी सासूला आई म्हणते व अगंतुगं करते. ती चौथ्या आईच्या शोधात असल्यासारखी दिसते.
वैदेही या पात्राला कुठल्याही परिस्थितीत राज हवा असतो. अॅट एनी कॉस्ट! त्यासाठी ती राजच्या आईला आपली एक किडनी देते. (राजचे वडील असते तर त्यांना दुसरी किडनी दिली असती.) राजला आपला करण्यासाठी ती नाना कुटील कारस्थाने करते. माफ करा, पण राज कोणा स्त्रीला इतका हवाहवासा वाटू शकतो यावर खूप प्रयत्न करूनही विश्वास ठेवणं मला कठीण जातंय. (माझ्या तुलनेत) मला तो बावळट व पुचाट वाटतो.
निंदकाचे घर असावे शेजारी, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. इथे निंदक (व संहारक) त्याच घरात राहतात. नाश्त्याला एकाच खोलीत जमतात, पण त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण निर्माण न होता शत्रुत्वाची धार कायम राहते. सानियापक्षी जान्हवी किल्लेदार हिच्या धमन्यांतून रक्त न वाहता खलत्व दुथड्या भरून वाहात असतं. ती कोणाला नुसतं पाहतच नाही, तर पाण्यात पाहते. कुठल्याही परिस्थितीत वाईट वागायचं असं तिने ठरवलेलं. अशी माणसं असू शकतात? मी नाही बाबा! मी परिस्थिती पाहून वाईट वागतो…
रत्नमालाबाई करुणासागर आहेत. कावेरी नुसतीच करुणा आहे व राजवर्धन करुणाही नाही व सागर तर नाहीच नाही. ‘माहेरचा चहा’ची मालकी ठरेपर्यंत
रेस्टॉरंटमधल्या पाटीवरचं काळं फडकं काढून टाकतो. कोर्टाची आज्ञा राज धुडकावून लावतो. ‘बघूया माझं कोण काय करतं ते?’ असं आव्हान तो देतो. राजच्या बुद्धिमत्तेला ते शोभतंही. वैदेही स्वत:चा व्यवसाय सोडून ‘माहेरचा चहा’ प्यायला, आय मीन, चालवायला घेते. नाहीतरी राजला आपलासा करणं हा तिचा आयुष्याचा एकमेव उद्देश असतो.
थांबा जरा, दारावर पाटी लावून येतो. ती अशी – ‘यापुढे मालिकामर्दनाची सुपारी घेतली जाणार नाही.’ त्या मालिका आपल्या मरणाने मरतील. अन् कोणाला बघायच्या असतील तर बघू देत की. कारण त्या मालिका व ती माणसं एकमेकांसाठी बनल्येयत.


























































