
>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]
कायम सर्वत्र बर्फाने वेढलेल्या अवस्थेत असलेला हिमालय सध्या एका प्रकारे बर्फाच्या दुष्काळाचा सामना करतो आहे आणि त्यामुळे जगभरातील पर्यावरण तज्ञ चिंतेत पडलेले आहेत. संशोधकांच्या अभ्यासानुसार 1980 ते 2020 या कालावधीत झालेल्या हिमवर्षावाच्या तुलनेत गेल्या 5 वर्षांत हिवाळ्यातील हिमवर्षाव कमी झालेला आहे. सखल भागात हिमवर्षाव कमी होऊ लागला आहे आणि पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे, तर दुसरीकडे जो काही कमी प्रमाणात बर्फ पडतो आहे तोदेखील तापमान वाढीमुळे लवकर वितळतो आहे.
कमी प्रमाणातील हिमवर्षावाचा परिणाम या प्रदेशात राहणाऱ्या लाखो लोकांच्या आयुष्यावर तर पडणार आहेच, पण अनेक परिसंस्थांनादेखील दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. हा बदल हिमालयाचा चेहरामोहरा बदलून टाकेल अशी भीतीदेखील काही संशोधकांना वाटत आहे. हिमनद्यांचे वेगाने वितळणे आणि लुप्त होत जाणे या समस्येबरोबर गेल्या काही काळापासून हिमालयीन राज्ये लढत आहेत. आता त्यांना या नव्या हिम दुष्काळाचा आणि त्याच्या परिणामांचादेखील सामना करावा लागणार आहे.
हिमालयातील बर्फ हा या प्रदेशातील नद्या, नाले आणि ओढे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऋतू बदलानुसार तापमानात वाढ झाली की हे बर्फ वितळायला सुरुवात होते आणि या नदी-नाल्यांना मिळते. हा बर्फ हे त्यांचा पाण्याचा मुख्य स्रोत बनते. हे पाणी सिंचनासाठी, पिण्यासाठी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कमी हिमवर्षावामुळे आता या पाण्याच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे वेगाने वाढत जाणाऱ्या कोरडय़ा वातावरणामुळे या प्रदेशातील जंगलांमध्ये वणवे पेटण्याची शक्यतादेखील वेगाने वाढणार आहे.
वेगाने लुप्त होत चाललेल्या हिमनद्या आणि कमी होत चाललेला हिमवर्षाव हिमालयातील पर्वतांना अस्थिर करतो आहे असेदेखील संशोधकांचे म्हणणे आहे. इथल्या पर्वतांसाठी बर्फ हे सिमेंटसारखे काम करत असते. मात्र आता या बर्फाच्या कमतरतेमुळे आणि हिमनद्यांच्या लुप्त होत जाण्यामुळे या प्रदेशात भूस्खलन, दरडी कोसळणे, हिमतलावांचे फुटणे आणि त्यांनी मोठय़ा प्रमाणावर राडा रोडा वाहून आणणे या घटना आता पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात घडू लागल्या आहेत.
विविध संस्थांनी केलेला अभ्यास, त्यांच्याकडून मिळवलेला डाटा यांचा एकत्र अभ्यास केला असता हिमालयात पाऊस आणि हिमवर्षाव यांच्यात घट झाल्याचे निश्चितपणे सामोरे आले आहे. वायव्य हिमालयात तर 40 वर्षांच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 25 टक्के कमी बर्फवृष्टी झालेली आहे. हिमालयाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नेपाळमध्येदेखील ऑक्टोबरपासून पाऊस पडलेला नाही आणि उरलेला हिवाळादेखील कोरडा जाण्याची शक्यता अधिक आहे. एका अहवालानुसार 2024-25 साली असलेले बर्फाचे आवरण आणि हे आवरण टिकून राहण्याचा कालावधी हा सरासरीपेक्षा 24 टक्क्यांनी कमी होता. ही गेल्या 23 वर्षांतली नीचांकी पातळी आहे.
काही पर्यावरण तज्ञ मात्र गेल्या काही हिवाळ्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या या दाव्याविषयी मत मांडताना दुसऱ्या गटातील शास्त्रज्ञ याचा संबंध हवामान बदलाशी जोडत आहेत. हिमालयातील काही भागांत जोरदार बर्फवृष्टी नक्की झालेली आहे, पण अशा घटना काही विशिष्ट आणि मोजक्या भागांपुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत असे ते सांगतात. अशा घटनांमध्ये जी जोरदार बर्फवृष्टी झाली ती हिवाळ्यातील सामान्य पावसामुळे झालेली नसून ती हवामानातील प्रतिकूल बदलामुळे झालेली आहे.
कमी पाऊस, कमी हिमवर्षाव, हिमनद्यांचे वेगाने नाहीसे होणे अशा अनेक संकटांना या प्रदेशाला एकाच वेळी सामोरे जावे लागत आहे. हिवाळ्यातील पावसाच्या कमी होण्यामागची कारणे अनेक संशोधकांसाठी वेगवेगळी असली तरी त्यांच्या एकत्र अभ्यासातून ते लवकर एका ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचतील हे नक्की. मात्र ही बदलत जाणारी परिस्थिती ही येणाऱ्या गंभीर संकटाची एक चाहूल असल्यावर मात्र त्यांचे एकमत आहे. स्वतच्या उपभोगासाठी निसर्गावरचे अत्याचार माणूस कधी थांबवणार आणि त्याचे डोळे कधी उघडणार हा खरा प्रश्न आहे.

























































