ठसा – डी. बी. जगत्पुरिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंजाबराव मोरे

समाजातील  विविध घटना, घडामोडींमुळे काळजात निर्माण होणाऱ्या कंपनातून झिरपलेले साहित्य वाचकांच्या काळजाला भिडणारे असते. त्यातून समाजातील अनिष्ठ प्रथांवर निर्भीडपणे प्रहार करणारे साहित्यिक म्हणून डी. बी. जगत्पुरिया यांचे नाव घ्यावे लागेल. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डी. बी. जगत्पुरिया यांनी साहित्याने मोठा गोतावळा दिल्याची प्रामाणिक कबुली दिली. गोवा मुक्तीसंग्रामात धडाडीचे काम करणारे स्वातंत्र्यसेनानी बाबुलाल भय्या जयस्वाल यांच्यानंतर वारसांना मिळणारे सरकारी अनुदान स्वाभिमानानाने नाकारणारे त्यांचे सुपुत्र म्हणजे डी. बी. जगत्पुरिया. गेली 50 वर्षे जगत्पुरिया शिक्षकी पेशा जपत साहित्य, समीक्षा आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत आहेत. यातून ते मराठी माती, मराठी माणसं आणि मराठी भाषा यांच्याशी एकरूप झाले आहेत.

शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेने प्रेरित होऊन प्रत्येक आघाडीवर ते लोकप्रबोधनाचे काम परखडपणे करीत आहेत. त्यांनी कालबाह्य अनिष्ठ रुढींची मानसिक गुलामगिरी झुगारली आणि संपूर्ण जीवन लोकशिक्षण आणि साहित्य सेवेसाठी वाहून घेतले आहे. या वयातही प्रचंड ऊर्जा घेऊन ते सातत्याने प्रत्येक आघाडीवर लढा देत लोकजागृतीचे कार्य करत आहेत. त्यांनी आपली लोकशिक्षकाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे बजावली आहे. जगत्पुरिया हे दलित, पुरोगामी साहित्याचे प्रखर प्रवत्ते आहेत. त्यामुळेच डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या ‘अस्मितादर्श’ साहित्य चळवळीचे जगत्पुरिया वाटसरू झाले आणि त्यांचे साहित्य रुढींनी पिचलेल्या सामान्यांनी आपुलकीने स्वीकारले. त्यामुळेच त्यांना जालना येथील 35 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, परिवर्तनाची लढाई खूप कठीण असते. ‘क्रांतीचं चक्र आम्हीच आमच्यासह फिरवू!’ या बाबासाहेबांच्या शब्दांत खोल अर्थ दडलाय. आम्ही म्हणजे पीडित, दुर्लक्षित, गरीब, कष्टकरी. यासाठी गुलछबू लेखक अडथळे आणतील. यासाठी आपल्यालाच नवरचनेच्या अवकाशात गरुडझेप घ्यावी लागेल. समविचारी साहित्य प्रवाहातल्या मित्रांना सोबत घ्यावं लागेल.असे अक्षरांवरील प्रेम ठासून सांगणाऱ्या जगत्पुरिया यांना दीर्घायुष्य लाभो एवढे चिंतणेच आपल्या हातात आहे.