भटकंती – रमणीय खान्देश

>> आशुतोष बापट

खान्देश म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अत्यंत देखणा प्रदेश. ऐतिहासिक काळी दख्खनची सीमा खान्देशपासून सुरू होत असे. असा हा सीमेवरचा देखणा प्रदेश भटकंतीच्या व्रतासाठी एकदम उत्तम. साहित्य, संस्कृतीचा वसा जपणारे धुळे, बलसाणे इथे मंदिर समूह, किल्ले लळिंग हे पाहत आणि खान्देशी खादाडीचा पुरेपूर आनंद घेत केलेली भटकंती नक्कीच समृद्ध होते.

कोरोनाच्या संकटाचा विळखा हळूहळू कमी होईलच. जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात होऊ लागली आहे. सगळं सुरळीत होईपर्यंत पावसाळासुद्धा सरलेला असेल. कोकण, घाटमाथा, घाटातले धबधबे ही ठिकाणे गर्दीने भरून वाहतील. अशा वेळी आपण खान्देशचा रस्ता धरावा. खान्देश म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अत्यंत देखणा प्रदेश. ऐतिहासिक काळी दख्खनची सीमा खान्देशपासून सुरू होत असे. इथे बोलली जाणारी अहिराणी भाषा ऐकायला खूप गोड आहे. असा हा सीमेवरचा देखणा प्रदेश. भटकंतीच्या व्रतासाठी एकदम उत्तम असा प्रदेश.

खान्देशी संस्कृती जपणारे धुळे ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा प्रसिद्ध आहे. या धुळ्याला मुक्काम करून आजूबाजूचा प्रदेश भरपूर हुंदडावा. सर्वात आधी निसर्गाचे मनसोक्त दर्शन घेण्यासाठी धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर गेलेच पाहिजे. उंचीला अगदी कमी असलेल्या सोनगीर किल्ल्याची तटबंदी आणि तिथून दिसणारा नजारा अप्रतिम असतो. सोनगीर फाटा हे खास खवय्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण. इथे असलेल्या विविध हॉटेल्समधून खास खान्देशी पदार्थ मिळतात. भाकरी आणि त्याच्या सोबत शेवभाजी, सोबतीला कांदा-हिरवा ठेचा, शेवग्याची भाजी. मुद्दाम भूक ठेवून जावे आणि तुडुंब जेवावे. इथूनच एक रस्ता मेथी या गावी जातो. इथे एक विष्णूचे प्राचीन मंदिर असून त्यावर विष्णूची ‘वैकुंठ’रूपातली महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती बघायला मिळेल. इथे बाजूलाच असलेल्या दगडावर दुसरा दगड आपटला तर संगीताचे स्वर निघतात. तिथून पुढे बलसाणे गावी जावे. बलसाणे इथे मंदिर समूह आहे. त्यातले मुख्य मंदिर हे मठ म्हणून प्रसिद्ध आहे. हे काहीसे निराळे मंदिर आहे. याच्या सभामंडपात 12 खोल्या आहेत. कदाचित साधकांना इथे राहून साधना करता यावी यासाठी ही रचना केली असावी. बलसाणे मंदिरे ही त्यावर असलेल्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. येथील यज्ञवराहाचे शिल्प आवर्जून पाहावे असे आहे. पाटणादेवी, चाळीसगाव, जळगाव हा परिसरसुद्धा खान्देशातच येतो, पण त्यावर स्वतंत्र लिहायला हवे.

धुळे हे गाव सांस्कृतिकदृष्टय़ादेखील महत्त्वाचे आहे. गावात राजवाडे संशोधन संस्था आणि त्यांचे संग्रहालय मुद्दाम पाहावे असे आहे. तसेच इथे असलेली समर्थ वाग्देवता संस्थासुद्धा पाहण्यासारखी आहे. येथे सन 1935 मध्ये शंकर श्रीकृष्ण ऊर्फ नानासाहेब देव यांनी समर्थ रामदासस्वामी व रामदासी संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह, संशोधन व प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. वाग्देवता म्हणजे सरस्वतीची उपासना करण्याच्या उद्देशाने इथे विविध संतांवरील साहित्याचे संकलन केलेले आहे. संतसाहित्याचा अभ्यास करणाऱयांसाठी हा एक मोठा ठेवा आहे. इथे रामदास स्वामींच्या हस्ताक्षरांतील पोथी तर आहेच, याशिवाय रामदास स्वामींनी काढलेली चित्रेसुद्धा इथे पाहायला मिळतात.

धुळ्यातसुद्धा खास खान्देशी खादाडीचा पुरेपूर आनंद घेता येतो. इथल्या पाच कंदील या गजबजलेल्या भागात असलेल्या ‘शेतकरी’सारख्या खास मराठमोळ्या हॉटेलमध्ये आपल्याला नेमक्या खान्देशी चवीचे पदार्थ खायला मिळतात. धुळे-मालेगाव मार्गावर असलेल्या किल्ले लळिंगला तर ऐन श्रावणात भेट द्यायलाच हवी. धुळ्यावरून 8 कि.मी.वर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याच्या लळिंग गावातून पाण्याच्या टाकीशेजारून रस्ता आहे. इथून किल्ला चढायला अर्धा तास पुरतो. लळिंगची तटबंदी फार सुंदर आहे तसेच वरून सगळा आसमंत फार अप्रतिम दिसतो. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठय़ा प्रमाणावर आहेत. एका पाण्याच्या टाक्यात पुन्हा 6 टाक्या खोदलेल्या दिसतात. एक सुंदर ठिकाण पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते.

आपले भटकंतीचे सत्र हे महादेवाच्या दर्शनाशिवाय कसे पूर्ण होणार! आपल्या भटकंतीची अखेर आपण एका नेत्रदीपक शिवमंदिराने करायची. लळिंगवरून पुढे झोडगे गाव लागते. डाव्या हाताला माणकेश्वर महादेवाचे अतिशय अप्रतिम प्राचीन मंदिर आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा जरी याचा पसारा लहान असला तरीसुद्धा या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. त्यात एका देवकोष्ठात असलेली अंधकासुरवधाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. मंदिराच्या बाह्यांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन तसेच शिखरावर असलेले कीर्तिमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहे. आठ दिशांचे स्वामी असलेले अष्टदिक्पालसुद्धा इथे मंदिरावर अत्यंत कलाकुसरीने कोरलेले आहेत.

आपले नवीन काळातील, नवीन रूपातील पर्यटन हे असे खान्देशपासून सुरू करावे. महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला हा संपन्न प्रदेश, जिथे निसर्गाचा वरदहस्त पाहायला तर मिळतोच, पण पर्यटकांची अजिबात गर्दी नाही असा हा प्रदेश पाहून आपली भटकंती समृद्ध व्हावी.

आपली प्रतिक्रिया द्या